शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

वाल्मिकी होण्याच्या निमित्ताने...

जन्म एका परिवारात सांभाळ दुसऱ्याच परिवारात आणि थकलेल्या जिवाने आता तिसऱ्या परिवारात आडोसा घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या नेत्याला राजकीय ग्रहण लागलेले पाहायला मिळणे हि दुर्दैवाची गोष्ट आहे. कोकणपट्ट्यातलं परवलीचं नाव म्हणून सुरवातीच्या काळात पुढं आलं नंतर जातीच्या आधारे थेट मुख्यमंत्रीच. नारायण राणे हे शिवसेनेतुन राजकीय नेते म्हणून जन्माला आले. युती सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते. १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर जुलै २००५ पर्यंत शिवसेनेत राहिले आणि नंतर मात्र काँग्रेसच्या आडोश्याला जाण्याचं पाप केलं. पुढं दोन्ही मुलांना आपल्या हाताला धरून राजकारणात आणून सोडलं. आता निलेश राणे व नितेश राणे हेदेखील तोलामोलाच्या राजकारणात आहेत. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमध्ये घेतले जाणाऱ्या नावाचे कालांतराने हसे झाले.  कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून असलेली त्यांची ओळख आता कित्येक पावसाळे सोसून झडलेल्या छत्रीप्रमाणे झालीय. आठवण म्हणून माचोळीला सांभाळत ठेवायची कि रहदारीच्या खोलीत शोकेसमध्ये एवढाच प्रश्नय आता.


शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या नेत्याने काँग्रेसवर तरी कुठे मनापासून प्रेम केलं होतं! अवघ्या दोन वर्षात म्हणजे दोन हजार आठ साली पक्षविरोधी कारवाया केल्याचा डाग माथी बसलाय. नंतर प्रहारासारखे वृत्तपत्र चालवलं. तेवढ्यावरच थांबले नाहीत तर पुन्हा दोन हजार नऊला काँग्रेसच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची शाब्बासकी घेतली. माफी, दिलगिरी करून मग कारवाई मागे घेण्यात आल्याचा इतिहास तर साक्ष देतोय. त्यानंतर मात्र पुन्हा जाऊ तिथे खाऊ याप्रमाणे महसूलमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली.

एवढं सगळ असताना गेल्या तीन- चार वर्षात त्यांना मोठ्या राजकीय ग्रहणाला तोंड द्यावं लागतंय. मोदी लाटेने हिंदकळलेल्या पक्षांसोबत रसातळाला गेलेले राजकीय भवितव्य घेऊन तीन चार वेळा प्रायचीत्य भोगावं लागलं. हे पाप केवळ त्यांनी केलेल्या राजकारणाचं आहे. आता भाजपामय प्रवास सुखकर व्हावा यासाठी भूकंप करण्याच्या बेतात असल्याचं ऐकायला मिळतंय. वाल्याचा वाल्मिकी करण्याचा प्रयत्न भाजपा करेलही मात्र त्या वाल्मिकीने नव्याने वादळाशी दोस्ती करताना आपले भवितव्य उज्वल आणि शाबित होणार नाही याची काळजी घ्यावी. भाजपा अंत्योदय घटकाचा विकास म्हणून सर्वाना सामावून घेईलही मात्र इतिहास सांगतोय कि या नेत्याने आपले बुड इथे कायमस्वरूपी टेकवले का हे कसे कळणार....  मात्र कणकवलीपासून, कोकणमार्गे महाराष्ट्रात राणे वाल्मिकी होण्याने काही भूकंप वगैरे अजिबात होणार नाही. बाकी आओ साथ चले.. मंजिल तक जाना है... आणि सबका साथ वगैरे वगैरे सगळं ठिकाय. खूप शुभेच्छा.

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

तपशील साभार- गुगल

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

एक्कावन्न हजाराच्या निमित्ताने....

थाकथिक लोकहो, विमानाचा प्रवास खर्चिक आहे म्हणून मी बसतही नाही आणि कधी बोंबलतही नाही. कॅनेडीयन पॉप स्टार जस्टिन बिबर हा कलाकार नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये १० मे रोजी येऊन गेला. गायला कि नाही माहित नाही.  एकूण ४५ हजार दर्शक या कार्यक्रमाला उपस्थित असा अंदाजही वर्तवला गेला. स्टेडियमच्या  दीड  किलोमीटर परिसरात व्यवस्था केली होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 76 हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत तिकिटांची किंमत होती. बिनदिक्कत तिकिटे हातोहात संपलीसुद्धा. कॅनेडीयन पॉपस्टारला कोट्यावधींची माया गुपचूप काही तासात दिलीत अन आता गावभर बोंबलता ते पोलीस कल्याण निधी कार्यक्रमासाठी. 


दुखणं ते नाहीच आहे. तुमचं दुखणं ते आहे कि एका मुख्यमंत्र्यांची बायको हे कसं करू शकते! केवळ (जस्टीन बिबरच्या मानाने) ५१ हजाराचे तिकीट आहे म्हणून गावभर गलगा करताय. पोलीस कल्याण निधीसाठी कार्यक्रम होतोय. ज्यांना परवडते ते जातीलच. पळवाटा काढणाऱ्या हरामखोरांची या देशात कमी नाही. नवे नवे मुद्दे काढायचे अन लोकांना चकवून सोडायचं एवढेच उद्योग. मध्येच कुणीतरी एक आवई उठवली अमृता फडणवीस नक्षलवाद्यांसाठी कार्यक्रम करते! काय गंमत आहे दळभद्री विचारधारेची. मुख्यमंत्र्यांची बायको नक्षलवाद्यासाठी कार्यक्रम करते अन तिचा नवरा देश, राज्य विकासाच्या सर्वोच्च स्थानी घेऊन जाण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतोय. काय काय बोलाल याचा थांगपत्ताच लागत नाही. ज्या राज्यात जस्टीन बिबर चालतो त्या राज्यात एक मराठमोळी गायिका का चालत नाही तर ती गायिका एका मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे, ती उजव्या विचारधारेतील आहे, ती राज्य सुजलाम सुफलाम करू पाहणाऱ्याची बायको आहे, ती एका विशिष्ठ समाजातील आहे म्हणून.

कलाकार हा कलाकार असतो. जात, धर्म, पंथ आणि व्यक्ती याच्या पलीकडे जाऊन कलाकाराला सन्मान देण्याची काय अपेक्षा करणार. तोडू का फोडू करण्यासाठी टपलेल्या दुर्जन शक्तींनो, हा महाराष्ट्र सर्वांच्या साथीने पुढे जातोय. सकारात्मकता ही महत्त्वाची ठरणार आहे. आओ साथ चले.....

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

समाजातलं हे वास्तव...

इडा पीडा टळू दे,
बळीचे राज्य येऊ दे...
असा आर्जव करणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीतल्या महाराष्ट्रा तुझ्या पोटी जन्माला आलेल्या माझ्या उपवर होत असलेल्या भगिणीला शेतकऱ्यांच्या दळभद्री जगण्याच्या यातना छळताहेत। काकाने आत्महत्या केली उद्या बाप मरेल म्हणून लग्नाला आलेली एक बहीण हकनाक गेली। कोणत्या परिवर्तनाची वाट पाहतोय आपण। अरे ज्या बापानं शेतीसाठी अख्खा जलम मातीत पुरला, फाटका धोतराचा सोगा अन एक काळवंडलेली बंडी घालून काळ्या भुईत समरस झाला। कधी पावसानं जाच केला तर कधी सरकारनं, कधी माणसांनी काळजाला वार केला तर कधी आपल्याच कर्मानं। किती बळी गेले? कुणासाठी गेले? कशासाठी गेले? आणि का गेले? याचे उत्तर देण्याची लाज वाटते। शेतकरी कर्जमाफीने माझ्या बापाला स्वातंत्र्य मिळणार नाही माझ्या बापाला जगणं आनंदी करायचं असेल तर सरकार बापाच्या मातीला माय मानाला शिका। कर्जमाफी ही मलमपट्टी आहे ऑपरेशन तर हमीभाव आहे। प्रश्न इथे नाही संपत इथे तर सुरुवात होते।
मोर्चे, आंदोलन, निषेध कुणासाठी काढू? बापाच्या सन्मानासाठी? जगणं मंजूर करण्यासाठी? माझ्या मातीच्या लेकरांच्या हमीभावासाठी? गेलेल्या बहिणीला न्याय देण्यासाठी? तमाम बळीराजाला दोरीतून मुक्त करा यासाठी?

कित्ती भयाण वास्तवय, नेटवर्किंग स्पीड अन जगण्याची नवी नवी पायवाट समोर येत असताना मातीत जाणाऱ्या पिढ्या कुणाकडे करणार आर्जव? ज्या बहिणीने कर्ज काढायला लागू नये म्हणून सगळंच संपवून टाकलं न तिला विचारा न बापाला काय यातना होत्या। जगणं रस्त्यावर नाही भावांनो। इतकं उदार, निराश सहज नसतं होता येत। ज्याच्या घराला आग लागते न त्याला कळतं घर बांधायला काय यातना झाल्या होत्या। अरे अवघ्या बारावीत शिकणाऱ्या एका बहिणीने बापासाठी जगणं उधळून दिलं। परभणी जिल्ह्यातल्या जवळाझुटातल्या कर्जबाजारी व नापिकीमुळे वडिलांच्या आत्महत्येच्या भितीने सारिका झुटे या भगिणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या आता मला धक्कादायक नाही वाटत पण त्यासाठी केली न ते काळीज कापत जाणारं वास्तवय।

उन्हातानात कष्ट करून पैसा पैसा जमवला अन मग मातीची ओटी भरली मात्र पावसाला अजून ओल वाटेना। वावरात पीक जळत असताना मनात बाप जळतो। ते जळण कुणाच्या नावानं नाही सरकार, तुमच्या तर अजिबात नाही पण जगण्याच्या तळमळीला आर्जव करताना मनात जळताना बाप हाय लागून कधी जातो हे कुणालाच समजत नाही। कालपरवापर्यंत बापाची हाय लेकापर्यंत आली होती आता लेकीपर्यंत आलीय।

हे भयाण सगळं वास्तव कळतं एसीपासून थेट सगळ्याच साहेबाला पण वळत नाही, हाच मुद्दाय।

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650


मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

नेता, आरोप आणि सत्य!

चळवळीच्या वळचणीला राहून समाजातील तत्सम घटकांसाठी काम करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र ओळखतो। कुणी कोणत्या चळवळीत काम करावं हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग समजू आणि असतोही। कुणी शेतकरी चळवळीत काम करून शेतभाताच्या पखाली वाहणाऱ्या माय बापाला सन्मान देण्यासाठी एल्गार केला तर कुणी दिन दलित चळवळीला व्यापक रूप देऊन गावकुसाबाहेरच्या जगण्याला समाजासमोर आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला। भटक्या, कष्टकरी जनतेच्या हक्कासोबत लढताना कधी राजकीय वळचणीला आले हे त्यांनाही समजले नसेल (?) मात्र गेल्या काही वर्षांमध्ये घडत असलेलं हे वास्तव म्हणा की दुर्दैव मात्र कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की।
नुकताच महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांवर बलात्काराचा आरोप केला गेलाय। नेमकं खरं किती आणि खोटं किती हे आजच्या घडीला सांगणं अतिघाई होईल। गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी दलित चळवळीतील नेतृत्व करत असलेल्या लक्ष्मण माने यांच्यावर तसाच आरोप झाला त्याचं पुढं काय हे मलातरी अजून कळलेलं नाही। त्यानंतर दलित आणि डाव्या विचारसरणीचे नेते , महाराष्ट्राचे आघाडी सरकारचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर असाच आरोप झाला। त्याचं पुढं काय हेही समजलं नाही। नुकताच मागच्या आठवड्यात लोकमान्य टिळकांच्या पिढीतील रोहित टिळक यांच्यावर तसाच आरोप झाला। महिलांवर अत्याचार नेमका झाला किंवा नाही हे सांगता येणार नाही। त्याची चौकशी तर झालीच पाहिजे मात्र या सर्व प्रकरणात पाणी मुरतंय हे लक्षात घेतलं पाहिजे।

चळवळीतून वर येणारा सामान्य कार्यकर्ता जेव्हा नेता होतो तेव्हा असे नक्कीच वेगवेगळे आरोप केले जातात मात्र अशी चिखलफेक होत असेल तर चळवळीतून उभा होत असलेलं गेल्या अनेक वर्षाचा नेता आणि चळवळीचा चेहरा गमवावा लागू नये। ज्यांनी अशा गोष्टी केल्या त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे किंबहुना सामान्यांपेक्षा जास्त कारवाई झाली पाहिजे मात्र जनतेच्या समोर सत्य आले पाहिजे।

कुटील डाव रचून एखाद्या नेतृत्वाची बदनामी करण्याचा जर प्रयत्न असेल तर राजकारण एका मोठ्या वाईट वळणावर आहे। धुतल्या तांदळाचे कुणी असतील का माहीत नाही मात्र या सर्व प्रकरणात न्यायव्यवस्थेने चोख काम करून सामान्य जनतेला सत्य सांगावं।

नाहीतर मग ढोबळे, टिळक, माने यांच्यानंतर सदाभाऊ खोत आणि मग पुन्हा नवा चेहरा याच रेषेत येईल...... एखाद्या दीडदमडीच्या षडयंत्रात कित्येक वर्षाची चळवळ मोडून पडू नये। बस्स, एकच अपेक्षा।

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650
#विवा