मंगळवार, २ जानेवारी, २०१८

भीमा कोरेगाव निमित्ताने....

क्षणोक्षणी इथे जाळपोळ, दूर दूर धूर होतो,
तुझी शिकवण शांततेची, आम्ही आजही जोपासतो..
दगड, माती देहावरी, उभा कट्टर उन्माद कोसळतो,
लाल अथांग सागर पण इथे वेगवेगळा उसळतो.....
      खूप काही बोलायचं होतं, खूप काही समजवायचं होतं, पण या व्यवस्थेमध्ये असलेल्या गुलामांनी आणि मालकांनी गांडू समाज म्हणून तुम्हाला आम्हाला एका पेटीत जेरबंद केलंय. जिथं तुम्ही मला मारणार आहात बाहेरील कट्टरता आणि द्वेष बघून आणीन मीही तुम्हाला मारणार आहे बाहेरील कट्टरता व द्वेष बघून. कट्टरता हवीच कशाला या मताचा मीही कधीकधी विचार करतो त्यावेळी उत्तर येतं. धगधगता इतिहास कधीच पुसला जात नसतो आणि जर तो त्रयस्त पुसणार असेल तर त्यासाठी समस्त मानव आपापला कट्टर स्वभाव दाखवतो. आम्हाला समाजात समरसता आणण्याचे शिकवलं गेलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आणि त्यांनी दिलेल्या लाखमोलाच्या विचारांचा पाईक होऊन छत्रपती शिवबांच्या स्वराज्याची संकल्पना डोक्यात ठेऊन आम्हाला एक समाज तयार करायचाय. तुमच्यात जर कट्टरता असेल तर तिथे थोडा बुद्धही घ्या, कारण बुद्ध आम्हाला कधीच द्वेष आणि उन्मादपणा शिकवत नाही. आणि जर तुमच्याकडे जनकल्याणाची संकल्पना असेल तर तिथे थोडा शिवाजी घ्या कारण शिवाजी कधीच स्वार्थ साधत नाही.
      भीमा – कोरेगाव दंगल करणे ही कट्टरतेची गलिच्छ पातळी झाली असं मी मानतो. या देशात जर आम्ही संविधान मानतो तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आमचं अबाधित राहणं गरजेच आहे. एखाद्या समूहाने आयोजित केलेला सोहळा जर दुसऱ्या समूहाला चीड आणणारा वाटत असेल तर आमची सदसद्विवेक बुद्धी गहाण पडली म्हणायला हरकत नाही. पण एक गोष्ट नक्की असते ती म्हणजे, “एक्शन आली की रिएक्शन येणार”.


      भावांनो, मी ज्या समाजात जन्मलो त्याचा मला अभिमान असण्याचं काही कारण नाही कारण माझा त्यात काहीच सहभाग नाही. मात्र आज पुरोगामी समजला जाणारा आपला महाराष्ट्र एकाएकी इतक्या पराकोटीच्या द्वेषाला गेला की थेट जातीय दंगली भडकल्या गेल्या. एका बाजूला काळजाच्या कोपऱ्यात बाबासाहेबांना जपणारा मी दुसऱ्या बाजूला शिवाजींची स्वराज्याची नीती घेऊन समाजाला समरसता हवीय म्हणून सांगतो. ज्या मराठ्यांनी गर्वच नाही तर माज असल्याचं सांगितलं त्यांना कर्तृत्वाचा सवाल विचारतो.
      भावांनो, दंगल करून, दगडफेक करून, अचानक हल्ला करून कोणताच विषय सुटत नाही. आज आम्हाला रोजगार, आरोग्य, शिक्षण, अन्न, पाणी, वस्त्र आणि भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी एकत्र येऊया. झेंडा, पक्ष, जात, धर्म आणि नेता याच्या पलीकडे जाऊन सरकारला जाब विचारू की आम्ही ज्या विकासासाठी सत्तेवर बसवलं त्याचे काय झाले ? हजारो तरु बेरोजगार का आहेत ? आजही मायभगिनीवर हल्ला का होतोय ? आणि या गांडू व्यवस्थेला ठामपणे विचारलं पाहिजे की एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बाप आजही उपाशी का झोपतो ?
आज भीमा कोरेगाव विषय समोर आलाय. मानवतेला काळिमा फासणारी घटना याची देही याची डोळा पाहिली. अंधाधुंद दगडफेक केली गेली, बायका पोरांचा विचार न करता अमानुषपणा दाखवला गेला. थेट गाड्या फोडल्या, पेटवल्या, मात्र यामध्ये तुमच्या माझ्यासारख्या बाबासाहेबांना आणि शिवरायांना एका सूत्रात बांधत समाजात समरसता आणण्याच्या दिशेने टाकलेली पाउलं आणि
“तुमचं – आमचं नातं काय ?
जय भीम – जय शिवराय” 
या सामाजिक सलोख्याच्या घोषणा, सगळंच हवेत विरलं....

■ © विकास विठोबा वाघमारे