शनिवार, ८ जुलै, २०१७

जिद्दीची कहाणी आनंदी आनंद..

"नापास म्हणजे आयुष्याच्या प्रगतीला बसलेली खीळ" असा समज करून तथाकथित समाजाचे टोमणे सहन करणाऱ्या जिंदादिल अन धडपडी युवकाच्या आयुष्याची कथा संपूर्ण देशात हिंदीमध्ये नववीच्या पाठ्यपुस्तकात  विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी घेतली गेलीय।

एक काळ असा होता की नापास झाल्यावर ज्या समाजानं धुडकावून लावलं। छोट्या घरातल्या पोरासोरांनी मोठी स्वप्न पाहण्याचं पाप करू नये ही भावना व्यक्त केली। मेकॅनिकल असणाऱ्या बापानं, आपल्या दुधावर विश्वास ठेवून आईने अन डोळसपणे आयुष्याच्या व्हावटळात नौका शोधणाऱ्या मित्रांनी आधार दिला। मिळालेल्या अपमान आणि खंबीरपणे पाठीशी उभे असणाऱ्या कुटुंबामुळे एव्हरेस्ट शिखर सर करून जगातील 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरं सर करण्याची भरीव कामगिरी अभिमानाने पार पाडली। त्याच हरहुन्नरी दोस्ताचे नाव डॉ. श्री. आनंद बनसोडे.

2012च्या नंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ओळख झाली तेव्हा आनंद दादांच्या घरी भेटवस्तू पोहोच करण्याच्या निमित्ताने गेलो। छोट्याशा घरात भरगच्च चौफेर सन्मानचिन्हं पाहिली। मातृत्वाची गडद किनार अन पितृत्वाची सावली पाहिली।

दरम्यानच्या काळात "स्वप्नातून सत्याकडे... एव्हरेस्टची स्वप्नपूर्ती" हे आत्मचरित्र आणि आंबट गोड कधी विसरता न येणाऱ्या आठवणी आणि जिद्दीची कहाणी असलेलं पुस्तक मला दादांनी भेट म्हणून दिलं. भरभरल्या डोळ्यांनी झपाटून काढल्यासारखं संपूर्ण पुस्तक कितीदा वाचून काढलं आठवत नाही। समाजव्यवस्थेच्या तथाकथित प्रवाहाच्या बाहेर असलेल्या गावंडळ व नापास पोरांनी खिसा तपासून स्वप्नं पहावी हा जणू अलिखित नियम असल्याचं अनेकदा दादांनी अनुभवलंय। ज्या वर्गात नापास झाले त्याच वर्गाच्या अभ्यासक्रमात पाठ शिकवला जावा यापेक्षा सर्वात मोठा स्वप्नपूर्तीचा आनंद किती मोठा!

सेव्हन समीट मोहीम आखली आणि 4 शिखरं पार केल्यानंतर आकस्मित पराकोटीचं दुःख आयुष्यात आलं। उमेदीचा काळ... हिंमतीने लढण्याचा निर्धार ... आणि काळानं मांडलेला खेळ या चक्रव्ह्यूवातून अलगद बाहेर पडत युनायटेड नेशनच्या जागतिक शांतता परिषदेपर्यंत मजल मारली। अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंद केली।

लहानपणी एकीकडे एव्हरेस्ट शिखर खुणावत असताना मोकळा खिसा सतत मनात घोंगवायचा त्याच काळात वाळूच्या ढिगाऱ्यावर उभा राहून जगाच्या सर्वोच्च शिखराची उंची मोजणाऱ्या मुसाफिर डॉ. आनंद अशोक बनसोडे या माणसाला सलाम। मनःपूर्वक शुभेच्छा।

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱 8379977650

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा