धर्मा पाटील गेल्याची बातमी वाचली अन क्षणभर डोळ्यासमोर अंधार पसरला। कोणतंही सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं नसतं, विरोधात राहूनच त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं हे वाचलंय. शेताभातात राबणारा धर्मा पाटील नावाचा 80 वर्षाचा शेतकरी सरकारच्या दखल न घेण्यामुळे आत्महत्या करून देवाघरी गेला. शेताभातात राबणाऱ्या बापाला नव्या इंडियाचं स्वप्न दाखवलं गेलं। अर्थात ते वाईट नसेलही मात्र त्यामार्फत सरकार करत असलेली कार्यवाही ही हरामखोर अधिकाऱ्यांच्या तकलादू भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या जीवावर उठली. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा विखरण इथला हाडाची काडं झालेला शेतकरी बाप मंत्रालयात कित्येक हेलपाटे घालून थकला. सरकारनं सौर ऊर्जा प्रकल आणला आणि शेती संपादित केली. चार पट मोबदला देतो म्हणणाऱ्या औलादी एक पटही देऊ शकल्या नाहीत. 5 एकर जमिनीचे केवळ 4 लाख रुपये हातावर टेकवले गेले। 80 वर्षीय शेतकरी बाप मंत्रालयाच्या वाऱ्या करतोय, सुसंस्कारित सरकार मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती करणार म्हणत योजना आखत असताना प्रशासनातील मुजोर अधिकारी असतील किंवा मुख्य शासनाचे भाट असतील यांनी शेतकरी माय बाप, मजूर, कष्टकरी समाजाला कायम होरपळत ठेवलं। आज धर्मा पाटील गेले हे वाचलं आणि डोळे भरून वाहायला लागले। शरद जोशींनी सांगितलं होतं हा कष्टकरी आणि एक दाण्याचे हजार दाणे करणारा आमचा बाप योद्धा शेतकरी म्हणून जगला पाहिजे। पण या व्यवस्थेला जर शेतकरी बळीच घ्यायचा असेल, शेतकऱ्यांना सन्मान घायचाच नसेल तर काय? सरकार कार्यवाही करताना कमी पडत असेल तर काय? 80 वर्षाच्या धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्याला मंत्रालय दरबारी न्याय मिळत नाही, दखल घेतली जात नाही म्हणून आत्महत्या करावी लागते यापेक्षा या कृषिप्रधान देशात दुर्दैव काय असू शकते?
मावळच्या ऊसदर आंदोलनात घातलेली गोळी आणि आता धर्मा पाटील यांनी केलेली आत्महत्या माझ्यासारखा शेताभातात राबणाऱ्यांच्या पोटी जन्माला आलेला किसानपुत्र एकाच तराजूत तोलतो, आणि ते तोललंच पाहिजे। धर्मा पाटील हे एक नाहीत हजार असे गेले पण आता जाग यायला हवीय. मी निषेध कुणा कुणाचा करू? सरकारचा करू? सरकारी भाटांचा करू? अधिकाऱ्यांचा करु की या गांडू व्यवस्थेचा करू......
😑
😑
😑
😑
© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
सोलापूर


