मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

नेता, आरोप आणि सत्य!

चळवळीच्या वळचणीला राहून समाजातील तत्सम घटकांसाठी काम करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र ओळखतो। कुणी कोणत्या चळवळीत काम करावं हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग समजू आणि असतोही। कुणी शेतकरी चळवळीत काम करून शेतभाताच्या पखाली वाहणाऱ्या माय बापाला सन्मान देण्यासाठी एल्गार केला तर कुणी दिन दलित चळवळीला व्यापक रूप देऊन गावकुसाबाहेरच्या जगण्याला समाजासमोर आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला। भटक्या, कष्टकरी जनतेच्या हक्कासोबत लढताना कधी राजकीय वळचणीला आले हे त्यांनाही समजले नसेल (?) मात्र गेल्या काही वर्षांमध्ये घडत असलेलं हे वास्तव म्हणा की दुर्दैव मात्र कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की।
नुकताच महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांवर बलात्काराचा आरोप केला गेलाय। नेमकं खरं किती आणि खोटं किती हे आजच्या घडीला सांगणं अतिघाई होईल। गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी दलित चळवळीतील नेतृत्व करत असलेल्या लक्ष्मण माने यांच्यावर तसाच आरोप झाला त्याचं पुढं काय हे मलातरी अजून कळलेलं नाही। त्यानंतर दलित आणि डाव्या विचारसरणीचे नेते , महाराष्ट्राचे आघाडी सरकारचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर असाच आरोप झाला। त्याचं पुढं काय हेही समजलं नाही। नुकताच मागच्या आठवड्यात लोकमान्य टिळकांच्या पिढीतील रोहित टिळक यांच्यावर तसाच आरोप झाला। महिलांवर अत्याचार नेमका झाला किंवा नाही हे सांगता येणार नाही। त्याची चौकशी तर झालीच पाहिजे मात्र या सर्व प्रकरणात पाणी मुरतंय हे लक्षात घेतलं पाहिजे।

चळवळीतून वर येणारा सामान्य कार्यकर्ता जेव्हा नेता होतो तेव्हा असे नक्कीच वेगवेगळे आरोप केले जातात मात्र अशी चिखलफेक होत असेल तर चळवळीतून उभा होत असलेलं गेल्या अनेक वर्षाचा नेता आणि चळवळीचा चेहरा गमवावा लागू नये। ज्यांनी अशा गोष्टी केल्या त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे किंबहुना सामान्यांपेक्षा जास्त कारवाई झाली पाहिजे मात्र जनतेच्या समोर सत्य आले पाहिजे।

कुटील डाव रचून एखाद्या नेतृत्वाची बदनामी करण्याचा जर प्रयत्न असेल तर राजकारण एका मोठ्या वाईट वळणावर आहे। धुतल्या तांदळाचे कुणी असतील का माहीत नाही मात्र या सर्व प्रकरणात न्यायव्यवस्थेने चोख काम करून सामान्य जनतेला सत्य सांगावं।

नाहीतर मग ढोबळे, टिळक, माने यांच्यानंतर सदाभाऊ खोत आणि मग पुन्हा नवा चेहरा याच रेषेत येईल...... एखाद्या दीडदमडीच्या षडयंत्रात कित्येक वर्षाची चळवळ मोडून पडू नये। बस्स, एकच अपेक्षा।

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650
#विवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा