मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

आजी सोनियाचा दिनू उगवला . . .

 आज माझ्या आयुष्यातील सर्वात ग्रेट दिवस. आजचा दिवस म्हणजे 5 जुलै 2016 मी कधी विसरूच शकत नाही. आज महाकवी कालिदास दिन लोकमंगल परिवार खूप मोठ्या प्रमाणात व दिमाखात साजरा करत असतो याचा मी गेली 3 वर्षे साक्षीदार आहे. तसाच या ही वर्षी मी लोकमंगलच्या 4 शाखेत कवी म्हणून उपस्थित रहावं असं ठरल होतं. माझी एक अट असते (म्हणजे मी स्वतःलाच घातलेली) कि प्रत्येक कवी संमेलनाला नवी कविता लिहून जायचं. सकाळी उठून ९ वाजता कविता लिहिली आणि नेहमीप्रमाणे कामावर गेलो. जेष्ठ कवी लक्ष्मीनारायण बोल्ली सर यांच्या बरोबर थोडसं फोनवर बोलणं झालं , तब्येत वगैर विचारपूस झाली. मला त्यांनी सायंकाळी 6 वाजताच्या कवी संमेलनाची आठवण करून दिली व आशीर्वाद देऊन मला शुभेच्या दिल्या. दुपारी 1 वाजता लोकमंगल सुपर बझार याठिकाणी आदर सत्कार झाला, कविता सादर झाली. आणि पुढे 4 वाजता लोकमंगल प्रिंट अँड पॅक मध्ये कविता सादर केली अन काय आश्चर्य अभूतपूर्व रसिकांना कविता इतकी भावली कि ते मी मांडूच शकत नाही. त्या कवी संमेलनाला प्रसिद्ध निवेदिका शोभा बोल्ली मॅडम उपस्थित होत्या पण कविता ऐकू शकल्या नाहीत. पण मला आठवणीने हिराचंद नेमचंद अम्पी थेटरला सायं 6 वाजता यायला सांगून गेल्या. कार्यक्रम 4 ते 6 ठरला होता पण असा रंगला कि तो तब्बल पाऊण तास लांबला. धावत पळत मी सायकल काढली अन हिराचंद नेमचंद गाठले. घामानं अंघोळ झाली होती. धापा टाकत, रुमालाने तोंड पुसत आत शिरलो. बोल्ली मॅडम समोरच भेटल्या त्यांनी सांगितलं कि "विकास तू मंचावर बस जा..." मला काहीच समजत नव्हतं.मी मंचावर डोकावलं तर मला हादराच बसला मंचावरील मान्यवर कवी पाहून. मला परत मॅडम म्हणाल्या "जा ना विकास बस त्यांच्यासोबत .."
       ज्यांच्या कविता, वात्रटिका वाचत लहानाचा मोठा झालो त्यांचे साहित्य वाचताना वाटायचं कि कधी आपली भेट होईल कि नाही ? महाराष्ट्राचे प्रसिद्ध वात्रटीकाकार , आदरणीय रामदास (नाना) फुटाणे अध्यक्ष होते.त्याबरोबरच अनेक दिग्गज जेष्ठ कवी माधव पवार, गोविंद काळे, राजेंद्र दास, रामचंद्र इकारे, अविनाश बनसोडे असे दिग्गज एकवटले होते. सभागृह संपूर्ण खचाखच भरलेलं होतं . नुकतंच उदघाटन झालं होतं. आता मी मान्यवर कवींच्या रांगेत जाऊन बसणार हि कल्पनाच मी केली नव्हती. मग कसाबसा धाडस करत जाऊन बसलो. छातीचे ठोके एव्हाना वाढले होते, घामाची धार पुन्हा सुटली होती.
        एकदा बसल्यावर सर्व मान्यवर कवींकडे नजर टाकली व नजर चोरत सभागृहात पाहिलं तर समोर आदरणीय *रोहन (भैय्या) देशमुख* मनाला थोडं कससच वाटलं , भांबावलो होतो मी. रोहन दादांनी स्मितहास्य करत मला थोडा धीर दिला मग थोडं बर वाटलं. आता मंचावर थोडा स्थिर झालो  होतो. बोल्ली मॅडम नी माझा परिचय सर्वांना करून दिला .. गोडगोड शब्दात माझा परिचय झाला.
     कवितांना सुरुवात झाली मी बोलायला उभा राहिलो आणि मनातून भरून आलं होतं. मी नानांविषयी बिनधास्त बोललो व प्रेमाची कविता सादर केली. नानांनी त्याच्यावर कोटी करत मला खूपच छान दाद दिली. सभागृहात तर हशा पिकली होती ती नानांमुळे.त्यात माझी हि प्रेमाची कविता नंतर मी माझी माय हि कविता सादर केली तेव्हा मात्र सभागृह स्तब्ध झालं होतं. अश्या निखळ हास्य व धीरगंभीर कविता असा अडीच तास हा कार्यक्रम चालला.
       मला आज हे व्यासपीठ मिळालं त्याचं सर्व श्रेय शोभा बोल्ली मॅडम, रोहन दादा, आणि लोकमंगल परिवार यांनाच जातं.
      रोहन दादांचे खूप खूप आभार मला आज जे काही मिळालं ते मी कधी विसरू शकणार नाही. आजचा दिवस ग्रेट ग्रेट आणि ग्रेटच होता माझ्यासाठी.

     ©विकास वाघमारे (वाघोलीकर)
📲8379977650
(पूर्वप्रसिद्ध लेख)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा