सोमवार, २ डिसेंबर, २०१९

सामनाच्या संजय राऊतांचा आततायीपणा


राज्यात तिघाडी सरकारचा शपथविधी होऊन दोन दिवस उलटत नाहीत तोवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून गांधी घराण्याची निष्ठा सांभाळण्याचे काम संजय राऊतांनी हाती घेतले आहे. आजच्या सामनातून स्पष्ट त्याचा शुभारंभच केला आहे. अर्थात त्यात गैर अजिबात नाही. कारण एखाद्याने आपल्याला पाठिंबा द्यावा, कधी नव्हे ते मुख्यमंत्री करावे आणि आपण त्या बदल्यात त्यांची चाकरी करू नये हे काही बरं नाही. आणि समजा तसं जर झालं नाही आणि हायकमांड नाराज झाल्या तर सत्तेचे कांड (तीनतेरा) होणार याची धास्ती आहेच. (टांगती तलवार)
सुरक्षा व्यवस्थेचे राजकारण “धोक्याची घंटा” अशा आशयाचा अग्रलेख आजच्या सामनामध्ये वाचला. गांधी परिवाराला दिलेले “एसपीजी” सुरक्षा कवच काढून त्यांना “झेड प्लस” सुरक्षा कवच देण्यात आल्याचे सदर लेखात लिहिलं आहे आणि गांधी परिवाराच्या सुरक्षेत बदल करावा अशाप्रकारचे विधेयक लोकसभेत मांडल्याचेही लिहिले आहे. अग्रलेखात गांधी घराण्याच्या जेष्ठ असलेल्या सोनिया गांधी यांचे नाव लिहिताना पुरेपूर काळजी घेतली असल्याचेही दिसते आहे. “मॅडम सोनिया” असा आदबीने उल्लेख केला आहे. त्यांनी कसे नाव लिहावे हा मुद्दा नाही मात्र एखाद्या वर्तमानपत्रात आणि त्यातही जबाबदार वर्तमानपत्रात अग्रलेख लिहीत असताना आपल्या मनाचे कवडसे त्यामध्ये अधोरेखित होत असतात याची काळजी तरी तथाकथित संपादकांनी घ्यायला हवी होती. पुढे संपादक लिहितात की, गृहमंत्रालयाला असे वाटते की गांधी परिवाराला धोका कमी आहे. गृहमंत्रालयाला म्हणजे नक्की कुणाला वाटते ? असा सवालही केला आहे. त्यामध्येच खाली हे महोदय लिहितात की, “नेहरू खानदानाशी हे वैर गेल्या पाचेक वर्षापासून वाढले आहे.”
शिवसेनेची राजकीय भूमिका कशीही असो, हिंदुत्ववाद सोबत असो किंवा नसो, सेक्युलर असो किंवा नसो हे सर्व मुद्दे एका बाजूला ठेऊ. मात्र सामनाचे संपादक हे तथाकथित पक्षाचे सक्रिय नेते असल्याने त्यांच्या लिहिण्याविषयी मात्र कुतूहल वाटते. या लेखात त्यांनी अनेक गतकाळातल्या गोष्टी लिहिल्या, त्याला काही मा. बाळासाहेब ठाकरेंची किनार जोडत आपला पक्ष तेव्हापासूनच कशी काळजी करतो असेही दर्शवले मात्र सुरक्षा यंत्रणेवर लेख लिहीत केंद्र सरकार अनेकांना विनाकरण सुरक्षा देत असल्याचा एकंदरीत आरोपही केला. त्यामध्ये म्हणतात, “सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना गेल्या पाच वर्षात वरच्या श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. कुणी महाराष्ट्र जिंकायला आले, कुणी प्रभारी झाले, कुणी उत्तर प्रदेश प्रभारी झाले तर त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येत असल्याचेही लिहीले आहे. गेल्या पाचेक वर्षात सुरक्षा पुरवून सरकारी तिजोरीचा भार वाढवला असल्याचेही त्यांनी लिहिले आहे.
आता मुद्दा एवढाच उरतो की, गांधी घराण्याला कोणती सुरक्षा द्यावी हा निर्णय गृहमंत्रालय ठरवेल मात्र एकंदरीत राजकीय सुडबुद्धी या लेखातून ठळकपणे प्रकट झालेली राज्याला दिसली. त्यामध्ये पाचेक हा शब्द अनेकदा वापरला त्यामुळे आपण पाचेक वर्षे हिमालयात गेलो होता का? की त्यांच्या बाजूला बसलो होतो? हेही यांना आठवेना. ज्यांनी जनतेशी गद्दारी करून सरकार स्थापन करायला साथ दिली त्यांना जाहीर लेखातून मॅडम वगैरे लिहून चाकरीची सुरुवात केली. असो. हा सगळा मुद्दा तर खालच्या गोष्टीपुढे गौणच आहे.

सरकारी तिजोरी भार वाढवला वगैरे लिहिणार्‍या संपादकांना गेल्या दोनच दिवसांपूर्वी  वाय” श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. म्हणजे सोबत आता 11 जवनांचे कडे असणार आहे. राज्यात बेडरपणे वावरता यावे अशी परिस्थिति निर्माण करणं हे राज्यकर्त्यांचे काम आहे तर आता राज्यकर्तेही कार्यक्षम आहेत. येणार्‍या काळात सर्व कार्यक्षम राज्यकर्ते सुरक्षा नाकारून सरकारी तिजोरीचा भार कमी करतील की वाढवतील हेही राज्याला पाहायला मिळणार आहेच. मात्र मला कायम ते वाक्य खूप आवडतं. “समय बडा पहलवान है...”

-         विकास विठोबा वाघमारे

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

शेतकऱ्यांचे भीषण प्रश्न साहित्यिकांना का दिसत नाहीत !

गेल्या चार दिवसांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यामुळे अनेकांनी त्यावर बहिष्कार टाकला, चर्चेच्या फैरी झडल्या... बरंच वादळ उठलं मात्र दरम्यानच्या काळात शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांना काय वाटतं अशी प्रतिक्रिया आली. ती प्रतिक्रिया आणि राजू शेट्टी यांनी विचारलेले सवाल खऱ्या अर्थाने महत्वाचे होते आणि आहेतही. “जेंव्हा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा लेखक काय करतात? रस्त्यावर उतरतात का ? नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणावरून जे निषेधाचे आवाज उमटत आहेत ते आवाज आमचा शेतकरी गळफास लावून मरतो, धर्मा पाटील मंत्रालयाच्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या करतात, एसटीच्या पासला पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्याची मुलगी आत्महत्या करते तेव्हा कुठे गेलेले असतात?" असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला होता.

खरंतर मला साहित्य संमेलन, वाद, नयनतारा सहगल, निमंत्रण आणि इतर सर्व गोष्टी बाजूला ठेऊन केवळ साहित्य आणि शेती यावर काही बोलायचं होतं... तुम्हाला राजू शेट्टी चुकीचे वगैरे वाटत असतील, याचा आणि त्याचा काय संबंध वाटत असेल मात्र साहित्यातली शेती आणि वास्तव हे कधीतरी मुख्य प्रवाहात आलं पाहिजे, त्यावर खऱ्या अर्थानं खुली चर्चा झाली पाहिजे. तसा कौतुकास्पद प्रयत्न नुकताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनात केला गेला. मात्र अखिल भारतीय स्थरावर हे शेती, साहित्य, शेतकरी कधी येणार? कारण आपला देश कृषीप्रधान आहे हेच शिकवलं आहे तुम्हाला मला या शिक्षणव्यवस्थेनं...


जेष्ठ कवी विठ्ठल वाघ म्हणतात, आपल्या देशात दोन संस्कृती आहेत, एक म्हणजे नागरी आणि दुसरी म्हणजे नांगरी होय.
“धर्म आहे दो कुळांचा, दो करांनी देत जावे,
शिवाराची होत सुगी पाखरांना तोषतावे.”
अशा सुंदर ओळी त्याच विठ्ठल वाघ यांनी लिहिल्या. शेतकऱ्यांचं दुखःही त्यांनी आपल्या लेखनात लिहिलं. जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विठ्ठल वाघ व्हावेत अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली होती तेव्हा त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली.
मात्र हे सगळं बघत असताना शेती आणि साहित्याचा नेमका संबंध काय हेही पडताळून पहायला हवं. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात लिहितात की,
“बरे झाले देवा कुणबी केले,
नाही तर दंभेची मेलो असतो.”
एवढेच नाही तर १६ व्या शतकामध्ये दुष्काळाचे विदारक चित्रण करताना तुकाराम महाराज म्हणतात ..
“मढे झाकुनिया करिती पेरणी, कुणबीयाची वाणी लवलाहे,
तयापरी करा स्वहित आपुले, जयासी फावले नरदेह.”

असाच इतिहास चाळत मागे गेलं तर १२ व्या शतकामध्ये संत सावता माळी म्हणतात,
“कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी,
लसूण, मिरची, कोथिंबीरी, अवघा झाला माझा हरी.”
त्यानंतरच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या पडझडीचं वास्तव, दुखः आणि शोषण “शेतकऱ्यांचा आसूड” यामध्ये प्रामुख्यानं मांडलं. या सर्व गोष्टी साहित्यातून पुढे आल्या म्हणून आजही चिरकाल आहेत.


खरंतर गावगाडा उध्वस्त झाला तो १९७२ च्या दुष्काळानंतर. जिथे पाणी आहे तो पश्चिम महाराष्ट्राचा भाग अधिक संपन्न तर मराठवाडा, विदर्भ परिसरातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटांनी मोडून पडला. आता तर सर्व महाराष्ट्राची स्थिती भयंकर आहे. ७२ च्या दुष्काळानंतर मात्र शेती, शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण माणसांच्या छटा साहित्यात निर्माण होऊ लागल्या. पाचोळा, बनगरवाडी, चारापाणी, झाडाझडती, पांगिरा, झोंबी, लालचिखल, बारोमास, तहान, गावठाण, खुळी अशा अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या.


हा इतिहास एकीकडं असताना मात्र आजचे किती साहित्यिक समाजाचं जीवनमान उघड्या डोळ्यांनी पाहतात आणि त्याला साहित्यात स्थान देतात? विदर्भ, मराठवाडा यासह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न तीव्र आहे. केवळ कर्जमाफी देऊन प्रश्न संपणार नाही तर हमीभाव मिळाला पाहिजे, कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्णता आली पाहिजे हे किती साहित्यिकांनी सांगितलं? सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे, तूर, कांदा, उस, सोयाबीन, कापूस यासह सर्वच पिकांना भाव मिळाला पाहिजे, यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना अनेक शेतकरी दगावले, काहींना अंधत्व आलं यांची किती साहित्यिक नोंद घेतली? शेतीशी निगडीत समस्या या साहित्यात यायला हव्या, त्यातून प्रश्नांना वाचा फुटायला हवी कुणालाच का वाटत नाही?

साहित्य हे जर समाजजीवनाचा आरसा मानले जाते तर कृषीप्रधान भारतात शेती, शेतकरी आणि गावगाडा अडगळीत का टाकला गेला? शेतकरी समाज जीवनात येत नाही का? स्वातंत्र्याच्या ७० वर्षाचा हिशोब जर साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या असेल. म्हणजे या व्यवस्थेनं केलेल्या हत्या आहेत आणि या हत्या कोणत्या साहित्यिकाने निर्भीडपणे आपल्या साहित्यात मांडल्या?? साडेतीन लाख शेतकरी मारले जातात आणि साहित्यात त्याची दखलही घेतली जात नाही हे मोठं दुर्दैव नाही का? शेती, साहित्य आणि वास्तव याचा विचार करताना चित्रपट क्षेत्रही सोडून चालणार नाही. टिंग्या, मदर इंडिया, लगान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी, गोष्ट कापूसकोंड्याची, धग असे बोटावर मोजण्या इतकेच सिनेमे का आले यावरही मोकळेपणाने चिंतन झालं पाहिजे. रात्रंदिवस राबराब राबणाऱ्या माझ्या शेतकरी बापाच्याच घरी का गरिबी नावाची अवदसा येते याचं चिंतन कोणत्या साहित्यिकांनी केलं का? नसेल केलं तर कधी करणार?
या सर्व प्रवाहात आजही काही बोटावर मोजण्या इतके साहित्यिक यावर लिहितात. त्यामध्ये लातूरचे भास्कर बडे यांनी चीकाळा नावाची कादंबरी लिहिली, उमरग्याचे बालाजी इंगळे, गझलकार सतीश दराडे, कवी संदीप जगताप, लेखक बालाजी सुतार, ऐश्वर्य पाटेकर वगैरे आदी अशी खूप कमी नावं आजही पाहायला मिळतात.


साहित्य हे जर समाजात नवचैतन्य निर्माण करत असेल, समाजाचा आरसा असेल तर साहित्यातली शेती, शेतकरी, वास्तव आणि शेतकऱ्यांचे भीषण प्रश्न साहित्यिकांना का दिसत नाहीत? शेतकऱ्यांचा सरकार करत असेलेला छळ साहित्यातून कधी पुढे येणार? आणि या सर्वांचा जेव्हा आपण तटस्थपणे विचार करतो, या मातीचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं विचार करतो तेव्हा लक्षात येतं की आजचा साहित्यिक हा बांधावर जाऊन वास्तव समजून घेत नाही हे लक्षात येतं, त्यांना समाजमनाच्या यातना जाणवत नाहीत आणि म्हणूनच खासदार राजू शेट्टी यांचा सवाल बरोबर आहे. आणि ते प्रत्येकाला पटायला हवं कारण वास्तव तुमच्या माझ्या समोर आहे. साहित्यिकांनी साहित्य संमेलनात येऊन समाजाच्या सर्व घटकांसोबत शेतकरी आणि शेती यावरही प्रकर्षाने चिंतन केलं पाहिजे आणि साहित्यकृती निर्माण केली पाहिजे तर आणि तरच शेती, माती, शेतकरी आणि गावगाडा जपला जाईल आणि जगवला जाईल. कारण शेती आणि साहित्य याचा जवळचा संबंध आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे.

#पटलं तर नक्की शेअर करा.. 🙏

@ विकास विठोबा वाघमारे
8379977650
सोलापूर