सोमवार, ३१ जुलै, २०१७

कविता

#वर्षपूर्ती😍😍😘😍😃

दरवेळी असंच होतं ,
मी निघालो कि
पावसाचं आगमन होतं.....
एवढा गुलाबी
पाऊस सोडून मी जाईल का?
भेट नाही
पण आठवण ओली
भर पावसात भाव खाईल का.....
पाऊस मात्र असाच करतो,
तो आला कि
मी मात्र मनात झुरतो....
पावसा तू ये अथवा येऊ नको,
भिजल्या आठवणी ठेऊन
अर्ध्यावर असा जाऊ नको.........

  ✍ Vikas Waghamare  (वाघोलीकर)

कविता

#माऊली🎊😘💝

रानी घाट्यांचा नाद, माऊली पांडुरंग झाला।
तिफन हाके डौलात, माऊली रानी दंग झाला।।

किती व्याकुळ भेटी, नाम पंढरी सदा स्मरतो।
टाळ चिपळ्या नाचवत, माऊली वादंग झाला।।

उधळत उसळत, होऊनी बेभान वारकरी।
अंश होण्यास पंढरीचा, माऊली रंग झाला।।

✍ Vikas Waghamare
सोलापूर
8379977650

कविता

<< नवी कविता>>
#मातीची_क्रांती🎊🎊

जगण्या आनंदी बापा
यावा पाऊस टपोरा।
भुई तहानली आता
तरी नाही केला पेरा।।

जन्म राबतो शिवारी
दाद द्यावी सरकारा।
कित्येक जागल्या राती
रानी भिजवाया सारा।।

क्रांती मातीची घडावी
येवो कणसा चांदणं।
किती दिवस असेच
आशा घेऊन नांदणं।।

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱 8379977650

कविता

हे विठ्ठला...💗💓💗

कोरड्या वाटेचे पायी
उमटले ठसे सारे,
जीव गुंतला पंढरी
दाटली चंद्रभागा रे.

लय सोसल्या ठोकरा
तुझी व्हावी गळाभेट,
माय बाप पंढरी तू
उजळावी पायवाट.

लळा तुझा पांडुरंगा
आजी लागला अपार,
नको मला लूट तुझी
व्हावं हिरवं शिवार.

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

आवडल्यास जरूर शेअर करा.💗💗

कविता

रिते आभाळ असते तेव्हा...😶😶

सुसाट वाहतो वारा पेरलेली वेळ असते तेव्हा
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

एक एक काकरी जवळ जाऊन बघ।
वांज गाभुळ माती हातात घेऊन बघ।
जीवन खिन्न वाटेल, आभाळ ओलं वाटेल,
पाखरांचा आवाज सांगू पाहिल तुला काही।
आणि तू एका कटाक्षाचा प्रयत्नही करणार नाही।
जीव मुठीत धरून तू वर पाहशील तेव्हा....
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

सुसाट वाहतो वारा पेरलेली वेळ असते तेव्हा
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

वावर मुकं मुकं वाटेल..,
डोक्यात धुकं धुकं दाटेल..।
दूरवर पिंपळ सळसळ, चिव चिव ऐकू येईल,
कुण्या पडक्या छप्परात पावश्या गाणं गाईल।
तू कवेत घे बियाणं, भुईला बिलगण्याचा प्रयत्न कर,
कानात तुझ्या गलगा, ऊब लागेल खूप तेव्हा...
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

सुसाट वाहतो वारा पेरलेली वेळ असते तेव्हा....
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

मातीचा आर्जव होईल,
तुझ्या डोळ्यात पाणी येईल।
एकाकी पडलेल्या तिफणीच्या गळ्यात पडशील,
मैलोनमैलचा दुष्काळ आठवून, हंबरून हंबरून रडशील।
पुन्हा साल गुमान सोस, पाठीवर कारभारणीचा हात फिरेल,
कित्ती कित्ती चुकलो आपण आभाळ ढगात झुरेल।
तू उपाशी सताड उघडे राती झोपशील तेव्हा,
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....
रिते आभाळ असते तेव्हा....😑😑😑😑

________________😢😢😢😢_________________

प्रतिक्रिया कळवा।😑😑

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

कविता

❤❤❤❤
खिडकीत एक थेंब आठवण होऊन झुलत राहतो,
मन कातर कातर होते मग गंधाळ गारवा येतो।।

पाऊस तळं, जुलमी डोळं सगळंच तेव्हा आठवतो,
नदी, नाले, समुद्र होऊन विरह घेऊन संथ वाहतो।

© विकास विठोबा वाघमारे

बाजार The play of education

कविता मराठी

एक वीज हात देते हातात माझ्या,
किती भरून येतो पाऊस आत माझ्या।।

हळवं बिळवं होतं तेव्हा सगळं अंतर्मन
येते पाठमोरी ती सोडण्या नाव पावसात माझ्या।

थेंब बिलगतो मजला तेव्हा कातरलेला क्षण,
अन जीव येत जातो तेव्हा श्वासात माझ्या।

होत जाते अंतर वजा गुलाबी गारव्याचे,
बावरा मी एकटाच उरतो भासात माझ्या।

© विकास विठोबा वाघमारे
8379977650
#कविता_विवा

कविता

एक पाऊस ❤❤

एक पाऊस तुला घे,
एक मला..
तू घेतल्याचा गुलामपणा नको सांगू
मी दिल्याचा आव नाही आणणार...

पहिला वहिला पाऊस
वाटून घेतला की
जरा कमी होतं
ओझं पावसाचं.. अन
वाढत जातो पाऊस
तुझ्या माझ्या मनात ...
निथळत... खळाळत... तुडुंब !

एक पाऊस तुला..
एक  पाऊस मला ❤❤❤

© विकास विठोबा वाघमारे
📱8379977650

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

कधी संस्कारही महत्वाचा असतो!

धर्मांधता आणि गलिच्छ विचारांनी बरबटलेल्या एका माथेफिरू लोकप्रतिनिधीने (?) केलेलं विधान हे काही धक्का बसणारं किंवा खूप जिव्हारी लावून घेण्यासारखं मला अजिबात वाटत नाही आणि भारतीयाला वाटूही नये। मी वंदे मातरम म्हणणार नाही असं ज्यावेळी मुखातून वदलं जातं त्यावेळी ज्या भुईला माता म्हणतो त्या भुईचे पांग फेडण्याची त्याची लायकी, कुवत नसते असं मी मानतो।

एक आमदार, स"माज"वादी पक्ष, दोन मतदारसंघातून निवडून आलेला वगैरे वगैरे आणि त्यांचा तथाकथित माज। नुकतीच या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी झाली. त्याच दरम्यान ही जमात असं काही बरळते ते या देशाचं दुर्दैव आहे. या भूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी गायलेलं वंदे मातरम म्हणायची लाज वाटणं म्हणजे आईला आई म्हणायला लाज वाटण्याच्या पलीकडचे आहे। ज्या देशासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिलं, भूमातेला वंदन करणारी माणसं आजही आम्ही पाहतो. गायक ए. आर. रहेमान यांनी वंदे मातरम गायलं. या देशाला धर्माच्या भाषेत बोलायच्या म्हंटल तर मुस्लिम देशभक्तांची कमी नाहीय पण भडकावून व्यवस्था गढूळ करू पाहणाऱ्या हरामखोरांचा देश असू शकत नाही हे जाणलं पाहिजे। हाकलून लावण्या इतका वेळही इथे दवडणे चुकीचेच।

भारत हा माझा देश आहे ही प्रतिज्ञा जेव्हा अभिमानाने म्हणतो न तेव्हा हा भारत माझा असतो। अगदीच माझा। आणि तेव्हा मी भारताचा असतो। वंदे मातरम हे माझ्या देशाचं गुणगान असलेलं गीत म्हणजे जनमनाला चेतवणारं रसायन आहे। अबू आझमी, वारीस पठाण सारख्या माथेफिरू आणि तथाकथित लोकांमध्ये जेव्हा अशी मूर्खपणाची लक्षणे दिसतात तेव्हाच त्या बुद्धीची कीव येते। आणि अशी मानसिकता असलेले लोकप्रतिनिधी सभागृहात बसतात तेव्हा राष्ट्र, राज्य समृद्धतेचा कोणता विचार करत असतील हे संशोधनात्मक आहे। जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा प्रवास ज्याठिकाणी करतो आहोत त्यावर प्रेम न करणारी जमात ही देशाला घातक तर आहेच पण या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला, व्यवस्थेला आणि विकासाला बाधक आहे, हे नक्की। एका अबू आझमी, वारीस पठाणाने देशाला घंटा फरक पडणार नाही कारण त्याअगोदर हजारो कलाम या देशांत घडवणारी माती आहे ही। पण काळ सोकावू नये म्हणून जागीच ठेचलेलं बरं। सगळेच देशभक्ती आणि देशद्रोह्यांच्या पंगतीला नेण्याची आवश्यकता नाही बरंच काही आचार, विचार अन संस्कारांवर सुद्धा अवलंबून असतं!

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर

पटलं तर नक्की शेअर करा

बुधवार, २६ जुलै, २०१७

खाली पेट मैं किसका नाम लूँ ?

गोष्ट साधारण एक महिन्यापूर्वीची आहे. ठाणे स्टेशनवरून मी सोलापूरला रात्रीची सिद्धेश्वर पकडली. प्रचंड गर्दी होती त्यामुळे उभंच रहावं लागलं. कल्याण पर्यंत एका पायावर वगैरे थांबून गेलो आणि मग खाली बसण्याऐवढी जागा झाली. डोक्याचे केस विचित्र वाढलेले, दाढीला कधी तरी वस्तारा लावलेला असेल. अंगावरचा चेक्सचा शर्ट आणि जीन्स गुडघ्यांवर फाटलेली आणि पांढरा फुपाटा भरलेला असा वरवरचा पेहराव असलेला एक तरुण माझ्या समोर उभा होता. जागा झाली तेव्हा मटकन खाली बसला मग मीही मांडी घालून समोरच बसलो.

भाई, कहा जा रहे हो? - मी जरा कुचंबत अर्धवट हिंदी बोललो.
पूना जाना हैं। आप? बिहारी टोनिंग धावत्या शैलीत बोलून मोकळा झाला.
मैं सोलापूर, आपका नाम? - पुन्हा मी।

संदेसकुमार. क्या हुवा?

कुछ नहीं भाई। पूना किस लिये जा रहे हो? मी आगाऊ प्रश्न विचारला।

हमरा साब हैं न वहा। साईड सुरू हैं।

हं, आप कहा से हो? मी

बिहार से, लेकिन अब पूना, बंबय घुमते रहते हैं।

अशाच गप्पा रेल्वेत खाली फतकल मांडून आम्ही बोलत होतो. मग पुढे बेकारी, बेरोजगार, भ्रष्टाचार, राजकारण, व्यवसाय, महागाई आणि स्थानिक व्यवस्था असं सगळं मी जाणून घेतलं।

23-24 वयाचा एक तरुण मात्र त्यांच्यामध्ये जोश, उत्साह, सळसळतापणा, कर्तृत्ववान, स्वाभिमान वगैरे काहीच उरलेलं मला जाणवलं नाही। पण त्या प्रवासात बिहारचं वैराण अन जळजळीत वास्तव ऐकून जीवाला वाईट वाटण्याशिवाय पर्याय नव्हता।

भाऊ, मी इकडे मुंबईला 19 व्या वर्षी आलो. टाईल फरश्या बसवायला शिकलो आणि मग हळूहळू काम मिळू लागलं। आमचा ठेकेदार असतोरोज आम्हाला 160 रुपये देतो। आम्ही व्यक्तिगत काम केलं तर पैसे जास्त मिळतील पण जीवाला प्रचंड धोका आहे। हाताने करून खायचं, वर्षातून एकदा बिहारला जातो, महिन्याला सगळं जाऊन 3 हजार हातात राहतात। व्यसन लागलं त्याला वेगळाच खर्च येतो। बिहारला राहून तिथेच छोटमोठं काम का करत नाहीस? यावर म्हणाला गेल्यावर्षी असाच विचार करून गेलो, 7 महिने घरीच बसलो, एकदाही काम नाही मिळालं, गावात साधी लाईटसुद्धा नाही इंडस्ट्री तर जवळपास अजिबात नाही, मोठा भाऊ आहे गाड्यांचे पंक्चर काढतो। आई बाप म्हातारे झाले। इकडे आम्ही गावातील 600 पेक्षा जास्त तरुण आलोय। गावाची लोकसंख्या 13 हजारच्या आसपास असेल म्हणाला। पण गावात खूप कमी लोक राहतात सगळ्यांनी बिहार सोडलंय। लालूसाहेब कोण माहीत नाही बोलला, मोदी माहितेयत। आमच्या इथे आमदार नाही म्हणाला, (त्याला काहीच देणंघेणं नव्हतं)। किती दिवस हे काम करणार तर म्हणाला भाई, जिंदगीभर तो करना ही पडेगा, मैं भी गांव जा के ऐशोआराम जिंदगी जीना चाहता हूँ। पर जिंदगी का गाड़ा कैसा चलेगा? हमे सुबह का खाना हमेशा सपनो में आता हैं। पूरा देस मोदी कहता हैं पर मैं खाली पेट किसका नाम लूँ? यहां बम्बई में आया पहला बहोत लोगों ने काम का पैसा डुबाया। जवाब मांगा तो उन्होंने गालियां सुनाई. मैं तो परप्रांतीय हूँ। जो संभाल लेते हैं और जितना पैसा देते उनका काम करता बस्स। यही जिंदगी भैय्या लोगोंकी हैं  दोस्त। जीने की तलाश में आज बम्बई, कल पूना परसों पता नहीं।

पुन्हा पुन्हा नवनिर्माणाची व्यापक व्याख्या आणि राष्ट्र परिवर्तनाच्या असंख्य व्हावटळांनी मेंदूला घेरलं होतं। एक भैय्या आणि मी बिहार, रोजगार, भविष्य आणि फरपट बस्स इतकंच त्या क्षणाला भिनलं। लालूंनी चारा खाल्ला, यादवी पिलावळींना मोहमाया आणि खुर्च्या दिल्या, नितीशकुमारांनी समाजवाद्यांचे राजकारण केलं। चूक कुणाचीच नाही। समाज निरक्षर राहिला न त्याचा हा परिणाम असतो। एव्हाना पुणे आलं तो हात मिळवून मिलेंगे म्हणत निघून गेला अन मला त्याचं ते वाक्य छळू लागलं, " पुरा देस मोदी कहता हैं, पर मैं खाली पेट किसका नाम लूँ?

शनिवार, २२ जुलै, २०१७

ग्रेट लीडर बड्डे

पार्ट पहिला:-
बोटावर मोजणाऱ्या टक्केवारीच्या जातीतला एक माणूस मुख्यमंत्री झाला।(जगातलं आठव आश्चर्य नाही तरीही) हे केवळ लक्ष्यात येणं हेसुद्धा भाग्याचं असतं बरं।

जात आडवी येतेच। गेल्या अडीच- तीन वर्षातला प्रवास बघा। पण जातबीत खुंटीला टांगून परिवर्तन आणि विकासाची व्यापक व्याख्या तयार करणाऱ्या व निडर लढणाऱ्या ग्रेट नेत्याला हॅपीवाला बड्डे। जिओ CM साब❤❤

पार्ट दुसरा:-

बक्कळ पुरोगामीत्वाची झुल अन काकांचा वरदहस्त पाठीवर असताना धरणग्रस्त होणं ज्यांच्या नशिबी आलं। मोठ्या मनानं रांगडा गडी म्हणून पुन्हा सक्रिय बिक्रिय होऊन यात्रा काढली। मनापासून थोडा थोडा आवडतो तो पुतण्या मलाही। त्या जाणत्या काकांच्या पुतण्याला बक्कळ मोठं होण्याच्या सदिच्छा। (म्हणजे सीएम बीएम 😜😜)


(दोन नेते, दोन पक्ष, दोन विचारसारण्या हे सगळं घेऊन एकाच क्षेत्रात वावरणाऱ्या दोन तुफानी वादळाला बड्डेवाल्या शुभेच्छा। जिओ जी भरके❤❤❤❤)

© विकास विठोबा वाघमारे
8379977650

शनिवार, ८ जुलै, २०१७

जिद्दीची कहाणी आनंदी आनंद..

"नापास म्हणजे आयुष्याच्या प्रगतीला बसलेली खीळ" असा समज करून तथाकथित समाजाचे टोमणे सहन करणाऱ्या जिंदादिल अन धडपडी युवकाच्या आयुष्याची कथा संपूर्ण देशात हिंदीमध्ये नववीच्या पाठ्यपुस्तकात  विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी घेतली गेलीय।

एक काळ असा होता की नापास झाल्यावर ज्या समाजानं धुडकावून लावलं। छोट्या घरातल्या पोरासोरांनी मोठी स्वप्न पाहण्याचं पाप करू नये ही भावना व्यक्त केली। मेकॅनिकल असणाऱ्या बापानं, आपल्या दुधावर विश्वास ठेवून आईने अन डोळसपणे आयुष्याच्या व्हावटळात नौका शोधणाऱ्या मित्रांनी आधार दिला। मिळालेल्या अपमान आणि खंबीरपणे पाठीशी उभे असणाऱ्या कुटुंबामुळे एव्हरेस्ट शिखर सर करून जगातील 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरं सर करण्याची भरीव कामगिरी अभिमानाने पार पाडली। त्याच हरहुन्नरी दोस्ताचे नाव डॉ. श्री. आनंद बनसोडे.

2012च्या नंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ओळख झाली तेव्हा आनंद दादांच्या घरी भेटवस्तू पोहोच करण्याच्या निमित्ताने गेलो। छोट्याशा घरात भरगच्च चौफेर सन्मानचिन्हं पाहिली। मातृत्वाची गडद किनार अन पितृत्वाची सावली पाहिली।

दरम्यानच्या काळात "स्वप्नातून सत्याकडे... एव्हरेस्टची स्वप्नपूर्ती" हे आत्मचरित्र आणि आंबट गोड कधी विसरता न येणाऱ्या आठवणी आणि जिद्दीची कहाणी असलेलं पुस्तक मला दादांनी भेट म्हणून दिलं. भरभरल्या डोळ्यांनी झपाटून काढल्यासारखं संपूर्ण पुस्तक कितीदा वाचून काढलं आठवत नाही। समाजव्यवस्थेच्या तथाकथित प्रवाहाच्या बाहेर असलेल्या गावंडळ व नापास पोरांनी खिसा तपासून स्वप्नं पहावी हा जणू अलिखित नियम असल्याचं अनेकदा दादांनी अनुभवलंय। ज्या वर्गात नापास झाले त्याच वर्गाच्या अभ्यासक्रमात पाठ शिकवला जावा यापेक्षा सर्वात मोठा स्वप्नपूर्तीचा आनंद किती मोठा!

सेव्हन समीट मोहीम आखली आणि 4 शिखरं पार केल्यानंतर आकस्मित पराकोटीचं दुःख आयुष्यात आलं। उमेदीचा काळ... हिंमतीने लढण्याचा निर्धार ... आणि काळानं मांडलेला खेळ या चक्रव्ह्यूवातून अलगद बाहेर पडत युनायटेड नेशनच्या जागतिक शांतता परिषदेपर्यंत मजल मारली। अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंद केली।

लहानपणी एकीकडे एव्हरेस्ट शिखर खुणावत असताना मोकळा खिसा सतत मनात घोंगवायचा त्याच काळात वाळूच्या ढिगाऱ्यावर उभा राहून जगाच्या सर्वोच्च शिखराची उंची मोजणाऱ्या मुसाफिर डॉ. आनंद अशोक बनसोडे या माणसाला सलाम। मनःपूर्वक शुभेच्छा।

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱 8379977650

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

रिते आभाळ असते तेव्हा...

सुसाट वारा वाहतो पेरलेली वेळ असते तेव्हा
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

एक एक काकरी जवळ जाऊन बघ।
वांज गाभुळ माती हातात घेऊन बघ।
जीवन खिन्न वाटेल, आभाळ ओलं वाटेल,
पाखरांचा आवाज सांगू पाहिल तुला काही।
आणि तू एका कटाक्षाचा प्रयत्नही करणार नाही।
जीव मुठीत धरून तू वर पाहशील तेव्हा....
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

सुसाट वारा वाहतो पेरलेली वेळ असते तेव्हा
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

वावर मुकं मुकं वाटेल..,
डोक्यात धुकं धुकं दाटेल..।
दूरवर पिंपळ सळसळ, चिव चिव ऐकू येईल,
कुण्या पडक्या छप्परात पावश्या गाणं गाईल।
तू कवेत घे बियाणं, भुईला बिलगण्याचा प्रयत्न कर,
कानात तुझ्या गलगा, ऊब लागेल खूप तेव्हा...
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

सुसाट वारा वाहतो पेरलेली वेळ असते तेव्हा....
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

मातीचा आर्जव होईल,
तुझ्या डोळ्यात पाणी येईल।
एकाकी पडलेल्या तिफणीच्या गळ्यात पडशील,
मैलोनमैलचा दुष्काळ आठवून, हंबरून हंबरून रडशील।
पुन्हा साल गुमान सोस, पाठीवर कारभारणीचा हात फिरेल,
कित्ती कित्ती चुकलो आपण आभाळ ढगात झुरेल।
तू उपाशी सताड उघडे राती झोपशील तेव्हा,
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

________________😢😢😢😢_________________

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

मंगळवार, ४ जुलै, २०१७

वारकरी कविता

हे विठ्ठला...

कोरड्या वाटेचे पायी
उमटले ठसे सारे,
जीव गुंतला पंढरी
दाटली चंद्रभागा रे.

लय सोसल्या ठोकरा
तुझी व्हावी गळाभेट,
माय बाप पंढरी तू
उजळावी पायवाट.

लळा तुझा पांडुरंगा
आजी लागला अपार,
नको मला लूट तुझी
व्हावं हिरवं शिवार.

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

आवडल्यास जरूर शेअर करा.💗💗

सोमवार, ३ जुलै, २०१७

कविता


मातीची क्रांती...

जगण्या आनंदी बापा
यावा पाऊस टपोरा।
भुई तहानली आता
तरी नाही केला पेरा।।

जन्म राबतो शिवारी
दाद द्यावी सरकारा।
कित्येक जागल्या राती
रानी भिजवाया सारा।।

क्रांती मातीची घडावी
येवो कणसा चांदणं।
किती दिवस असेच
आशा घेऊन नांदणं।।

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱 8379977650
Vikas Waghamare

रविवार, २ जुलै, २०१७

जेष्ठांच्या पडझड अन जीवघेण्या रंगील्या उन्हातून आषाढी पालवी दिल गार्डन गार्डन करत अलगद शिवारी येते।

पहिल्या वहिल्या आभाळ मोत्यांनी माय बापाचं शिवार फुलारून येऊ लागतं। पाखरांना गायला गळा येतो तर वासरा-कोकरांना रानोमाळ हुंदडायला पाय येतात। लाहीलाही उन्हानं खंगलेल्या घटका मोजणारी म्हातारी माणसं अजून एक साल म्हणून आनंदी होतात। रानोमाळ पाण्याचे पाठ अन कुसळाची पालवी बाळसं धरते तेव्हा खऱ्या अर्थाने जनावरं यथेच्छ चरायला धावतात। लुगड्याचा पदर कंबरेला खवत डोक्याला फाटक्या टावेलाची टापर बांधून चार दोन हाड-कातडं येक झालेल्या जनावरांना घेऊन कुणाची माय माळरान जवळ करत जनावर हिवराला गुतवून बसते।

रोजगार हमीच्या कामानं नालाबल्डिंगी टच्चं भरलेल्या पाहिल्या की हमेशा माय बापाला फोडं आठवून उन्हाळ्याच्या झळा भर आषाढात अंगावर येतात। कुणाचं श्येत नांगरून घ्यायचं तर कुणाचं बळी-पाळी। तर कुणाची ब्याची तयारीच दिवाळीच्या सणापेक्षा जोमदार सुरू होते. पहिल्या पावसानं मनाला भिजवलं, वावार भिजवलं अन त्यातच घराच्या छप्पराच्या चगळातून अलगद आत येणाऱ्या काळसर इटकरी धुराच्या पाण्यानं घराच्या फाटलेल्या रूपाचं दर्शन होतं। कुणी पास झाल्याचं पेढं देतं तर कुणी नापास झालं म्हणून जनावरांचा खांडवा घेऊन माळावर इटी दांडूवर अन गोट्याच्या खेळात धुंद होतो। "काळ्या मातीत मातीत तिफन चालते...." "यावं यावं हो बैलाला.... चल सर्ज्यागी.." अशा गाण्यानं शिवारभार गलगा होतो। माऊली माऊली गजर कानोकानी सुरू होतो तेव्हा इठूवर जीव ओवाळून टाकणारा बा साऱ्या संसारातून पंढरीच्या दिशेनं ओढला जातो। वावर अन मातीला मनसोक्त भिजवत काळी भुईत दडलेल्या जीवाला जीव देणाऱ्या आषाढाला सारं शिवार हिरवाईनं नटून झुलत असतं। गुलाब, मोगऱ्याच्या सुगंधाची जागा शेताभातातल्या मातीच्या गंधानं घ्यायला सुरुवात होते... तेव्हा खरा मन मोराचा पिसारा फुलू लागतो।

विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱 8379977650