बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

गावगप्पा आजोबांसोबत..😍

वेळ दुपारी 2 ची. स्थळ- माझी जनभूमी अर्थात वाघोली. बऱ्याच दिवसांनी गावात गेलो. कार्यक्रम, निवडणूक, संघटना, लेखन, जॉब आदी अशा अनेक घटनांमध्ये बऱ्याच प्रमाणात अडकून गेलो होतो. माघ महिन्याचं ऊन बरंच तळपत होतं. फाल्गुन महिन्याच्या आत असले ऊन डोक्यावर घेऊन काढण्या करणारी माणसं, डोईवर ऊन घेऊन राबणारी बैलं, झाडाच्या बुंध्याला टेकून मनमोहन, मोदींपासून सर्वांना ज्ञान सांगणारी तज्ञ मंडळी. शहराच्या झगमगीतून गावात घेल्यावर थोडा मनात गजहब माजला. माझा आज्जा अन मी सोडले तर कुणीही रिकामं नव्हतं. शिक्षण, काम, ख्याली खुशाली असं सर्व आज्यानं विचारून झालं. आज्जा म्हणजे आजोबा अन आम्ही बाबा म्हणतो. बाबांचं वय म्हणजे आता शंभरी पार करून पाच - चार वर्षे पुढं झाली असतील. बर्थ डेट वगैरे वगैरे कुणालाच माहिती नाही. पण बाबानं गांधीबाबाला बघितलं ते खरं. इंदिरा गांधी मॅडम मेली तेव्हा बैलगाडी झुपुन बाबा वांगी इकाला सोलापुरी गेला हुता, असं बाबाच म्हणाला. माझ्या मोबाईल फोनची चौकशी झाली, किंमत, फोन कसा येतो वगैरे अन मग शेरातली लोकं कशी दगा देतात याच्या आठवणी बाबा सांगू लागला.
       शेजारच्या शेतातून हरभऱ्याचा डहाळा आणला अन आम्ही दोघंच डाहळ्याची पार्टी सुरु केली. सान थोरांच्या सानिध्यात खाल्लेला डहाळा अन बाभळीच्या झाडाला साक्षी मानून आज्यासोबत केलेली ही पार्टी यात जमीन अस्मानी फरक असतो. व्यसन, वाईटाच्या नादाला लागू नको हा उपदेश मला हक्कानं सांगताना बाबा तंबाखू चोळत होता. चुन्याचा मोठा डबा, जवळच खाकी रंगाची जोमदार चंची, येंगळानं रंगवलेली काठी, डेरेदार बाभळीच्या झाडाखाली टाकलेला बिछाना, जवळच पाण्याचं ड्रम अशी बैठक. बाबानं आजपर्यंत 7-8 पोती तंबाखू खाल्ली असल्याचं तेच सांगतात. 12 - 14 वर्षाच असल्यापासून हा नाद लागला.
      अशा खूप खूप गप्पा मारल्या, शहरातल्या काही गोष्टी कुतूहलाने मीही सांगितल्या. शिक्षणाचं सांगताना BA 2 इयर नाही कळलं म्हणून चौदावी सांगून विषय पुढे नेला. खूप दिवसांनी आपल्या मातीत आपली माणसं अन आपल्या भाषेत आपल्या माणसांशी गप्पा किती भारी असतं न ! मन भरून आलं. गावातलं हे गावपण चिरतरुण राहावं म्हणजे जग बदललं तरी निश्चिंत राहता येतं!

(मोबाईलच्या गप्पा मारताना मी बाबांसोबत हळूच सेल्फी घेतला)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा