सोमवार, २९ मे, २०१७

राज"नीती हरवत चालल्याचे कारण..

सध्या गोहत्या बंदीवरून बरेच वादळ वाहत आहे. केंद्र सरकारने गोहत्या बंदी कायदा लागू केला. नुकताच केरळ या राज्यात काँग्रेसच्या (निष्ठावंत?) नेत्यांनी विरोध म्हणून गाईंची भर रस्त्यावर हत्या करून बीफ खाऊन विरोध केला. राजकारणात काँग्रेसने आजपर्यंत केवळ सत्ता आणि सत्तेचा उपभोग घेतला आणि आता जनतेने आपल्याला डावलल्याने बेभान झालेला हा पक्ष वाटेल ते करतो आहे. हिंदू धर्मात गाय ही पवित्र मानली जाते. गाईला 33 कोटी देवाच्या रूपाने समस्त हिंदू बांधव पूजतात.

     खरंतर काँग्रेसने केलेला हा प्रताप मला खुप काही धक्का देणारा किंवा वाईट वाटणारा नाहीच. टिळकांच्या मृत्यूनंतर भारतीय राजकारणातले टिळकयूग त्या दिवशी संपले आणि गांधीयुगाला त्याच दिवशी सुरवात झाली. 20 व्या शतकात केवळ भारताच्या नाही तर संपूर्ण जगाच्या राजकारणात मोहनदास करमचंद गांधी याव्यक्तीने मोठा ठसा उमटवलाय. अहिंसा आणि सत्याग्रह ह्या दोन नवीन मंत्रांची ओळख त्यांनी जगाला करुन दिली. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला देशव्यापी बनवलं.हा लढा ख-या अर्थाने घरोघरी पोहचवला तो गांधीजींनी. महिला, विद्यार्थी,सवर्ण, दलित उच्च-शिक्षीत, मागास असा समाजातला प्रत्येक वर्गाला त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला जोडले. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चार मुद्यांवर त्यांनी ब्रिटीशसाम्राज्याला हादरवून सोडले. अहिंसा या शब्दाची भलीमोठी देणं आपल्या पूर्वजांनी आपल्या पदरी टाकली आहे हेच आज काँग्रेसच्या लक्षात नाही. गलिच्छ व निच पद्धतीचे राजकारण कशा पद्धतीने केले जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण जगासमोर मांडण्याचे पाप त्यांनी केले आहे. राजकारणात जय - पराजय आणि बेरीज - वजा हे अटळ असतं. रुपया वर फेकला आहेच तर छाप किंवा काटा एकच पडणार हे निश्चित असतं.

गांधीजींना अभिप्रेत असलेली काँग्रेस आज त्याच गांधी घराण्याने जिवंत ठेवली नाही. राजकारणात मोदींना घेरण्याचे पराकोटीचे प्रयोजन करता करता गायही विरोधक वाटू लागली अर्थात हिंदूही. बीफ खाणं हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा किंवा संस्काराचा भाग आहे असं म्हणूया. केवळ हिंदूंना विरोध करून राजकीय नीती खुंटीला टांगण्याचा प्रयोग करून झाला. ज्या हाताने गोमाता कापली गेली तो "हात" आता कोणत्याही राज्यात निवडून येईल अशी पुसटशीही आशा राहिली नाही.

लोकशाहीत स्वातंत्र्य आहे म्हणून हे कृत्य केलं असेल तर बहाद्दर म्हणायला हरकत नाही मात्र समस्त हिंदू बंधूंच्या भावनांना रस्त्यावर पायदळी तुडवत केलेला हा विरोध म्हणजे काँग्रेसने आत्मघातकी पाऊल टाकलं आहे. आगीतून फुपाट्यात पडणे म्हणजे काय ? हे आता जनतेला उमगलं असेल.
शास्त्राने गोमाता कशी आणि किती प्रकारे उपयोगी आहे हे सिद्ध करून दिले मात्र राजकीय गोळाबेरीज करण्याच्या हेतूने काय साध्य केलं असेल. केरळमध्ये असलेले सरकार हे विकासाच्या आणि परिवर्तनाच्या विरोधात आहे. कम्युनिष्ठ नेत्यांनी आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या, पूर्णवेळांच्या व प्रचारकांच्या हत्या केल्या आणि सुरूच आहेत. आता काँग्रेसने त्याच राज्यात खुलेआम गोहत्या केल्या हे नवल नाही मात्र हे नीच पद्धतीचे पाऊल अहिंसावादीचा संदेश जगाला देणाऱ्या पक्षाने उचलले हे गंभीर आहे.

एके काळी गाय आणि वासरू हे चिन्ह घेऊन पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यासुद्धा निश्चितच हतबल झाल्या असतील. जर हिंदू धर्माला विरोध करायचा तर मोकळ्या पद्धतीने नक्कीच करा तो अधिकार आहे मात्र अशा विशिष्ठ धर्माला प्रिय असलेल्या प्राण्यांची हत्या करून राजकीय दुकानदारी डागडुजी करण्याचे महापाप म्हणजे स्वतःहून उध्वस्त होणे आहे. लोकशाही मान्य नसलेल्या डाव्यांच्या आणि हिंसावादी काँग्रेसमध्ये काडीचाही फरक नाही आणि आता पक्षाला स्वतःहून संपण्याचे वेध लागले आहेत. विनाकारण टोकाचा राजकीय विरोध करत आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारेपर्यंत द्वेष करतो आहोत हे कधी लक्षात येणार देव जाणे! नाही म्हणायला तर आता त्यांच्या नेत्यांची गणना केली तर मी महात्मा गांधीपासून युवराज राहूल गांधी यांच्यापर्यंतच येऊन थांबतो. (थांबावं लागतं). सत्तेची नशा उतरली असली तरी नौका दिशाहीन होऊन भलत्याच वादळात फसते आहे हे खरं!

✍ विकास विठोबा वाघमारे
📱 8379977650
सोलापूर





रविवार, २८ मे, २०१७

पावसाळी सपानं...

नभ हे झिम्माड झिम्माड
डोळयात ओघळते सर।
येतो पावसाळा बावरा
रेंगाळते तू घरभर।

पाणी पाणी गं काळजाचे
आभाळ ही अंगाई गाते।
झुडपं शहारली रानी
माती हिरवं गाणं गाते।

काळजातला तुझ्या माझ्या
भाव ओठी गं सांडलेला।
ऊन पावसाचा कहर
खेळ रुपेरी मांडलेला।

सर झिम्माड तुझी माझी
उधळली गं रानोमाळ।
लांबते अंतर गुलाबी
मनात भिजतो गं काळ।

तुझ्या उधानल्या रूपाचं
रुजवलं प्रेम मातीत।
सये पावसाळी सपानं
जळतं भिजल्या वातीत।

© Vikas Waghamare
📱8379977650
सोलापूर


प्रेम

💞 आभाळानं धरतीला मिठीत घ्यावं.... 💞
💞 ढगांनी मनापासून पाणी व्हावं...💞
💞 पाखरांनी हृदयातून गाणं गावं...💞
💞 पाण्यानं होडीला पुढं न्यावं....💞

तुला आठवतं? त्या बाभळीच्या झाडाला टेकून बसलो. पिवळं फुल हुंगलं तेव्हा मोगऱ्यासारखा सुगंध दरवळत होता. उन्हात आभाळ भरून आलेलं अन मनही. तेव्हा....

तू विचारलेलंस "ते पावसात सोडलेल्या होड्यांचं पुढं काय होतं?"
खरंतर ते मलाही माहिती नव्हतं. मात्र एखादी होडी लहानपणी मीही सोडलेली त्या अनाहूत पाण्यात... वाहत गेली लांब आणि मग दगड गोट्यात जाऊन अडखळून तिचा अंत वगैरे झाला. प्रत्येकांनी सोडलेली ती होडी अडखळायची, बुडायची आणि मला आनंद व्हायचा.

कुणाच्या तरी नावाने ती होडी सोडलेली असते असं जेव्हा मला कळलं तेव्हा मात्र भरून आलं. पावसाळ्यातील भिजण्या- थिरकण्याचा खेळ आम्ही आनंदाने खेळायचो.

पुढे अशा अनेक होडींना किनारा मिळाला नाही। निरागस होतं मन म्हणून होडी दामटल्या. पण ते नावाने होड्या खरंच सोडतात का ? या प्रश्नाचं उत्तर वगैरे शोधणं मला तर आवडलं नाही.
पण तुला एक विचारू ?

...."अगं, त्या पावसात सोडलेल्या होड्यांचं पुढं काय होतं...?"😢😢😢😢

© Vikas Waghamare
📱8379977650
Solapur

"सचिन.." लाजवाब माहितीपट !

"क्रिकेट माझा श्वास आहे. क्रिकेट नसेल तर मी नसेल." असे अनेक डायलॉग चर्रर्र करत थेट काळजाला भिडत जातात।
लाखो चाहत्यांचं प्रेम आणि सचि~~न... सचि~~न...अशा घातलेल्या सादा या लढण्याचं बळ होतं.

खरंतर मी याला सिनेमा म्हणणार नाही हा एक माहितीपट आहे क्रिकेट जगलेल्या आणि जगवलेल्या माणसाचा.

स्वप्न उराशी घेऊन आपल्याला अनेक गोष्टी साध्य करायच्या असतात आणि सोबत प्रत्येकवेळी दिशादर्शक असेलच याची काय शाश्वती!
रणांगणात जेवढा चपळ आणि दमदार सचिन जगानं पाहिला न त्याहीपेक्षा हळवा आणि माणूस म्हणून कसा आहे याची प्रचिती व तोंडओळख करून देणारा हा माहितीपट म्हणजे "सचिन- अ बिलिअन ड्रीम्स"।

वडिलांच्या निधनाची बातमी पोहचली तेव्हा थिएटर कमालीचं निःशब्द झालं. एका 22-23 वयाच्या तरुणावर संपूर्ण देश आशा ठेऊन असतो आणि त्यांच्या विश्वासाला सार्थ करण्याची धडपड करणारा हा युवक. सचिन आभाळाएवढा मोठा झाला तरी घरातला बाप, मुलगा, पती आणि सदस्य म्हणून लाजबाव वावर पहायला मिळाला.

विवाहाची अलवार प्रेमकथा आहेच. सारा, अर्जुन यांच्यासोबत असलेला आणि बाप म्हणून जबाबदाऱ्या पार पाडणारा सचिन।

प्रचंड विश्वास आणि श्वास रोखून संपूर्ण देश पाहतो आहे आणि अपयश येतं. प्रेक्षक प्रचंड पेटून उठतात, तोडफोड, जाळपोळ आणि बरंच काही होतं तेव्हा 7 दिवस घरातून बाहेरही न पडू शकणारा सचिन पाहून काळजात गलबला झाला. चंदेरी रुपेरी आणि झगमगाच्या पाठीमागे होणारी घालमेल.....

बहिणीने भेट दिलेल्या बॅटपासून मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन हा प्रवास एकदा तरी नक्की बघा!

थिएटरच्या बाहेर पडताना प्रत्येक चाहता एक वेगळा अनुभव आणि आत्मविश्वास घेऊन पडतो हे मात्र खरं!

© Vikas Waghamare
📱8379977650
सोलापूर


शुक्रवार, २६ मे, २०१७

माणुसकीच्या मुलखाला झालंय तरी काय..!

महाराष्ट्र हा सुख दुःखाच्या अनेक पडद्यांना पार करत पुढे गेला. माणुसकीच्या माणसांनी या राज्याला श्रीमंत केले. कालच महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या विमानाचा अपघात झाला आणि अनेक तथाकथित विरोधक समोर येऊन आनंदून गेले.

राजकीय चष्म्यातून जगाकडे कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी पहायचं याची एक पद्धत स्वतःच आखायला हवी. जनतेने सर्वानुमते निवडून देऊन महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली. सरकार कुणाचं आहे आणि काय करतंय याकडे दुर्लक्ष करू मात्र एका माणसाचा अपघात झाला आणि तो एक बाप, एक भाऊ, एक पती आणि एक पालक आहे हे तुम्हा - आम्हाला लक्षात घ्यायला हवं.

कोणतंही सरकार 100% विकास किंवा जनतेच्या अपेक्षेला उतरेल का माहीत नाही. सरकारचे समर्थन म्हणून नाही मात्र माणुसकीच्या महाराष्ट्रात नेमकं कोणतं पातक घडलं की एका मुख्यमंत्र्यांच्या अपघातानंतर वाईट साईट बोलत आनंद निर्माण होतोय.

कुणी मरावं इतकं वाईट खरंच नसतं कुणी! मरणाच्या दारातून परतणाऱ्या माणसाला सावरायला बळ देणारी माणसं एकीकडे आणि त्यावर मीठ चोळणारी जमात एकीकडे असताना आम्हाला प्रगती, विकास, समृद्धता आणि अच्छे दिन पहायचे आहेत हे विशेष।

मी किसानपुत्र आहे मात्र माझ्या बापाच्या कर्जमाफीची मी कुणी मरावं म्हणून देव पाण्यात ठेवणार नाही. कारण माझा बाप मरू नये म्हणून कर्जमाफी मागतोय, मध्यंतरी एका भगिणीने केलेले भाषण ऐकले की " मुलीच्या लग्नापर्यंत बाप टिकावा यासाठी कर्जमाफी द्या"।

शिक्षण घेऊन पिढी शहाणी सुरती व्हावी अशी आशा असताना हे गलिच्छ विचार घेऊन जगणाऱ्या माणसांनो कावळ्याच्या शापाला बाधा झालीय आता समृद्धतेची कास धरून शहाणे व्हा।

मरणाला आणि कारनाला दुष्मणसुद्धा जातो ही माझ्या गावातली पद्धत आहे। मग माणुसकीच्या पखाली वाहणाऱ्या आणि जगाला माणुसकीचा संदेश देणाऱ्या या माणुसकीच्या मुलखाला झालंय तरी काय?

न लागो दृष्ट दुर्जनांची
न लाभो असभ्य नीती।
राष्ट्र विकासाच्या वाटेवरी
अखंड मिळो सत्कार्या गती।

© Vikas Waghamare
📱 8379977650
Solapur



गुरुवार, १८ मे, २०१७

आठवण घालमेल वगैरे

"शाळेत या शाळेत..... डाव खेळू! येताना राज्याला अन परश्याला बी घिऊन यी...."।

ही अशी आरोळी साधारण एप्रिलच्या शेवटी अन मे पूर्ण दररोज दुपारच्या प्रहरी यायची अन मग थेट शाळा गाठायची। रखरखत्या उन्हात पळत जाऊन पाल हातरुन शाळेत बसायचं आणि मग डाव वगैरे सुरू व्हायचा।

त्या डावात कुणीही बसायचं म्हणजे बाप, लेक, चुलता, शेजारी, दोस्त पाहुणा वगैरे वगैरे....

सर्व नाती विसरून रंगलेला डाव। कुणाचा तरी बाप हातात फोक घेऊन आला की डळमळीत व्हायचा।
"माकडा, काय करतुय हितं किती हाका मारल्या, ओ द्याला तोंड नाही काय। तू घरी चल बगतू तुला.." वगैरे म्हणत। ते पोरं तोंड कसं तरी करून दूर पळायचं।
त्या पोराच्या जागी मग तो बोलवायला आलेला बापच बसायचा. असा खेळ।

डाव खेळणं हे काय पाप नव्हतं। मेंढीकोट, पाच-तीन-दोन  वगैरे खेळायचो। उन्हाच्या तावडीतून बाया एकपार्गी कामावरून यायच्या धापा टाकत। डोक्यावर गवताचं ओझं..... धापकन खाली टाकून त्यालाच रेलून 10 -5 मिनिटं बसायच्या। एका दमात तांब्या रिकामा करून मग भाकर तुकडा...

गॅरगॅरवाला टंग•~~ टंग ~~~टंग~` टंग~~~ घंटी वाजवत यायचा तेव्हा संत्राच्या बाटल्या गोळा करून एखादं गॅरगॅर मिळावायचं।
डाव खेळताना भांडण ठरलेलं असायचं। मग कोण पाव्हना बाजूला असेल तर "पाव्हणं, तुम्ही बसा, ह्यला काय येत नाय, पाव्हना आलाय गावावरनं द्या की लगानू, उठ रं तू..." म्हणत चिडणाऱ्या गड्याची विकेट काढायची।

ज्याचा डाव असेल त्याला डिमांड बक्कळ। नाहीतर त्याचं "माजामाजा डाव द्या मी जातू घरी" हे ठरलेलं। बाकी माणसांना न परवडणारं...

शाळेच्या व्हरांड्यात दिवसभर हा असा माहोल कोणत्याही ठिकाणी केवळ गावातच बघायला मिळतो।

4 वाजल्या, जनावरं यायची वेळ झाली की डाव मोडून मग घराकडं मार्गस्थ व्हायचं बिनकामाची माणसं तिथेच झोपायची।

 रोज असा डाव... रोज अशी भारलेली दुपार... रोज नवा जोश... आता सगळंच बदललं । डाव आणि दुपार आहे तशीच केवळ त्या गावात... त्या शाळेत अन त्या माणसात। मी मार्गस्थ झालोय नव्या शहरात... नव्या माणसात.... नव्या दिशेनं...........! जून्या गावाला नवंपन देण्यासाठी.....!!!

#खेड्यामातीच्या_आठवणी_या_माझ्याच_डायरीतून

© Vikas Waghamare
📱 8379977650
 वाघोली ता. मोहोळ जि. सोलापूर


बुधवार, १७ मे, २०१७

सये..

सये चाबकाला चाळ
ठेका आभाळ धरते
तुझ्या पैंजनी चालिला
रान अजुनी झुरते

यावी झेलत्या पावलांनी
सारं तुडवावं रान
मी होईन तिफन
तू ग पेरावं चांदणं

जोड हरणी खिल्लारी
मी गाईन गाणं
सारं वावर उफाळून
ईल हातावर सोनं

तू नाजूक कोवळी
जपून ग राणी चाल
लई असत्यात भेगा
होतं जीवापाड हाल

तुझं डोळं लाल लाल
तसे सये माझे हात
किती भोगलं रानानं
यावा इठ्ठल थेंबात

© Vikas Waghamare
📱 8379977650
सोलापूर


सत्यपाल महाराज

होतात हल्ले इथे
जखम रोज भरते।
तुझ्या राज्यात माझी
रात वैऱ्यावानी सरते।।

वयाच्या 12- 14 वर्षाचा असताना शाळेत सत्यपाल महाराजांचे कीर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले होते. तेव्हा चळवळ, वळवळ आणि बाहेरचा स"माज" माहिती नव्हता मात्र डोळ्यांची पापणी खाली न करता पूर्ण कीर्तन ऐकलं होतं।

माणूसही वाचला होता तेव्हा। सप्तखंजिरी अन कीर्तन मनात घर करून होतं। अधिमधी आठवण यायची महाराजांची। काही महिने झाले असतील त्यांची पत्नी वारल्याची बातमी वाचली तेव्हाही जरा मनाला जखम झालीच।

आज एक बातमी वाचली अन धक्का बसला। सप्तखंजेरीवादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईत एका माथेफिरूने चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना.

ही घटना दि. १२ मे रोजी मुंबईतील नायगाव दादर येथे बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम झाल्यानंतर घडली.

शाहू, फुले, आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रसार करता करता समाजजागृती व प्रबोधन आणि हुंदबंदी वगैरे वगैरे सर्वच विषय कीर्तनातून मांडणाऱ्या एका किर्तनकारावर हल्ला करून काय साध्य होतंय।

पुरोगामी, प्रतिगामी अथवा कसाही असो तुमचा महाराष्ट्र मात्र हे हल्ले पुरोगामी महाराष्ट्रात नाही, प्रतिगामी महाराष्ट्रात नाही तर केवळ महाराष्ट्रात होत आहेत। जग महाराष्ट्राला ओळखत आहे बस्स।

बातमी सुद्धा लवकर नाही समजली। आणखी काय लिहू ?😢😢

जागृती नकोय की जागृती करणारी माणसं हा प्रश्न आ वासून उभा आहे। आणि सोबत महाराष्ट्राची लक्तरे ......😢

आनंदाने मेळवू, आनंदाने खेळवू
आनंदे आनंद साकारू माणसा।

© Vikas Waghamare
 📱 8379977650
सोलापूर



शनिवार, १३ मे, २०१७

आई


घराचं दार आई
खणा खणात भरलेली
पुरी जिंदगी सजवून
कणा कणात उरलेली।

मोत्यात सजले आई
मण्यागत ग चमकते
राती मोगरा फुलवा
अशी अंगाई ग गाते।

मनभर गोडवा तुझा
जावा दिपून महाल
तू जगाची ग माय
तुला मुजरा बहाल।

माझ्या पदरी तू
लाखमोलाची ग पुण्याई
तुझ्या मखमली तेजाने
घर उजळते आई।

© Vikas Waghamare
📱8379977650
सोलापूर

शुक्रवार, १२ मे, २०१७

पाऊस कविता

।। पाऊस इकडेही आहे
पाऊस तिकडेही असेल ।।

तू भिज मनसोक्त
मीही भिजेल
अपेक्षांचं आभाळ घेऊन
बाप झुरत निजेल...
पाऊस इकडेही आहे
पाऊस तिकडेही असेल ।।

उन्ह वारा विजा
सोबत काळजी अन घालमेल
रानी उधळलेलं सोनं
काळीज त्याचं उसवेल...
पाऊस इकडेही आहे
पाऊस तिकडेही असेल ।।

धावेल बेभान होऊन
तूर, मका झाकून देईल
धो धो मुद्दाम कोसळेल
संसार त्याचा उघडा होईल...
पाऊस इकडेही आहे
पाऊस तिकडेही असेल ।।

जग म्हणावं बिनधास्त
दोर बिर फेकून दे
कितीही होउदे अन्याय
मातीमध्ये झोकून घे...
माती कुशीत घेऊन
तुझ्यासवे अंकुरेल...
पाऊस इकडेही आहे
पाऊस तिकडेही असेल ।।

© Vikas Waghamare
📱 8379977650
सोलापूर



गुरुवार, ११ मे, २०१७

रावसाहेबांस किसानपुत्राचे एक पत्र...😑


प्रिय राव"साहेब"जी,

           आपल्याला एका किसानपुत्राकडून साष्टांग नमस्कार.तुम्ही आम्हाला रागावलात याचे वाईट वाटले नाही. मात्र तुम्ही असे भडकले कि माझ्या बापाची तूर तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बोली लावून विकली आणि बाप करोडपती झाला. नुकतंच तुम्ही तमाम महाराष्ट्राला नवीन नातं जोडलं आणि तुम्ही महाराष्ट्राचे भाऊजी झालात तसे पर्यायाने देशाचेही. कारण आपला देश कृषीप्रधान आहे असं खूपदा बापानं सांगितलंय. ४५ हजारपेक्षा जास्त गावं असलेला महाराष्ट्र आज तुम्हाला भाऊजी म्हणतोय. भाऊजींनी मेहुण्याला इथल्या खालच्या पातळीवर न्यायचं काही खरं नसतं. हे पत्र तुम्हाला मिळेल कि नाही हेसुद्धा माहित नाही.
          बाप तूर विकली नाही म्हणून जेवणाच्या ताटात पाणी वतून निघून गेला असेल, आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं म्हणून बापानं धाडस करून तूर लावली, तुमच्या वीज वितरण कंपन्यांनी बापाला रोज रातीला बांधावरून पळायला लावलं, प्रसंगी शेतातच झोपून त्यानं हि तूर तळहातावरच्या फोडासारखी अन वयात आलेल्या पोरीसारखी किती कसोशीनं सांभाळली. तुम्हाला हे सर्व कसं सांगू हेच कळत नाही. उन्हाळा मी म्हणत असताना तळतळत्या मनानं तुरीचं खळं केलं आणि तुम्ही तुरीसोबत बापाची वेशीला टांगली.
      रावजी आता दिलगिरी आली तरीही मनात राहिलंच कि. जखम गुडघ्याला झाल्यावर फडकं तिथेच बांधा सरकार नाहीतर ते डोक्याला बांधन्याचं कष्टतरी नका घेऊ.
        आजपर्यंत पक्षाच्या आणि झेंड्याच्या प्रतिमेला डाग नको म्हणून बाप कुणाच्याही पखाल्या वाहत होता. तुमच्या नेत्यानं तूर पिकवायला लावली आणि तुम्ही खरेदीला करायला नकार दिला होता. वर एक आणि खाली एक हे गाणं तुम्ही गायलं याचा बापाच्या मनाला खोलवर धक्का पोहचलाय.
           तुम्ही गावापासून केंद्रात जाऊन आलात आणि आता राज्यात. शाही, राजेशाही सर्वच मापं ओलांडली. मात्र तुमच्या साल्यांच्या घरावरील छप्पराचं चगाळ बदलणं अजून जमलं नाही. कधी होईल माहितही नाही. पोशिंद्या बापाला उचलून घेता नाही आलं तर नका घेऊ मात्र त्याची अवहेलना करून त्याला हिणवुन संवेदनशून्य सरकार म्हणून डाग तरी नका लावून घेऊ. अभिमान आणि अपेक्षा होत्या आम्ही लोकशाहीने निवडलेल्या प्रतिनिधींकडून ...... 😢😢😢
          आणि तूर पिकवणं हा गुन्हा नाही. तुम्ही ठरवलेला हमीभाव साल्यांनी मान्यही केला मात्र तीही पूर्ण खरेदी होत नाही मग काय करायचं ? हा सवाल समस्त साल्यांनी उभा केला. पुन्हा निवडणूक येतील पुन्हा तुम्ही समोर याल आणि पुन्हा समस्त साले तुरीबाबत विचारतील तेव्हा उत्तर काय असेल ?
          माझ्या खेड्याच्या गावाकडं एक म्हण आहे ती तुम्हाला समजली तर बघा "एका लुगड्यात कुणी म्हातारं होत नसतं सरकार....." 😢😢😢😢😢


आपला हितचिंतक
किसानपुत्र

✍ विकास विठोबा वाघमारे
📱 8379977650
सोलापूर