गुरुवार, ११ मे, २०१७

रावसाहेबांस किसानपुत्राचे एक पत्र...😑


प्रिय राव"साहेब"जी,

           आपल्याला एका किसानपुत्राकडून साष्टांग नमस्कार.तुम्ही आम्हाला रागावलात याचे वाईट वाटले नाही. मात्र तुम्ही असे भडकले कि माझ्या बापाची तूर तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बोली लावून विकली आणि बाप करोडपती झाला. नुकतंच तुम्ही तमाम महाराष्ट्राला नवीन नातं जोडलं आणि तुम्ही महाराष्ट्राचे भाऊजी झालात तसे पर्यायाने देशाचेही. कारण आपला देश कृषीप्रधान आहे असं खूपदा बापानं सांगितलंय. ४५ हजारपेक्षा जास्त गावं असलेला महाराष्ट्र आज तुम्हाला भाऊजी म्हणतोय. भाऊजींनी मेहुण्याला इथल्या खालच्या पातळीवर न्यायचं काही खरं नसतं. हे पत्र तुम्हाला मिळेल कि नाही हेसुद्धा माहित नाही.
          बाप तूर विकली नाही म्हणून जेवणाच्या ताटात पाणी वतून निघून गेला असेल, आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं म्हणून बापानं धाडस करून तूर लावली, तुमच्या वीज वितरण कंपन्यांनी बापाला रोज रातीला बांधावरून पळायला लावलं, प्रसंगी शेतातच झोपून त्यानं हि तूर तळहातावरच्या फोडासारखी अन वयात आलेल्या पोरीसारखी किती कसोशीनं सांभाळली. तुम्हाला हे सर्व कसं सांगू हेच कळत नाही. उन्हाळा मी म्हणत असताना तळतळत्या मनानं तुरीचं खळं केलं आणि तुम्ही तुरीसोबत बापाची वेशीला टांगली.
      रावजी आता दिलगिरी आली तरीही मनात राहिलंच कि. जखम गुडघ्याला झाल्यावर फडकं तिथेच बांधा सरकार नाहीतर ते डोक्याला बांधन्याचं कष्टतरी नका घेऊ.
        आजपर्यंत पक्षाच्या आणि झेंड्याच्या प्रतिमेला डाग नको म्हणून बाप कुणाच्याही पखाल्या वाहत होता. तुमच्या नेत्यानं तूर पिकवायला लावली आणि तुम्ही खरेदीला करायला नकार दिला होता. वर एक आणि खाली एक हे गाणं तुम्ही गायलं याचा बापाच्या मनाला खोलवर धक्का पोहचलाय.
           तुम्ही गावापासून केंद्रात जाऊन आलात आणि आता राज्यात. शाही, राजेशाही सर्वच मापं ओलांडली. मात्र तुमच्या साल्यांच्या घरावरील छप्पराचं चगाळ बदलणं अजून जमलं नाही. कधी होईल माहितही नाही. पोशिंद्या बापाला उचलून घेता नाही आलं तर नका घेऊ मात्र त्याची अवहेलना करून त्याला हिणवुन संवेदनशून्य सरकार म्हणून डाग तरी नका लावून घेऊ. अभिमान आणि अपेक्षा होत्या आम्ही लोकशाहीने निवडलेल्या प्रतिनिधींकडून ...... 😢😢😢
          आणि तूर पिकवणं हा गुन्हा नाही. तुम्ही ठरवलेला हमीभाव साल्यांनी मान्यही केला मात्र तीही पूर्ण खरेदी होत नाही मग काय करायचं ? हा सवाल समस्त साल्यांनी उभा केला. पुन्हा निवडणूक येतील पुन्हा तुम्ही समोर याल आणि पुन्हा समस्त साले तुरीबाबत विचारतील तेव्हा उत्तर काय असेल ?
          माझ्या खेड्याच्या गावाकडं एक म्हण आहे ती तुम्हाला समजली तर बघा "एका लुगड्यात कुणी म्हातारं होत नसतं सरकार....." 😢😢😢😢😢


आपला हितचिंतक
किसानपुत्र

✍ विकास विठोबा वाघमारे
📱 8379977650
सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा