रविवार, ९ डिसेंबर, २०१८

रामदास आठवलेंच्या निमित्ताने...

एखाद्या नेत्याने घेतलेली भूमिका नसेल आवडली तर सोडून द्या, निर्णय नसेल पटला तर सोडून द्या. नेता मोठा कशाने होतो तर त्याच्या पाठीमागे असलेलं जनमत, कामाची तळमळ आणि भूतकाळातला प्रचंड संघर्ष.....
काल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मारहाण झाल्याचे समजले आणि दुखः झालं. खरंतर एखाद्याची भूमिका नाही आवडली तर त्यांना आपलं मानणं सोडून द्यायला हवं. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या दलित नेत्याला एक चापट लावून तुम्ही कोणतं दिव्य कार्य करणार आहात. ज्यांनी समाजाला एका लयीत जोडून ठेवलं त्यांना तुम्ही ही कोणती शिक्षा देणार आहात. दलित आणि इतर समाज म्हणून जेव्हा समाजात काही गोष्टी घडतात तेव्हा रामदास आठवले यांची प्रतिक्रिया ही दलितांच्या विरोधात नसते मात्र दोन्ही समाजाला सोबत घेऊन दलितांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने टाकलेलं पाउल असते. गेल्या अनेक वर्षांपासून आठवले नावाचं वादळ ऐकून होतो. महाराष्ट्रासह इतर अनेक ठिकाणीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या माध्यामातून त्यांनी आपला राजकीय अजेंडा जाहीर करून धाडसाने निर्णय घेतला असेल आणि तेवढ्याच धाडसानं निर्णय बदललाही असेल मात्र कधी राजकारण करण्यासाठी समाजात आग ओतण्याचं काम या पँथरने केल्याचं ऐकलं नाही.

खऱ्या अर्थाने दलित, वंचित आणि शोषित घटकांवर अन्याय होतो तेव्हा रामदास आठवले आवाज देताना पाहिलंय. रामदास आठवले नावाचा नेता एका रात्रीत तयार झालेला नाही, कुण्या मिडीयाने डोक्यावर घेऊन तयार केलेला नाही, कुणाच्या पाठीमागे फिरून तयार झालेला नाही तर खेड्यापाड्यात दलित समाजाच्या वाड्यावस्तीत फिरून एक एक पँथर जमा करून त्यांच्या मनामध्ये स्फुल्लिंग पेटवण्याचं काम यांनी केलं. साधारण घरातून घोंघावत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रीपदापर्यंत मारलेली मजल ही त्यांच्या इतिहासजमा झालेल्या संघर्षाचे आणि कार्याचे मोल आहे. गावागावात आठवले साहेब अंगार है अशा घोषणा बाहेर पडताना पाहिल्या तेव्हा त्या फाटक्या माणसाची उंची तुम्हाला आम्हाला लक्षात येते. दलित समाजाला इतर नेत्यांनी काय दिलं आणि आठवलेंनी काय दिलं हे समजून घ्यायचं असेल तर आठवलेंचा संघर्ष जाणून घ्या. आपलं काम ही आपली आयडेंटीटी असली पाहिजे आणि तशी आयडेंटीटी आठवलेंनी तयार केली. दलित समाजाच्या मागण्या आणि उत्कर्षासाठी तळमळत उन्हात बसण्यापेक्षा भाजपाच्या सोबतीने जाऊन एखादं मंत्रिपद घेऊन समाजाला जेवढा न्याय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला तर रामदास आठवले याचं बिघडलं कुठं?

दलितांच्या हितासाठी सातत्याने काम करून झोपडपट्टीतल्या दलितांचे प्रतिनिधित्व करणारे रामदास आठवले यांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा कार्यकर्ता आठवतो. कारण देशाला बळ दिले पाहिजे म्हणत चुकीचे ते चुकीचे आणि बरोबर ते बरोबर म्हणण्याची ताकद रामदास आठवले ठेवतात. आणि नेमकं हेच दलितांचे नेते म्हणून मिरवणाऱ्यांना पचनी पडत नाही आणि मग अशाप्रकारचा हैदोस मांडला जातो...
कदम मिलाकर चलना होगा
बाधाएं आती हैं आएं
घिरें प्रलय की घोर घटाएं,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएं,
निज हाथों में हंसते-हंसते,
आग लगाकर जलना होगा।
कदम मिलाकर चलना होगा।

रामदास आठवले यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध आणि रामदास आठवले यांना शुभेच्छा ! लगे रहो....
#पटलं तर नक्की शेअर कराच
- विकास विठोबा वाघमारे
Vwaghamare0@gmail.com

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

तुफान आलया...

कोण कुठला अमीर खान येतो.... खेड्यामातीच्या माणसांना आवाहन करतो... अन पाण्यानं होरपळणाऱ्या अखंड महाराष्ट्राला पाणीदार करण्याची शपथ घेऊन छपरात राहणारी... पाटात पाण्यासह वाहणारी... वासरा कोकरात रमणारी..... रांगडी माणसं थेट शिवार पाणीदार करणार या इराद्यानं बांधा - बांधावर झुंडीनं खोऱ्या – पाट्यासह लढायला बाहेर पडतात. 

एकजुटीनं s ss पेटलं रान s ss 
तुफान आलया s s s
काळ्या भुईच्या भेटीला या s s s
आभाळ आलया s s s

अशा गगनभेदी स्वरांनी खेड्यामातीच्या माणसांना लढायला बळ दिलं. तुम्ही ज्या भुईच्या उशाला राहता त्या भुईला पाणीदार करायला हवं.. पाणी नाही, पाऊस नाही म्हणून आर्जव करण्यापेक्षा एकजुटीनं खेडी पाणीदार करू म्हणत माणसं थेट मैदानात येतात हे सगळं किती स्वप्नवत वाटतंय... अमीर खान कोणय...? किरण राव कोणय ... एकेकाळी आमच्या माणसांना टीव्हीच्या डब्यातून दर्शन देणारी ही अतिशय व्हीआयपी मंडळी का येतात माझ्या शिवारात ? का आवाहन करतात माझ्या बापाला, भावाला, दोस्ताला अन चिखलमातीतल्या खेडगळ माणुसकीबाज माणसाला.....

पाणी अडवा अन पाणी जिरवा म्हणत राज्य सरकारनं हजारो कोटींचा आकडा आमच्या माथ्यावर मारलाय.. कुणाची धरणं भरली...? कुणाच्या शिवारातपाणी खेळलं ? देव जाणे.. मात्र सरकारच्या पुढं चार पाउलं जात आमचं पाणी आम्ही एकजुटीनं अडवायला शिकलो.. कुणीतरी अमीर येऊन आमच्या डोळ्यात अंजन घालून गेलाय हे पुढच्या गावगाड्याच्या समृद्धीसाठी थोडकी गोष्ट नाही. तुम्हाला मला गावगाडा वाचवायचा असेल तर हे करायलाच हवंय... एव्हाना हे सुरूही झालंय... जात, धर्म, पंथ, राजकारण, पक्ष, नेता, बोर्ड, फलक, बॅनर कधीच, कुठेच दिसला नाही. सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा मी जिंकली पाहिजे. माझ्या गावाने, माझ्या माणसांनी, माझ्या मातीसाठी मी जिंकलीच पाहिजे ही जी उर्मी या सर्व गेल्या चार – सहा महिन्यात पहायला मिळाली. नक्कीच ती आयुष्यात प्रचंड आणि प्रचंड बळ देणारी ठरेल. मी स्वतः या सर्व प्रवाहात किंचितसाही सहभागी झालो नाही, होऊ शकलो नाही शल्यही मनात आहेच. मात्र आता या सर्व घटनेवर नजर फिरवतो तेव्हा जाणवायला लागतंय की माण, खटाव सारखा दुष्काळ पट्टा असो नाहीतर लातूरसारखा पाण्याची बोंब असलेला तहानलेला जिल्हा असो.. पश्चिम महाराष्ट्रात धरण उशाला असताना होरपळणारी पिकं, गावंसुद्धा बघितली.

या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या निमित्तानं लोकांमधील उत्साहाचा महापूर पाहीला.... डोंगराला भिडणारी माणसं दुष्काळाला हरवायला निघालेली पाहिली.. कुणाच्या आर्थिक बजेटकडं डोळा लावून बसण्यापेक्षा मी श्रमदानाच्या माध्यमातून गाव समृद्ध करणार ही जिद्द पाहिली... अमीर भाई तू ग्रेट आहेस... आमच्या, माझ्या, आपल्या चिखलमातीतल्या माणसांना गाव पाणीदार करण्यासाठी उभं केलं.. आभाळ जिंकण्याचा ध्यास असतो मातीच्या माणसांचा. मात्र सुरुवात कुणीतरी करायला हवं असतं नेमकं तेच तू केलंस... आता पाउस सुरु झालाय.. एव्हाना बऱ्याच ठिकाणी परिणामही दिसायला लागलाय. स्पर्धा कुणी हरली माहित नाही. मात्र या श्रमदानात हातभार लावलेला प्रत्येक जीव ही स्पर्धा जिंकलाय हे मी ठाम सांगू शकेन इतका विश्वास तर मिळालाय हे सर्व बघून....

#पटलं_तर_शेअर_करा...

- विकास विठोबा वाघमारे
Vwaghamare0@gmail.com

8379977650

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

श्रद्धांजली निमित्ताने.....

धर्मा पाटील गेल्याची बातमी वाचली अन क्षणभर डोळ्यासमोर अंधार पसरला। कोणतंही सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं नसतं, विरोधात राहूनच त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं हे वाचलंय. शेताभातात राबणारा धर्मा पाटील नावाचा 80 वर्षाचा शेतकरी सरकारच्या दखल न घेण्यामुळे आत्महत्या करून देवाघरी गेला. शेताभातात राबणाऱ्या बापाला नव्या इंडियाचं स्वप्न दाखवलं गेलं। अर्थात ते वाईट नसेलही मात्र त्यामार्फत सरकार करत असलेली कार्यवाही ही हरामखोर अधिकाऱ्यांच्या तकलादू भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या जीवावर उठली. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा विखरण इथला हाडाची काडं झालेला शेतकरी बाप मंत्रालयात कित्येक हेलपाटे घालून थकला. सरकारनं सौर ऊर्जा प्रकल आणला आणि शेती संपादित केली. चार पट मोबदला देतो म्हणणाऱ्या औलादी एक पटही देऊ शकल्या नाहीत. 5 एकर जमिनीचे केवळ 4 लाख रुपये हातावर टेकवले गेले। 80 वर्षीय शेतकरी बाप मंत्रालयाच्या वाऱ्या करतोय, सुसंस्कारित सरकार मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती करणार म्हणत योजना आखत असताना प्रशासनातील मुजोर अधिकारी असतील किंवा मुख्य शासनाचे भाट असतील यांनी शेतकरी माय बाप, मजूर, कष्टकरी समाजाला कायम होरपळत ठेवलं। आज धर्मा पाटील गेले हे वाचलं आणि डोळे भरून वाहायला लागले। शरद जोशींनी सांगितलं होतं हा कष्टकरी आणि एक दाण्याचे हजार दाणे करणारा आमचा बाप योद्धा शेतकरी म्हणून जगला पाहिजे। पण या व्यवस्थेला जर शेतकरी बळीच घ्यायचा असेल, शेतकऱ्यांना सन्मान घायचाच नसेल तर काय? सरकार कार्यवाही करताना कमी पडत असेल तर काय? 80 वर्षाच्या धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्याला मंत्रालय दरबारी न्याय मिळत नाही, दखल घेतली जात नाही म्हणून आत्महत्या करावी लागते यापेक्षा या कृषिप्रधान देशात दुर्दैव काय असू शकते?
मावळच्या ऊसदर आंदोलनात घातलेली गोळी आणि आता धर्मा पाटील यांनी केलेली आत्महत्या माझ्यासारखा शेताभातात राबणाऱ्यांच्या पोटी जन्माला आलेला किसानपुत्र एकाच तराजूत तोलतो, आणि ते तोललंच पाहिजे। धर्मा पाटील हे एक नाहीत हजार असे गेले पण आता जाग यायला हवीय. मी निषेध कुणा कुणाचा करू? सरकारचा करू? सरकारी भाटांचा करू? अधिकाऱ्यांचा करु की या गांडू व्यवस्थेचा करू......😑😑😑😑

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर

मागल्या रांगेतून..

पिढ्यानपिढ्या घराणेशाहीच्या नावाखाली गुजराण करणाऱ्या आणि देशाला खाईत लोटणाऱ्या तथाकथित पिढीजात नेत्याला कुणी मोदी नावाच्या फकीरानं आणि चहा विकण्याची लायकी असणाऱ्याने मागे बसवलं म्हणून किती मोठा आगडोंब उसळला. ७० वर्ष आपण ज्या देशामध्ये राजसत्ता भोगली त्या मातीतला शेतकरी बाप अजून बांधावर उघडा नागडा का फिरतो ? बांधाबांधावर संघर्ष जन्माला येतो आणि झडत चाललेल्या बाभळीला का संपतो ? जिथं अखंड सत्ता मिळते त्या देशात हजारो कोटींच्या घोटाळ्याशिवाय दुसरं काहीच कर्तृत्व न करू शकलेल्या जातीवादी आणि लुटारुंच्या भाटांनो आपल्या बापजाद्यांनी केलेल्या कॉंक्रेटीकरणावर अजून किती काळ आपण फक्त डांबर टाकून रस्ता नवा कोरा असल्याची आन घेणार आहात.

प्रजासत्ताक दिन सोहळा हा कुणाच्या बापाच्या मालकीचा नव्हता म्हणजे अर्थात आपण कुठे बसायचं हे मनी बाळगणं किंवा भाटांना बाळगायला लावणं कितपत योग्य आहे ? एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणं आणि तेही खूप कष्ट करून त्या उच्च पदावर पोहोचणं, आदर्श वगेरे घ्यावा असं काही असेल तर त्याच्या सन्मानासाठी अखंड देश एकवटला असता मात्र शून्य कर्तृत्वावर उपटसुंब टोळधाड किती उर बडवून घेतीय याचं नवल वाटतंय. मोदी नीच आहेत असं तुम्हाला वाटतं. तर मोदी नीच असतीलही हे आम्ही मान्य करू. एखाद्या सत्तेमध्ये समस्त जनता कधीच खुश नसते आणि नसायला हवी म्हणून तर सत्ता परिवर्तन होत असते. लोकशाही टिकून राहते. मात्र नीच असलेल्या मोदींनी या देशातल्या एकेकाळी देशाला प्रचंड लुटलेल्या आणि मोठ्या असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला सहाव्या ओळीत बसवून कुवतीप्रमाणे लायकीवर आणले हे काही कमी नाही. चायवाला म्हणून हिनवताना, त्यांच्या गरिबीची चेष्टा करताना, सामान्य माणसांच्या यातना जवळून बघताना डोळे भरून आलेला पंतप्रधान बाप्या म्हणताना आणि खानदानी दुकानदारी उलथापालथ केली म्हणून आपले गटार गलिच्छ संस्कार दाखवून देताना आपण किती खालच्या पातळीचे राजकारण केले याचं भान ना त्या तथाकथित अध्यक्षांना ना भाटांना येईल ना बाजारबुनग्या टोळधाडीला....

या सगळ्यावर नूतनकुमार पाटणी यांच्या ओळी इथं आठवतात.

"ऐ मेरे दोस्त,तकदीर की लकिरमे फकिरभी राज-ए-बाज बन जाता है l
खेल मदारिक घडी दो घड़िकाही होता है ll"

....आणि तरीही या सगळ्याचं उत्तर मो तर एवढंच देईन की

"समय बडा पहेलवान है ll"

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर

पुन्हाच्या निमित्ताने...


😉आम्ही ठरवू ते आरोपी. आम्ही सांगू ते वाईट, आम्ही बोलू ते पूर्व. आम्ही सांगू ते सत्य. अशी भाषा हल्ली बोलू लागलेत नक्षलवादी प्रवृत्ती जोपासणारे नेते. मुळात मला बातमी वाचल्यानंतर थोडं चलबिचल झालं “भिडे, एकबोटेना अटक न झाल्यास पुन्हा हिंसाचार”.
आम्ही दंगल घडवलीच नाही. दंगल ही हिंदुत्ववाद्यांनी घडवली आणि तेही आम्ही जी नावे सांगतो त्यांनीच घडवली अशी कुबाड रचत मागच्या रांगेतून पुढ येऊन तथाकथित दलितांचा नेता होऊ पाहणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना आपण काय बोलतोय याचं भान राहिलेलं दिसत नाही किंवा सत्य सांगताहेत.
जर तुम्ही दंगल घडवलीच नसेल, तुमचा त्यात हातच नसेल, यल्गार सभेतील सर्व तथाकथित मान्यवर (?) जर धुतल्या तांदळाचे असतील तर “पुन्हा” शब्दाचा अर्थ काय होतो हे एकदा या महाराष्ट्रातील भोळ्या भाबड्या जनतेला सांगा. जर दलितांचा नेता व्हायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक होऊन समृद्ध आणि सुसंस्कारित समाज घडवण्याची शपथ घ्या. सामाजिक कलह निर्माण करून नेता होता येत नसतं. ते म्हणजे तीन काठ्यावर एक मडकं ५ – ६ फुट उंचीवर उभं करून खाली जाळ घालून शिजण्याची वाट बघण्यासारखं आहे. ते शिजतही नाही आणि भिजतही नाही. तो जाळ वाऱ्याने रानभर पसरतो आणि मग अंगलोट येतो काळसर धूर.... हे चपखल ध्यानात घ्या.
पुन्हा हिंसाचार करू म्हणजे पूर्वीही आम्हीच केला, आताही अजून करू असा सरळ, साधा, सोपा अर्थ होतो. तमाम दलितांना आणि जनसामान्य जनतेला गृहीत धरू नका. कायदेशीर कारवाई झाली तर चौकशी होईलच. तुम्ही मागणी करणं बरोबर आहे मात्र अशी विधानं करून पुन्हा समाज चेतवण्याचा प्रयत्न नका करू, ते आंबेडकर आडनावाला शोभणारं नाही.



_ विकास वाघमारे

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

भीमा कोरेगाव निमित्ताने....

क्षणोक्षणी इथे जाळपोळ, दूर दूर धूर होतो,
तुझी शिकवण शांततेची, आम्ही आजही जोपासतो..
दगड, माती देहावरी, उभा कट्टर उन्माद कोसळतो,
लाल अथांग सागर पण इथे वेगवेगळा उसळतो.....
      खूप काही बोलायचं होतं, खूप काही समजवायचं होतं, पण या व्यवस्थेमध्ये असलेल्या गुलामांनी आणि मालकांनी गांडू समाज म्हणून तुम्हाला आम्हाला एका पेटीत जेरबंद केलंय. जिथं तुम्ही मला मारणार आहात बाहेरील कट्टरता आणि द्वेष बघून आणीन मीही तुम्हाला मारणार आहे बाहेरील कट्टरता व द्वेष बघून. कट्टरता हवीच कशाला या मताचा मीही कधीकधी विचार करतो त्यावेळी उत्तर येतं. धगधगता इतिहास कधीच पुसला जात नसतो आणि जर तो त्रयस्त पुसणार असेल तर त्यासाठी समस्त मानव आपापला कट्टर स्वभाव दाखवतो. आम्हाला समाजात समरसता आणण्याचे शिकवलं गेलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आणि त्यांनी दिलेल्या लाखमोलाच्या विचारांचा पाईक होऊन छत्रपती शिवबांच्या स्वराज्याची संकल्पना डोक्यात ठेऊन आम्हाला एक समाज तयार करायचाय. तुमच्यात जर कट्टरता असेल तर तिथे थोडा बुद्धही घ्या, कारण बुद्ध आम्हाला कधीच द्वेष आणि उन्मादपणा शिकवत नाही. आणि जर तुमच्याकडे जनकल्याणाची संकल्पना असेल तर तिथे थोडा शिवाजी घ्या कारण शिवाजी कधीच स्वार्थ साधत नाही.
      भीमा – कोरेगाव दंगल करणे ही कट्टरतेची गलिच्छ पातळी झाली असं मी मानतो. या देशात जर आम्ही संविधान मानतो तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आमचं अबाधित राहणं गरजेच आहे. एखाद्या समूहाने आयोजित केलेला सोहळा जर दुसऱ्या समूहाला चीड आणणारा वाटत असेल तर आमची सदसद्विवेक बुद्धी गहाण पडली म्हणायला हरकत नाही. पण एक गोष्ट नक्की असते ती म्हणजे, “एक्शन आली की रिएक्शन येणार”.


      भावांनो, मी ज्या समाजात जन्मलो त्याचा मला अभिमान असण्याचं काही कारण नाही कारण माझा त्यात काहीच सहभाग नाही. मात्र आज पुरोगामी समजला जाणारा आपला महाराष्ट्र एकाएकी इतक्या पराकोटीच्या द्वेषाला गेला की थेट जातीय दंगली भडकल्या गेल्या. एका बाजूला काळजाच्या कोपऱ्यात बाबासाहेबांना जपणारा मी दुसऱ्या बाजूला शिवाजींची स्वराज्याची नीती घेऊन समाजाला समरसता हवीय म्हणून सांगतो. ज्या मराठ्यांनी गर्वच नाही तर माज असल्याचं सांगितलं त्यांना कर्तृत्वाचा सवाल विचारतो.
      भावांनो, दंगल करून, दगडफेक करून, अचानक हल्ला करून कोणताच विषय सुटत नाही. आज आम्हाला रोजगार, आरोग्य, शिक्षण, अन्न, पाणी, वस्त्र आणि भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी एकत्र येऊया. झेंडा, पक्ष, जात, धर्म आणि नेता याच्या पलीकडे जाऊन सरकारला जाब विचारू की आम्ही ज्या विकासासाठी सत्तेवर बसवलं त्याचे काय झाले ? हजारो तरु बेरोजगार का आहेत ? आजही मायभगिनीवर हल्ला का होतोय ? आणि या गांडू व्यवस्थेला ठामपणे विचारलं पाहिजे की एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बाप आजही उपाशी का झोपतो ?
आज भीमा कोरेगाव विषय समोर आलाय. मानवतेला काळिमा फासणारी घटना याची देही याची डोळा पाहिली. अंधाधुंद दगडफेक केली गेली, बायका पोरांचा विचार न करता अमानुषपणा दाखवला गेला. थेट गाड्या फोडल्या, पेटवल्या, मात्र यामध्ये तुमच्या माझ्यासारख्या बाबासाहेबांना आणि शिवरायांना एका सूत्रात बांधत समाजात समरसता आणण्याच्या दिशेने टाकलेली पाउलं आणि
“तुमचं – आमचं नातं काय ?
जय भीम – जय शिवराय” 
या सामाजिक सलोख्याच्या घोषणा, सगळंच हवेत विरलं....

■ © विकास विठोबा वाघमारे