सोमवार, ३१ जुलै, २०१७

कविता

रिते आभाळ असते तेव्हा...😶😶

सुसाट वाहतो वारा पेरलेली वेळ असते तेव्हा
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

एक एक काकरी जवळ जाऊन बघ।
वांज गाभुळ माती हातात घेऊन बघ।
जीवन खिन्न वाटेल, आभाळ ओलं वाटेल,
पाखरांचा आवाज सांगू पाहिल तुला काही।
आणि तू एका कटाक्षाचा प्रयत्नही करणार नाही।
जीव मुठीत धरून तू वर पाहशील तेव्हा....
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

सुसाट वाहतो वारा पेरलेली वेळ असते तेव्हा
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

वावर मुकं मुकं वाटेल..,
डोक्यात धुकं धुकं दाटेल..।
दूरवर पिंपळ सळसळ, चिव चिव ऐकू येईल,
कुण्या पडक्या छप्परात पावश्या गाणं गाईल।
तू कवेत घे बियाणं, भुईला बिलगण्याचा प्रयत्न कर,
कानात तुझ्या गलगा, ऊब लागेल खूप तेव्हा...
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

सुसाट वाहतो वारा पेरलेली वेळ असते तेव्हा....
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

मातीचा आर्जव होईल,
तुझ्या डोळ्यात पाणी येईल।
एकाकी पडलेल्या तिफणीच्या गळ्यात पडशील,
मैलोनमैलचा दुष्काळ आठवून, हंबरून हंबरून रडशील।
पुन्हा साल गुमान सोस, पाठीवर कारभारणीचा हात फिरेल,
कित्ती कित्ती चुकलो आपण आभाळ ढगात झुरेल।
तू उपाशी सताड उघडे राती झोपशील तेव्हा,
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....
रिते आभाळ असते तेव्हा....😑😑😑😑

________________😢😢😢😢_________________

प्रतिक्रिया कळवा।😑😑

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा