शनिवार, ७ जानेवारी, २०१७

सप्रेम नमस्कार,
        आदरणीय मास्तर,
        काल रात्री तुम्हाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा केविलवाणा प्रयत्न काही तुमच्याच वंशजांनी केलाय. तुम्ही राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज. अख्खी हयात देशप्रेम अन सामाजिक जाणिवा प्रगल्भ कशासाठी केल्यात मास्तर तुम्ही ? अहो आज तुम्ही जिवंत नाहीत हे बरं झालं नाहीतर या जातीद्वेष्ट्यांनी तुम्हाला सुखानं जगू दिलंच नसतं. नावावरून बरंच काही असतं बरं का मास्तर. मास्तर तुम्ही खरंतर आयुष्यभर जे काही देशासाठी लिहिलंय न त्यातील एकजरी पान आम्ही वाचलं असतं तर तुम्हाला चौथऱ्यावरून खाली ढकलावं असंं आम्ही सत्तर पिढीतर विचारही केला नसता. पण गुरु आणि शिष्य याला आता आपल्या राज्यात काही किंमत नाही राहिली ते मी तुम्हाला सांगेनच केव्हातरी.
           तुम्ही 1919 ला आमच्यातून गेलात खरंतर आता बरीच दशकं निघून गेली पण अशी भीती तुम्ही कधी कुणाला दाखवली असं माझ्या ऐकिवातसुद्धा नाही. पण तुम्ही काल इतका काय त्रागा केलात की एका रात्रीत तुमच्या पवित्र देशातील तुमच्या नातवांनी तुम्हाला हटवलं. हे तुम्हीच लिहिलंय ना..?
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ....

       पण असो आज तुम्हाला अर्ध्यारात्री हटवून किती मर्द आहोत हे दाखवलं. तुम्ही खरंतर आज असला असतात तर आज तुमचा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी झाला असता अशी मला भीती वाटतीय. तुम्ही आमच्यातून केव्हाच गेलात आम्ही तुमच्या पुतळ्याला स्मरत होतो. आता तेही नाही आमच्या नशिबी. पण तुम्ही नाराज होऊ नका मास्तर... अहो आज ज्यांची जयंती आहे त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आठवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवा, आगरकर, टिळक, सावरकर हे सर्व आठवा ... यांनाही झालाच की त्रास. पण ती माणसं कुठे भ्याली का ? खचली का ? आजही किती अभिमानाने जगताहेत आमच्या नसानसात. तसं तुम्हीही आहातच की...! थोडीच पुतळ्यामध्ये सर्वस्व होतं तुमचं. हं पण आम्हाला तुम्ही चौकात हवे होतात.. 
        मास्तर आज एक सत्य सांगू का ? तुम्हाला ज्यांनी इजा पोहचवली ना ती माणसं नाहीतच मास्तर. त्यांची केव्हाच गिधाडं झालीत आता तुम्हाला हटवून ती माणसात येऊ पाहताहेत., पण छे ! तसं थोडीच होतं. असो तुम्ही आज पुतळ्यातून गेलात पण आम्ही काळजातून तुम्हाला थोडीच जाऊ देऊ..! नाही म्हंटल तरी मास्तर एक तुमचं खूप खूप चुकलं! तुम्ही कशाला केल्या नसत्या देशप्रेमाच्या, देश गौरवाच्या भानगडी. अहो आम्हाला तेच तर नकोय. हां.. तुम्ही जर जाती - जातीत झुंबड लावली असती, आमची माणसं हाकलून लावली असती, परकीयांना मांडीवर घेतलं असतं, पुस्तकातनं चार शिव्या हासडल्या असत्या तर आम्ही तुमची वरात काढली असती अन अजून बरंच काही केलं असतं तुमचं. पण तुम्ही साफसफेद जगलात न एका लहानग्या खोलीत कसलाही बडेजाव न करता ते खरं चुकलं.
         आणि हो हे तुम्ही मात्र अगदी डोळसपणे लिहिलं बरं का...

क्षण एक पुरे प्रेमाचा ,
वर्षाव पडो मरणाचा..!
पण एक खरं आम्ही माणसं आहोत तसंच राहण्याचा प्रयत्न नक्की करू मास्तर...!

                                      आपला 
                         विकास विठोबा वाघमारे
                            @सोलापूर

🙏🏻🙏🏻(मास्तर मला माफ करा)🙏🏻🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा