सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

विजय म्हणायचा की पीछेहाट..? 🤔🙄

     आज भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून गणला जात असताना शिवसेना कुठेतरी मागे पडतीय का हा प्रश्न सुद्धा सेनाप्रमुखांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

मराठी माणसांसाठी शिवसेनाच असं म्हणत असताना आणि मराठीच्या मुद्द्यावर राजकीय खलबते करत असताना भारतीय जनता पार्टीला तब्बल 82 जागा मिळतात हे कसं शक्य आहे?

मराठी अन हिंदुत्व यावर शिवसेनेने आपला राजकीय आवाका वाढवला. कधीकाळी छोटा भाऊ म्हणून भाजपाला अंगाखांद्यावर घेतलं. आता मोठ्या - छोट्या म्हणत जागांसाठी युती तोडली.

मात्र आज मुंबईचे राजकारण मराठी अन हिंदुत्वाभोवती नाही का हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचे आहे. कारण भाजपा हिंदुत्ववादी आहे मात्र मराठी अन बाकी अस्मिता नाही अन मुंबई वाचवायची असेल तर सेनाच बरी असाही आटापिटा बऱ्याच जणांनी केला होता.

आता निकाल हाती आल्यानंतर भाजपाने थेट शिवसेनेला आणि तेही स्वगृही म्हणजे मुंबई जाऊन धोबीपछाड केले आहे याचा विचार आता सेनेने करणे गरजेचे आहे. कारण 25 वर्षे एकहाती सत्ता भोगणाऱ्या सेनेला भाजपाने चित करणे म्हणजे भाजपाचा विजय तर आहेच पण सेनेचा पराभव आहे हे अत्यंत महत्वाचे आहे.

एकूणच काय तर सेनेला मुंबईत सुद्धा आता ग्रहण लागलं आहे त्यामुळे भाजपाला आता छोटा भाऊ, कमळाबाई म्हणून हिणवत बसण्यापेक्षा त्यांच्याच ताटात अर्धीच्या ऐवजी चतकोर का होईना भाकरी खाणे आज गरजेचे आहे.

मनसेच्या इंजिनाला टाळी दिली असती तर कदाचित चित्र थोडंसं वेगळे दिसले असते मात्र तेही मोठेपणाचा अहंकाराने झिडकारले. आता मात्र नेतृत्वाने कुठेतरी विचार करण्याची गरज आली आहे, शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि ती तशीच रहावी यासाठी प्रयत्न करावे लागतील.

गुजरातच्या पाटीदार समाजाच्या हार्दिक पटेल या युवकाला मुंबईत आणून भाजपाला व भाजपा श्रेष्ठींना शह देण्याचा प्रयत्न झाला, गुजराती मतांचा आकडा आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला गेला मात्र ही खेळी सेनेच्या अंगलट आली म्हणायला हरकत नाही.

काँग्रेसचा पराभव निश्चित होताच, राष्ट्रवादी, मनसे यांचाही काहीअंशी परिणाम जाणवला मात्र मुंबईच्या राजकारणात फार काही तो प्रभावी दिसला नाही.

मुंबईसाठी महाराष्ट्रात इतरत्र कुठेही सभा न घेता दिवसरात्र एक करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजपाने नमवलं असंही म्हणायला हरकत नाही. भाजपाला मुंबईत मोठ्या प्रमाणात जागा मिळणे म्हणजे शिवसेनेचा पराभव आहे हे निश्चित..!

©Vikas Waghamare


बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

गावगप्पा आजोबांसोबत..😍

वेळ दुपारी 2 ची. स्थळ- माझी जनभूमी अर्थात वाघोली. बऱ्याच दिवसांनी गावात गेलो. कार्यक्रम, निवडणूक, संघटना, लेखन, जॉब आदी अशा अनेक घटनांमध्ये बऱ्याच प्रमाणात अडकून गेलो होतो. माघ महिन्याचं ऊन बरंच तळपत होतं. फाल्गुन महिन्याच्या आत असले ऊन डोक्यावर घेऊन काढण्या करणारी माणसं, डोईवर ऊन घेऊन राबणारी बैलं, झाडाच्या बुंध्याला टेकून मनमोहन, मोदींपासून सर्वांना ज्ञान सांगणारी तज्ञ मंडळी. शहराच्या झगमगीतून गावात घेल्यावर थोडा मनात गजहब माजला. माझा आज्जा अन मी सोडले तर कुणीही रिकामं नव्हतं. शिक्षण, काम, ख्याली खुशाली असं सर्व आज्यानं विचारून झालं. आज्जा म्हणजे आजोबा अन आम्ही बाबा म्हणतो. बाबांचं वय म्हणजे आता शंभरी पार करून पाच - चार वर्षे पुढं झाली असतील. बर्थ डेट वगैरे वगैरे कुणालाच माहिती नाही. पण बाबानं गांधीबाबाला बघितलं ते खरं. इंदिरा गांधी मॅडम मेली तेव्हा बैलगाडी झुपुन बाबा वांगी इकाला सोलापुरी गेला हुता, असं बाबाच म्हणाला. माझ्या मोबाईल फोनची चौकशी झाली, किंमत, फोन कसा येतो वगैरे अन मग शेरातली लोकं कशी दगा देतात याच्या आठवणी बाबा सांगू लागला.
       शेजारच्या शेतातून हरभऱ्याचा डहाळा आणला अन आम्ही दोघंच डाहळ्याची पार्टी सुरु केली. सान थोरांच्या सानिध्यात खाल्लेला डहाळा अन बाभळीच्या झाडाला साक्षी मानून आज्यासोबत केलेली ही पार्टी यात जमीन अस्मानी फरक असतो. व्यसन, वाईटाच्या नादाला लागू नको हा उपदेश मला हक्कानं सांगताना बाबा तंबाखू चोळत होता. चुन्याचा मोठा डबा, जवळच खाकी रंगाची जोमदार चंची, येंगळानं रंगवलेली काठी, डेरेदार बाभळीच्या झाडाखाली टाकलेला बिछाना, जवळच पाण्याचं ड्रम अशी बैठक. बाबानं आजपर्यंत 7-8 पोती तंबाखू खाल्ली असल्याचं तेच सांगतात. 12 - 14 वर्षाच असल्यापासून हा नाद लागला.
      अशा खूप खूप गप्पा मारल्या, शहरातल्या काही गोष्टी कुतूहलाने मीही सांगितल्या. शिक्षणाचं सांगताना BA 2 इयर नाही कळलं म्हणून चौदावी सांगून विषय पुढे नेला. खूप दिवसांनी आपल्या मातीत आपली माणसं अन आपल्या भाषेत आपल्या माणसांशी गप्पा किती भारी असतं न ! मन भरून आलं. गावातलं हे गावपण चिरतरुण राहावं म्हणजे जग बदललं तरी निश्चिंत राहता येतं!

(मोबाईलच्या गप्पा मारताना मी बाबांसोबत हळूच सेल्फी घेतला)


रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

स्वाभिमानी नेत्याचा निषेध..!

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नींवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार श्री. प्रशांत परिचारक यांची टीका करताना जीभ घसरली.

जे झालं ते वाईट झालं, जे बोललो ते वाईट बोललो, या वाक्याबद्दल महाराष्ट्राची व तमाम जनतेची दिलगीरी व्यक्त करतो असे आ. प्रशांत परिचारक म्हणाले.

 त्यांनी अवमानकारक बोललेल्या वाक्याचे समर्थन कुणीही करत नाही आणि करूही नये.

अशा लोकप्रतिनिधींच्या या महानतेचा समाजानं काय आदर्श घ्यायचा ?
 या स्वाभिमानी नेत्याचा मी निषेध व्यक्त करतोय. शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्या पक्षात असलात तरी सैनिकांशी अशा शब्दात बोलणं खूप वाईट आहे.

ही प्रवृत्ती खरीतर काँग्रेसच्या गोटात उत्पन्न झाली आहे आताआता स्वाभिमानाच्या कळपात दाखल झालेले परिचारक यांच्यावर पिढ्यानपिढ्या काँग्रेसच्या विचारसरणीचा पगडा आहे. परिचारक हे थेट भाजपात दाखल नाहीत तर मित्रपक्षात आहेत. आता ते स्वतंत्र आघाडी करून आणि भाजपाच्या बॅनरखाली सभा घेत असल्याने आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत पुरस्कृत केल्यामुळे तशी भारतीय जनता पार्टीही जबाबदार आहेच.

या बेताल नेत्याचा निषेध....

©Vikas Waghamare
Abvp प्रसिद्धी प्रमुख, सोलापूर

(टीका करताना पडद्याची दुसरी बाजू बघायला शिका..! जे झाले ते वाईट आहे, निषेधार्य आहे हे नक्की.)

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

उद्धवजींची शिवसेना ..!

उध्वोजीराव आज तुम्ही हाती घेतलेला धनुष्य खूप मोठ्या ताकदीने पेलावा लागेल!

युती तोडली आणि एका मागोमाग आपण किती धुतल्या तांदळाचे आहोत अशी आरोळी सभांच्या माध्यमातून देणारे उध्वोजीराव आज तुम्ही घेतलेला निर्णय आणि केलेले विधान याचा गांभीर्याने विचार करावा..!

गुजरातमध्ये मध्यंतरीच्या काळात उदयास आलेला एका समाजापूरता असलेला एक नेता हायजॅक करण्याची खेळी करताना आदरणीय बाबळासाहेबांच्या शिवसेनेचा विचार करणे गरजेचे होते. ज्यांनी अखंड हिंदुत्वासाठी लढण्याची शपथ घेतली त्यांच्या पक्षाचा प्रमुख म्हणून महाराष्ट्र अथवा बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या हिंदुस्थानच्या एकही हितचिंतकाला ही अपेक्षा नव्हती.

हार्दिक असेल अथवा अन्य कुणी आणा स्वागत आहे. मैत्रीत राजकारण आणू नये याची खबरदारी घेतच आहोत. मातोश्रीच्या पायऱ्या झिजवणाऱ्यांबद्दल आम्हाला लाख अभिमान आहे मात्र मिळून घेतलेली प्रेस असेल व्वा त्यात केलेली धक्कादायक विधानं असतील.?

शिवसेनेचा चेहरा हा कुणी पोलिसांच्या जीवावर उठलेला व देशविरोधी असलेला नेता पाहणं हे म्हणजे साहेबांच्या विचाराला तुम्ही बगल देताय आणि हे शिवसैनिकांनी पाहणं म्हणजे दुर्दैवच!

महाराष्ट्रात भावाला चिकनसुपरुपी टाळी न देता विचाराला तिलांजली दिलेल्या एका जातीयवाद्याच्या खांद्यावर हात टाकलात. आम्हाला ठाऊक आहे मोडलेली युती असेल किंवा उचललेलं अवजड धनुष्य आत्ताच्या सेनेला पेलणारं नाहीच पण उद्धोजीराव आगामी काळात राजकारणातून अचानक गायब होऊ नये याची तर काळजी घ्या..! आम्हा शिवसैनिकांना आपली अन आपल्या सुपुत्राची काळजी वाटते..


Vikas Waghamare

(भक्तांनो रोखठोक भिडा उगी तुम्ही गप्प बसू नका 😎)
#शेवटी_मुंबई_आपलीच

आजी सोनियाचा दिनू उगवला . . .

 आज माझ्या आयुष्यातील सर्वात ग्रेट दिवस. आजचा दिवस म्हणजे 5 जुलै 2016 मी कधी विसरूच शकत नाही. आज महाकवी कालिदास दिन लोकमंगल परिवार खूप मोठ्या प्रमाणात व दिमाखात साजरा करत असतो याचा मी गेली 3 वर्षे साक्षीदार आहे. तसाच या ही वर्षी मी लोकमंगलच्या 4 शाखेत कवी म्हणून उपस्थित रहावं असं ठरल होतं. माझी एक अट असते (म्हणजे मी स्वतःलाच घातलेली) कि प्रत्येक कवी संमेलनाला नवी कविता लिहून जायचं. सकाळी उठून ९ वाजता कविता लिहिली आणि नेहमीप्रमाणे कामावर गेलो. जेष्ठ कवी लक्ष्मीनारायण बोल्ली सर यांच्या बरोबर थोडसं फोनवर बोलणं झालं , तब्येत वगैर विचारपूस झाली. मला त्यांनी सायंकाळी 6 वाजताच्या कवी संमेलनाची आठवण करून दिली व आशीर्वाद देऊन मला शुभेच्या दिल्या. दुपारी 1 वाजता लोकमंगल सुपर बझार याठिकाणी आदर सत्कार झाला, कविता सादर झाली. आणि पुढे 4 वाजता लोकमंगल प्रिंट अँड पॅक मध्ये कविता सादर केली अन काय आश्चर्य अभूतपूर्व रसिकांना कविता इतकी भावली कि ते मी मांडूच शकत नाही. त्या कवी संमेलनाला प्रसिद्ध निवेदिका शोभा बोल्ली मॅडम उपस्थित होत्या पण कविता ऐकू शकल्या नाहीत. पण मला आठवणीने हिराचंद नेमचंद अम्पी थेटरला सायं 6 वाजता यायला सांगून गेल्या. कार्यक्रम 4 ते 6 ठरला होता पण असा रंगला कि तो तब्बल पाऊण तास लांबला. धावत पळत मी सायकल काढली अन हिराचंद नेमचंद गाठले. घामानं अंघोळ झाली होती. धापा टाकत, रुमालाने तोंड पुसत आत शिरलो. बोल्ली मॅडम समोरच भेटल्या त्यांनी सांगितलं कि "विकास तू मंचावर बस जा..." मला काहीच समजत नव्हतं.मी मंचावर डोकावलं तर मला हादराच बसला मंचावरील मान्यवर कवी पाहून. मला परत मॅडम म्हणाल्या "जा ना विकास बस त्यांच्यासोबत .."
       ज्यांच्या कविता, वात्रटिका वाचत लहानाचा मोठा झालो त्यांचे साहित्य वाचताना वाटायचं कि कधी आपली भेट होईल कि नाही ? महाराष्ट्राचे प्रसिद्ध वात्रटीकाकार , आदरणीय रामदास (नाना) फुटाणे अध्यक्ष होते.त्याबरोबरच अनेक दिग्गज जेष्ठ कवी माधव पवार, गोविंद काळे, राजेंद्र दास, रामचंद्र इकारे, अविनाश बनसोडे असे दिग्गज एकवटले होते. सभागृह संपूर्ण खचाखच भरलेलं होतं . नुकतंच उदघाटन झालं होतं. आता मी मान्यवर कवींच्या रांगेत जाऊन बसणार हि कल्पनाच मी केली नव्हती. मग कसाबसा धाडस करत जाऊन बसलो. छातीचे ठोके एव्हाना वाढले होते, घामाची धार पुन्हा सुटली होती.
        एकदा बसल्यावर सर्व मान्यवर कवींकडे नजर टाकली व नजर चोरत सभागृहात पाहिलं तर समोर आदरणीय *रोहन (भैय्या) देशमुख* मनाला थोडं कससच वाटलं , भांबावलो होतो मी. रोहन दादांनी स्मितहास्य करत मला थोडा धीर दिला मग थोडं बर वाटलं. आता मंचावर थोडा स्थिर झालो  होतो. बोल्ली मॅडम नी माझा परिचय सर्वांना करून दिला .. गोडगोड शब्दात माझा परिचय झाला.
     कवितांना सुरुवात झाली मी बोलायला उभा राहिलो आणि मनातून भरून आलं होतं. मी नानांविषयी बिनधास्त बोललो व प्रेमाची कविता सादर केली. नानांनी त्याच्यावर कोटी करत मला खूपच छान दाद दिली. सभागृहात तर हशा पिकली होती ती नानांमुळे.त्यात माझी हि प्रेमाची कविता नंतर मी माझी माय हि कविता सादर केली तेव्हा मात्र सभागृह स्तब्ध झालं होतं. अश्या निखळ हास्य व धीरगंभीर कविता असा अडीच तास हा कार्यक्रम चालला.
       मला आज हे व्यासपीठ मिळालं त्याचं सर्व श्रेय शोभा बोल्ली मॅडम, रोहन दादा, आणि लोकमंगल परिवार यांनाच जातं.
      रोहन दादांचे खूप खूप आभार मला आज जे काही मिळालं ते मी कधी विसरू शकणार नाही. आजचा दिवस ग्रेट ग्रेट आणि ग्रेटच होता माझ्यासाठी.

     ©विकास वाघमारे (वाघोलीकर)
📲8379977650
(पूर्वप्रसिद्ध लेख)

एकच लक्ष्य, दोन कोटी वृक्ष

माणूस फक्त आपलं हित जपत आलेला म्हणजे लोभनिय प्राणी.पृथ्वीवर जगायला अन्न, वस्त्र,निवारा या गोष्टी गरजेच्या आहेत. पण अलीकडे माणसांची जगण्याची पद्धत बदलली म्हणजे हायटेक झाली.मग प्रत्येक गोष्ट हातात येऊ लागली.शेत-शिवार फक्त स्वप्नात येऊ लागलं.मातीशी जोडलेली नाळ सहज पणे तुटून गेली केवळ या आमच्या हायटेक जगण्याच्या लोभापायी.सिमेंटच्या जंगलात मात्र लोकसंख्या झपाट्यानं वाढत गेली आणि आमच्या शहराची लांबी वाढत गेली.यासाठी साहजिकच अनेक वृक्ष तोडीची नामुष्की आमच्यावर ओढवली.एके काळी आमच्या बांधावर आवडीने लावलेली झाडे आज हायटेक च्या वेडापायी आम्हीच तोडून टाकली.मग शेत-शिवार कोरडं पडत गेलं,दुष्काळच सावट हळूहळू सर्वत्र पसरलं आम्ही आजपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.पण आज पिण्याच्या पाण्याची चिंता आमच्या  मनामनाला सतावतेय.
        या सर्व गोष्टीचा विचार करून आता "महाराष्ट्र सरकार" ने 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्षलागवड करण्याचा मानस ठेऊन सर्व यंत्रणा सतर्क केली.हे सरकार ने केलेली पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मोठी कामगिरी असच म्हणावं लागेल.कारण 2 कोटी वृक्ष हे समाजातील सर्व घटकांना सामावून घेत चळवळ उभी करण सोप नाही.
    यासाठी सरकारच्या महत्वकांक्षी योजनेला खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत पोहचवण्याचा दृष्टीने अनेक पर्यावरण व निसर्ग प्रेमी संघटना खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आखत आहेत. लोखोंच्या संख्येनं वृक्षलागवड करून त्याची जपणूक करण्यासाठी अहोरात्र मेहनत सुरु आहे.
   आपणही आपल्या पुढील उज्वल भविष्यासाठी प्रत्येकांनी वृक्षलागवड करण्यासाठी योगदान द्यावं.तर महाराष्ट्र नंबर एक व्हायला वेळ लागणार नाही.लवकरच सर्वांच्या सहकार्याने "हरित महाराष्ट्र" आपल्याला पहायला मिळेल.मग आता एकच लक्ष्य,दोन कोटी वृक्ष.

©विकास वाघमारे (वाघोलीकर)
📲8379977650