कोण कुठला अमीर खान येतो.... खेड्यामातीच्या माणसांना आवाहन करतो... अन पाण्यानं होरपळणाऱ्या अखंड महाराष्ट्राला पाणीदार करण्याची शपथ घेऊन छपरात राहणारी... पाटात पाण्यासह वाहणारी... वासरा कोकरात रमणारी..... रांगडी माणसं थेट शिवार पाणीदार करणार या इराद्यानं बांधा - बांधावर झुंडीनं खोऱ्या – पाट्यासह लढायला बाहेर पडतात.
एकजुटीनं s ss पेटलं रान s ss
तुफान आलया s s s
काळ्या भुईच्या भेटीला या s s s
आभाळ आलया s s s
अशा गगनभेदी स्वरांनी खेड्यामातीच्या माणसांना लढायला बळ दिलं. तुम्ही ज्या भुईच्या उशाला राहता त्या भुईला पाणीदार करायला हवं.. पाणी नाही, पाऊस नाही म्हणून आर्जव करण्यापेक्षा एकजुटीनं खेडी पाणीदार करू म्हणत माणसं थेट मैदानात येतात हे सगळं किती स्वप्नवत वाटतंय... अमीर खान कोणय...? किरण राव कोणय ... एकेकाळी आमच्या माणसांना टीव्हीच्या डब्यातून दर्शन देणारी ही अतिशय व्हीआयपी मंडळी का येतात माझ्या शिवारात ? का आवाहन करतात माझ्या बापाला, भावाला, दोस्ताला अन चिखलमातीतल्या खेडगळ माणुसकीबाज माणसाला.....
पाणी अडवा अन पाणी जिरवा म्हणत राज्य सरकारनं हजारो कोटींचा आकडा आमच्या माथ्यावर मारलाय.. कुणाची धरणं भरली...? कुणाच्या शिवारातपाणी खेळलं ? देव जाणे.. मात्र सरकारच्या पुढं चार पाउलं जात आमचं पाणी आम्ही एकजुटीनं अडवायला शिकलो.. कुणीतरी अमीर येऊन आमच्या डोळ्यात अंजन घालून गेलाय हे पुढच्या गावगाड्याच्या समृद्धीसाठी थोडकी गोष्ट नाही. तुम्हाला मला गावगाडा वाचवायचा असेल तर हे करायलाच हवंय... एव्हाना हे सुरूही झालंय... जात, धर्म, पंथ, राजकारण, पक्ष, नेता, बोर्ड, फलक, बॅनर कधीच, कुठेच दिसला नाही. सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा मी जिंकली पाहिजे. माझ्या गावाने, माझ्या माणसांनी, माझ्या मातीसाठी मी जिंकलीच पाहिजे ही जी उर्मी या सर्व गेल्या चार – सहा महिन्यात पहायला मिळाली. नक्कीच ती आयुष्यात प्रचंड आणि प्रचंड बळ देणारी ठरेल. मी स्वतः या सर्व प्रवाहात किंचितसाही सहभागी झालो नाही, होऊ शकलो नाही शल्यही मनात आहेच. मात्र आता या सर्व घटनेवर नजर फिरवतो तेव्हा जाणवायला लागतंय की माण, खटाव सारखा दुष्काळ पट्टा असो नाहीतर लातूरसारखा पाण्याची बोंब असलेला तहानलेला जिल्हा असो.. पश्चिम महाराष्ट्रात धरण उशाला असताना होरपळणारी पिकं, गावंसुद्धा बघितली.
या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या निमित्तानं लोकांमधील उत्साहाचा महापूर पाहीला.... डोंगराला भिडणारी माणसं दुष्काळाला हरवायला निघालेली पाहिली.. कुणाच्या आर्थिक बजेटकडं डोळा लावून बसण्यापेक्षा मी श्रमदानाच्या माध्यमातून गाव समृद्ध करणार ही जिद्द पाहिली... अमीर भाई तू ग्रेट आहेस... आमच्या, माझ्या, आपल्या चिखलमातीतल्या माणसांना गाव पाणीदार करण्यासाठी उभं केलं.. आभाळ जिंकण्याचा ध्यास असतो मातीच्या माणसांचा. मात्र सुरुवात कुणीतरी करायला हवं असतं नेमकं तेच तू केलंस... आता पाउस सुरु झालाय.. एव्हाना बऱ्याच ठिकाणी परिणामही दिसायला लागलाय. स्पर्धा कुणी हरली माहित नाही. मात्र या श्रमदानात हातभार लावलेला प्रत्येक जीव ही स्पर्धा जिंकलाय हे मी ठाम सांगू शकेन इतका विश्वास तर मिळालाय हे सर्व बघून....
#पटलं_तर_शेअर_करा...
- विकास विठोबा वाघमारे
Vwaghamare0@gmail.com
8379977650

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा