शनिवार, २८ जानेवारी, २०१७

एकरूप करणारी एकात्मता यात्रा

सकाळपासून फोटो काढण्याची लगभग सुरु असते. फुटपाथवर जे लोक चिनी, बांग्लादेशी म्हणून आम्ही डिवचून पळून जायचो त्याच पद्धतीचे लोक आज आमच्या भोवताली होते. आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा यासह ईशान्य भारतातून आलेले हे विद्यार्थी आमच्यासाठी पाहुणे होते. ज्यांना कालपर्यंत डिवचत होतो त्यांनाच आज विचारपूस करण्याची धांदल उडत होती. आज सर्वांनी मिळून नाष्टा केला, मग मात्र जीवाला थोडी जास्तच रुकरुक लागली. सायंकाळी 7 वाजताची परतीची गाडी असल्याचं समजलं. गेली 3-4 दिवस खूप खुप धम्माल केली. ते विद्यार्थी कोण, कुठले, ओळख ना पाळख मात्र आम्ही एकरूप झालो होतो. राष्ट्रीय एकात्मतेच्या गप्पा मारता मारता कधी एकरूप झालो देवजाने ?
       संस्कृती, रंग, वेशभूषा, खानपान, परिस्थिती, कॉलेज, अभ्यास, व्यवसाय, इतिहास अशा खूप खूप गप्पा गेल्या 4 दिवसात झाल्या. 4 दिवसाचे पाहुणे कोण जाणे हृदयात घर करून गेले. रेल्वे स्थानकावर निरोपाला निघालो, आठवणींची रांग एव्हाना डोळ्यांच्या कडेवर येऊन ठेपली होती. तीन -चार दिवसाचा काळ आयुष्यात सुवर्णक्षणांची ताजा राहील याची खात्री पटली होती. प्रत्येकाला भेटून, गळा पडून घट्ट मिठी मारली.
           भाई, हम एक दिन जरूर आसाम आयेंगे। मी कातर स्वरात बोललो.

    बिकासभाई, तुम सब जरूर आये, हम राह देखते हैं। मुझे गर्व हैं इस भारत में हमारे बहुत सारे अपने परिवार हैं । मेरा घर सिर्फ एकही राज्य में नही है। जिस जिस ठिकान पे हम पहुँचे उस ठिकान पर हमें अपना घर मिला हैं। तोसुद्धा भांबावला होता.
        मी शांतच बसलो. उत्तर देणं आता मला शक्यच नव्हतं आणि काय बोलणार ?
          यतीराज येऊन केव्हा हात धरून पुढे घेऊन गेला समजलं नाही. मी मुकाट चालत राहिलो, पाठीमागे न बघता. रेल्वे डब्यात सर्वांचे साहित्य ठेवलं भराभरा सर्वांचे चेहरे न्याहाळून घेतले. नजर हटत नव्हती. मात्र नाईलाज, माझी माणसं आता दूर त्यांच्या प्रदेशात विखुरली जाणार होती. हि स्थिती माझीच नाही. सोलापूरच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात हाच भाव दाटल्याचं गडद दिसत होतं.
           पुन्हा मी आणि यतीराज होनमाने भराभरा सर्वत्र फिरून भेटी घेतल्या, फोटो काढले, नंबर घेतले, फेसबुक रिक्वेस्ट पाठवण्याचं वचन दिलं आणि आम्ही नक्की नक्की येऊ, तुमचा आणि माझा हा ईशान्य भारत पाहायला, असं म्हणत गाडीतून खाली उतरलो.
         "या यात्रेनं सोलापूरला, महाराष्ट्राला काय दिलं माहित नाही. पण मला, माझ्यातल्या माणसाला सुखाची, परिस्थितीची आणि माणूसपणाची याद नक्की दिलीय. ही भारतमाता अखंड आहे मात्र त्यावर ठोकर घालण्याचे काम सुरु असल्याचं अलगद सांगितलं गेलंय. कोण, कुठली परकी माणसं आज मला गदागदा हलवून हेलावून गेली. छे ! परकी कसली ? खरंतर माझ्या भोवतालची माणसंच परकी आहेत. ती तर नातं तयार करून गेली" असं चित्र मनात पिंगा घालत असतानाच गाडीनं वेग घेतला. त्यांचा हात गाडीच्या बाहेर हेलकावे खाऊ लागला. आम्ही मात्र बावरे होऊन पाहत राहिलो हलणाऱ्या हातांकडे......
      भाई, हम जरूर आएंगे तुम्हारे प्रदेश में.. जरूर ...। लेकिन याद रखों । बस्स...

              ✍🏻 विकास विठोबा वाघमारे
                   📲 8379977650
                    सोलापुर
#राष्ट्रीय_एकात्मता_यात्रा_सोलापूर #SEIL_TOUR #ABVP

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१७

अन सुखद धक्का बसतो.😊

 मी कॉलेज शिकतो 😅म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट दुसरं वर्ष. मागील दीड महिन्यांपूर्वी परीक्षा पार पडली. त्यातल्या गमती आता सांगायला हरकत नाहीत. कारण आता मी पास झालोय. All clear.
      कॉलेजला जातो मात्र क्वचितच. अभ्यास सोडून बाकी घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन असतो. परीक्षा सुरु व्हायच्या अगोदर दोन दिवस रिसीट घेतलं. मग नंतर नोट्स व पोर्शन किती याची चौकशी सुरु झाली. तोवर परीक्षेचा आदला दिवस उजाडला होता. मराठी आपल्याला कधी धोका देत नाही हे पक्कं. मात्र इंग्लिशचा काही विश्वास नसतोच. (खरं सांगायला काय हरकत 😂) अशात सेकंड सेमिस्टरचा बॅक राहिलेला. सरांना गोड बोलून नोटस मिळवल्या. वाचायला वेळ मिळाला नाही तो भाग निराळा. तशात माझा राज्यशास्त्र विषय . कधी त्या पुस्तकाचं तोंड पाहिलं ना त्या विषयाच्या सरांचं. जेवढं राज्यशास्त्र (political science) बोलघेवडं येतं तेवढंच😂😂. तीन दिवस अगोदर एका नवीन शिकाऊ सरांनी माझी ही दैना पाहून जवळंच राज्यशात्राचं पुस्तक दिलं तेही परतीच्या अटीवर. मात्र कामाच्या व्यापात विसरून गेलो. पेपरच्या आदल्या रात्री दहा, साडे दहाच्या दरम्यान लाजून अभ्यासाचं पुस्तक शोधतो तर कुठे पुस्तक नाहीच. कुठे ठेवले हेही आठवेना. राज्यशात्र या विषयाची एकही साधी चिटोरीही मला सापडू नये याचं मोठं दुःख झालं. मात्र एवढ्या रात्री काय करणार कुणाला फोनही करू शकत नव्हतो अन तक्रार तर मुळीच नाही. मग काय मीच मला समजावत या कुशीवरून त्या करत शांत बिनधास्त झोपी गेलो. जाऊन पेपर पाहिला तर पूर्णतः अनोळखी पण माहित असलेल्या ठोकळ गावरान पोलिटिकल गप्पांचा आधार घेऊन वेळ चालवून नेली. अशा अनेक तऱ्हा माझ्या परीक्षेच्या काळात घडल्या. तशातच अभाविपचा अंतरराज्यीय छात्र जीवनदर्शन यात्रेचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. मन तिकडेही वेध घेत होतंच.
     कार्यक्रम, परीक्षा, ऑफिस या सर्वांना एकत्र करत मी धीटपणे काही विषय निश्चित जाणारच या भूमिकेवर ठाम राहत आलो. रिझल्ट लागून 10 - 12 दिवस उलटले मात्र मला कसलीही घाई नव्हती. आज एका मित्रानं सांगितलं "भावा, आपला रिझल्ट लागला बरं". मग लाजून त्यालाच पाहायला सांगितला. त्याने मेसेज केला पास झाला अन सोबत स्क्रीनशॉट. मला आश्चर्य वाटलं हे सर्व असं तऱ्हेतऱ्हेचे अनुभव घेत दिलेली परीक्षा पास झालो याचं. पण अभाविपचं काम दैवी आहे असं म्हणतात ते खरं आहे. पण मजल दरमजल करत थर्ड सेमिस्टर ऑल क्लेर झालो हे महत्वाचंच.
 
           ✍🏻 *विकास विठोबा वाघमारे
              📲8379977650
               @ सोलापूर

सोमवार, २३ जानेवारी, २०१७

मुंबई पलटी महाराष्ट्रातून फरार...🤔

 निवडणुकांचे रणशिंग फुंकले की लगेचच आघाडीला बिघाडाची बाधा होते तर युतीला वाघोबाची नजर लागते असं ऐकलंय. साधारण मला राजकारण कळत असल्यापासून त्यांची भांडणंसुद्धा कळायला लागली. आज मोठ्या भावाची भूमिका घ्यायला दोन्ही पक्ष अन त्यांचे म्होरके तयार आहेत मात्र ती भूमिका निभावू द्यायला दोघेही एकमेकांना आडवे चालत आहेत.
       केंद्र सरकारसह महाराष्ट्रात जसं कमळ फुललं तसं कमळाला खरखर लागली आणि महाराष्ट्रात त्याच खरखरीतून पुन्हा नव्याने अन जोमाने फुल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने उमललेच. या नगरपालिकांच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये तर मोठा भाऊ कोण ? हे जनतेने सांगितले. मात्र त्याच्या सख्याला समजायला वेळ लागेल. आता मुंबई महानगरपालिका तोंडावर आल्या आणि आश्वासनांची खैरात अन घोषणांची बाशिंगे गुडघ्याला बांधत कोणी महाराष्ट्राचे नेते पुढे आले. महा माहित नाही मात्र जे बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत आज बेधडक काही बाही बोलत आहेत. मात्र जे करून दाखवले ते का बोलत नाहीत कोण जाणे. मुंबई कुणाची हा प्रश्न मला पडत नाही कारण मुंबई तर कुणाच्या एकाची नाही कारण ही लोकशाही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाईल मात्र काही बाही बोलण्याच्या अन राजकीय टीकाटिप्पणीच्या नादात "मुंबई पलटी अन महाराष्ट्रातून काही प्रमाणात का होईना पण कुणी फरार होऊ नये याची काळजी घ्यावी." म्हणजे तुमचंही भलं अन आमचंही याचा आनंद होईल... 

                     ✍🏻 विकास विठोबा वाघमारे
                  📲 8379977650
                 @ सोलापूर


शनिवार, १४ जानेवारी, २०१७

अभिषेक अमर असेल

अभिषेक अमर असेल... पण खुनी सुटणार नाहीत!
         
          मंगळवारी अभाविप कर्नाटकच्या अभिषेक नावाच्या कार्यकर्त्यांने आत्महत्या केली. आज खरंतर हा देश एका मोठ्या प्रगतीच्या दिशेने जात असताना कर्नाटक काँग्रेसच्या हरामखोर व सडकछाप NSUI या विद्यार्थी संघटनेने त्याच्यावर दबाव आणला होता. ज्या वेळी देशद्रोही कारवाया करणाऱ्या रोहित वेमुला याने आत्महत्या केली त्यावेळी या देशातील सर्वच ढोंगी राजकीय व हंगामी समाजसेवक मोठ्या पुळक्याने समोर येऊन आवाज करत होते. अभाविपच्या कार्यकर्त्यांना धमकावण्यापासून ते कार्यालये फोडली, मारहाण केली आणि नव्हेनव्हे ते आरोप केले. भावांनो हा देश डोळ्यावर झापड लावून जगत नाही. रोहीत वेमुलाच्या तिरडीवर राजकीय पोळी भाजणाऱ्या आम आदमी पार्टी, काँग्रेस असेल नाहीतर सटर - फटर संघटना असतील यांचे आज भविष्य अंधारमय आहे हे लक्षात घ्यायला हवं. 
       आज अभिषेक सारखा छात्रनेता काँग्रेसच्या NSUI च्या चुकीच्या FIR ला घाबरून हे विश्व सोडून जातो हा काँग्रेसने केलेला खून नव्हे काय? जातीयतेचे विष पेरणाऱ्या राहून गांधींनी अन केजरीवालांनी आता चुप्पी साधली आहे. अरे तुम्ही खुनी आहात हे जगाला माहितीय. अभिषेकने केलेली आत्महत्या देशाच्या समोर आणण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणाऱ्या पत्रकारितेला झोप आलीय. विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणणाऱ्या विद्यार्थी संघटना कुठे आहेत? यावर कुणीही बोलायला तयार नाही. कुणी पप्पू हरामखोर आता भेट देणार नाही ना कुणाच्या डोळ्याला धारही लागणार नाही कारण अभिषेक देशाच्या वैभवाचे स्वप्न पहात होता. अरे तुम्ही काहीच करू शकणार नाहीत ज्या दिवशी तुम्ही तुमची नीतिमत्ता सोडली तेव्हापासून तुमची नौका अंधारमय अन किनारा हुकलेल्या दिशेला निघालीय, हे लक्षात घ्या. 
        अभिषेकने कर्नाटकमधील जे. सी. बी. एम. महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने "योद्धा नमन" नावाचा देशप्रेमी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या वक्त्यांबाबत काँग्रेसला विरोध होता. महाविद्यालयाने कार्यक्रमाला परवानगी नाकारली मात्र कर्नाटक काँग्रेसने आपले वजन वापरून अभाविप कार्यकर्त्यांवर खोटा FIR दाखल केला. या केसला घाबरून अभिषेकने मुत्युला कवेत घेतले.आज आमच्या देशभक्त अभिषेकच्या खुनी असणाऱ्यांनो समाजातील किती देशप्रेमी तुम्ही तुमच्या दबावाने संपवणार आहात? अरे या देशात अभाविपचे 33 लाख छात्रनेते देशभक्त आहेत. जर असेल दम तर विचाराने लढा.
पण एक लक्षात ठेवा *इट का जवाब पत्थर से देंगे ।* 

*जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा हैं।*

                   ✍🏻 *विकास विठोबा वाघमारे*
                  📲 8379977650
                @ सोलापूर


रविवार, ८ जानेवारी, २०१७

ती सध्या काय करते ?

*ती सध्या काय करते?*

       आपली संस्कृती पुरुषप्रधान होती, असं आपल्या इतिहासात समजतं. चूल आणि मूल या दोन शब्दांच्या भोवती पिंगा घालणार तिचं आयुष्य समाजातील काही थोर व्यक्तिमत्वांनी त्या परिघाच्या बाहेर आणण्याचं कार्य केलं. एक सिनेमा येतो काय आणि लगेच तुम्हा आम्हाला तिची आठवण होते काय. हे खरंच या समाजाच्या मुर्दान्डपणाचं लक्षण आहे. आजपर्यंत चार - चौघात नावसुद्धा घ्यायला कमीपणा मानत असणारे आम्ही आज मोठया धिटाईनं "ती सध्या काय करते ?" असं विचारतोय.
        खरंतर समाजातील दोन प्रकारच्या "ती" आहेत. एका समाजातील ती - अजूनही स्वतः काहीच करत नाही कारण ती एका खेडेगावची सरपंच आहे. शिक्का मारावा एवढीही तिच्यात धिटाई नाही. ती आजही चुलीच्या समोर बसून खाली मान घालून सळसळत्या जाळावर भाकऱ्यांचा ढीग लावत असते. ती आजही साधारणतः सर्वच रात्री धाय मोकलून रडत असते कारण तिचा दादला कॉर्टरच्या तालावर तिच्या पाठीची चाळण करत असतो. ती आजही रस्त्यावरून एकटी जात नाही कारण आमच्या समाजाच्या तीव्र नजरा तिला खोलवर जखमा करीत असतात. ती आज समाजाच्या पटलावर सुद्धा येत नाही असंख्य आया आजही तिला नाकारतात म्हणून. बाप बेट्या कुटुंबासाठी जळण काडी गोळा करते, रानोमाळ गुरा - ढोरांच्या पाऊलखुणा मोजत असते. खुरप्याची मूठ आवळत दिवसभर उन्हात - तान्हात चटणी भाकरीवर दिवस काढत लोकांचं काम करत असते. इंटरनेट, वायफाय, 2G, 4G जमाना तिला स्वप्नातसुद्धा येत नाही. विहिरीची मोटर सुरु करुन शिवार भिजवून कामाला गाठ घालायची अशी तिची ओढ असते.
       दुसऱ्या समाजातील ती - मोठंमोठाल्या सिग्नेचर करून शायनिंग मध्ये जगत असते. इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी संपर्क ठेवण्यात ती पटाईत आहे. 2 व्हीलर, 4 व्हीलर अशा अनेक व्हीलर घेऊन ती सफर करत असते. देशावर राज्य करत आराम जगते. चार लोकात भाषानातून लाखोल्या हासडत व्यवस्थेवर ताबा मिळवत असते. सिने जगात कमालीची लोकप्रिय होऊन हवी ती फॅशन करत असते.
      हे वास्तव जाणून घेतलं तर आता सिनेमाच्या थेटरातून बाहेर पडल्यानंतर प्रश्नही उरणार नाही की "ती सध्या काय करते?"
                        ✍🏻 विकास विठोबा वाघमारे
                          📲 8379977650
                          @सोलापूर

शनिवार, ७ जानेवारी, २०१७

सप्रेम नमस्कार,
        आदरणीय मास्तर,
        काल रात्री तुम्हाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा केविलवाणा प्रयत्न काही तुमच्याच वंशजांनी केलाय. तुम्ही राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज. अख्खी हयात देशप्रेम अन सामाजिक जाणिवा प्रगल्भ कशासाठी केल्यात मास्तर तुम्ही ? अहो आज तुम्ही जिवंत नाहीत हे बरं झालं नाहीतर या जातीद्वेष्ट्यांनी तुम्हाला सुखानं जगू दिलंच नसतं. नावावरून बरंच काही असतं बरं का मास्तर. मास्तर तुम्ही खरंतर आयुष्यभर जे काही देशासाठी लिहिलंय न त्यातील एकजरी पान आम्ही वाचलं असतं तर तुम्हाला चौथऱ्यावरून खाली ढकलावं असंं आम्ही सत्तर पिढीतर विचारही केला नसता. पण गुरु आणि शिष्य याला आता आपल्या राज्यात काही किंमत नाही राहिली ते मी तुम्हाला सांगेनच केव्हातरी.
           तुम्ही 1919 ला आमच्यातून गेलात खरंतर आता बरीच दशकं निघून गेली पण अशी भीती तुम्ही कधी कुणाला दाखवली असं माझ्या ऐकिवातसुद्धा नाही. पण तुम्ही काल इतका काय त्रागा केलात की एका रात्रीत तुमच्या पवित्र देशातील तुमच्या नातवांनी तुम्हाला हटवलं. हे तुम्हीच लिहिलंय ना..?
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ....

       पण असो आज तुम्हाला अर्ध्यारात्री हटवून किती मर्द आहोत हे दाखवलं. तुम्ही खरंतर आज असला असतात तर आज तुमचा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी झाला असता अशी मला भीती वाटतीय. तुम्ही आमच्यातून केव्हाच गेलात आम्ही तुमच्या पुतळ्याला स्मरत होतो. आता तेही नाही आमच्या नशिबी. पण तुम्ही नाराज होऊ नका मास्तर... अहो आज ज्यांची जयंती आहे त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आठवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवा, आगरकर, टिळक, सावरकर हे सर्व आठवा ... यांनाही झालाच की त्रास. पण ती माणसं कुठे भ्याली का ? खचली का ? आजही किती अभिमानाने जगताहेत आमच्या नसानसात. तसं तुम्हीही आहातच की...! थोडीच पुतळ्यामध्ये सर्वस्व होतं तुमचं. हं पण आम्हाला तुम्ही चौकात हवे होतात.. 
        मास्तर आज एक सत्य सांगू का ? तुम्हाला ज्यांनी इजा पोहचवली ना ती माणसं नाहीतच मास्तर. त्यांची केव्हाच गिधाडं झालीत आता तुम्हाला हटवून ती माणसात येऊ पाहताहेत., पण छे ! तसं थोडीच होतं. असो तुम्ही आज पुतळ्यातून गेलात पण आम्ही काळजातून तुम्हाला थोडीच जाऊ देऊ..! नाही म्हंटल तरी मास्तर एक तुमचं खूप खूप चुकलं! तुम्ही कशाला केल्या नसत्या देशप्रेमाच्या, देश गौरवाच्या भानगडी. अहो आम्हाला तेच तर नकोय. हां.. तुम्ही जर जाती - जातीत झुंबड लावली असती, आमची माणसं हाकलून लावली असती, परकीयांना मांडीवर घेतलं असतं, पुस्तकातनं चार शिव्या हासडल्या असत्या तर आम्ही तुमची वरात काढली असती अन अजून बरंच काही केलं असतं तुमचं. पण तुम्ही साफसफेद जगलात न एका लहानग्या खोलीत कसलाही बडेजाव न करता ते खरं चुकलं.
         आणि हो हे तुम्ही मात्र अगदी डोळसपणे लिहिलं बरं का...

क्षण एक पुरे प्रेमाचा ,
वर्षाव पडो मरणाचा..!
पण एक खरं आम्ही माणसं आहोत तसंच राहण्याचा प्रयत्न नक्की करू मास्तर...!

                                      आपला 
                         विकास विठोबा वाघमारे
                            @सोलापूर

🙏🏻🙏🏻(मास्तर मला माफ करा)🙏🏻🙏🏻

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

#मास्तरआम्हासमाफकरा #गोविंदाग्रज #रामगणेशगडकरी
गडकरींशी साधलेला संवाद.......
                     विकास विठोबा वाघमारे

हॅलो नमस्कार, आदरणीय गडकरी मास्तर आहेत का? (मी पटकन बोलून मोकळा झालो.)
कोण गडकरी मास्तर? इथे केव्हा आलेत?
अहो, असं काय करताय? आता तुमच्याकडे येऊन ९६ वर्षे झाली की. २३ जानेवारी १९१९ ला.
काय करत होते, गडकरी मास्तर? म्हणजे कसं आहे की तुम्ही ओळख सांगितली तर लवकर कळेल. (समोरून आवाज आला)
अहो महाराज, मास्तरांचे नाव राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज ऊर्फ मास्तर. त्यांचा जन्म २४ मे १८८५ साली झाला आणि ते ना महाराष्ट्रातील पुण्यात राहिले होते. कविता बिविता, देशाप्रमाच्या बाता – बिता अन सामाजिक काहीतरी करत होते बघा...! (काहीबाही लपवत तोकडं सांगून टाकलं)
त्यांनी महाराष्ट्र गौरव गीत लिहिलं ना ?
ओह्ह बरोबर तेच मास्तर हवे आहेत. पण एक सांगतो त्या गौरव गीताचं नाव नका काढू परत. (मी रडवेल्या स्वरात बोललो)
का ? जे चांगलं केलं त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. मराठी साहित्यात केवढी जाण आणली माहितेय का तुला? अरे तुमच्या ४ पिढ्या त्यांच्या साहित्यावर मोठ्या झाल्यात. आजही मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ! प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ! हे गीत अभिमानाने गायलं जातं.
महाराज पण मला माफ करा. हे सर्व तुम्ही मला नका सांगू. कृपया मास्तरांना फोन जोडून द्या तुम्ही फक्त. (मी घाबरत घाबरत थोडा कठोर बोललो.)
हॅलो, मास्तर बोलतोय, बोला. (समोरून रुबाबदार आणि रांगडा आवाज आला)
           
             आदरणीय मास्तर, साष्टांग दंडवत,

       मी आज आपल्या पुण्यातील छत्रपती संभाजीराजे उद्यानाजवळ आलो होतो. पण अचानक नजर गेली आणि तुम्ही तिथे नव्हताच खूप मोठा धक्का बसला. १९६२ सालापासून निपचित पण रुबाबदार शैलीत त्या चौथऱ्यावर बसणारे तुम्ही आज इतक्या दशकानंतर अचानक गायब झालात म्हणून थेट तुम्हाला फोन केला.

अरे मी इथेच आहे की, कुणीतरी मला परवा रात्री माझे नातू घ्यायला आले होते. त्यांना माझा राग आला म्हणे. मला त्यांनी तिथून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. मीही काहीच बोललो नाही आता आपलं काही थोडीच चालतं...?

         मास्तर, पण तुम्ही त्या नातवांना काही बोललात का नाहीत? खरं सांगू का, ते नातू तुमच्या जीवावर उठलेत, तुम्ही तुमचं आयुष्य सामाजिक अन वैचारिक लेखनात घालवलं अन ते नातू मोकाट फिरताहेत रात्री अपरात्री. तुम्हालाच नाही अलीकडे अर्ध्या रात्री ते सर्वांना भेटतायत. सावरकर, आगरकर, फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, नेहरू अजून अनेकांनासुद्धा. काहींना जगलेल्या आयुष्याचा, केलेल्या कार्याचा हिशोब मागतात, काहींना वाईट कार्यासाठी शिव्या देतात, काहींसमोर हुल्लडबाजी करतात, पण हे कधी असे इतके क्रूर झालेले मी पाहिले नव्हते. त्यात मास्तर त्यांची काय चूक हो ? आमची लोकशाही आहे ना, त्यातून निवडून आलेले दगाबाज नेत्यांचे कार्यकर्ते आहेत ते. तुम्ही जे लिहिलं न ते नकोय त्यांना. तुम्ही जगलात ते साधेपण त्यांना पचलं नसेल. पण तुम्ही आता सुखरूप आहात ना? तुम्हाला काही त्रास वगैरे नाही न झाला? त्यांना आम्ही म्हणायचो विचारांचा लढा विचाराने लढा पण असं सांगत असतानाच ते शस्त्रांच्या कारखान्यात कधी गेले याचा पत्ताच नाही लागला.    

        सर्वांना सांग मी बरा आहे. आणि ते महाराष्ट्र देशा आहे ना ते सुखरूप ठेवा रे बाबांनो. माझा महाराष्ट्र अजूनही तसाच आहेना?

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा !
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा !
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा !
बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा !.......

(या गीताला सूर लावून गाताना मास्तरांच्या दोन्ही डोळ्यांच्या गंगा यमुना दुथडी भरून वाहू लागल्याचं मला समजलं)

                     ✍🏻 *विकास विठोबा वाघमारे*
                      @ सोलापूर

(संवाद आवडल्यास अवश्य शेअर करा)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆