शुक्रवार, २६ मे, २०१७

माणुसकीच्या मुलखाला झालंय तरी काय..!

महाराष्ट्र हा सुख दुःखाच्या अनेक पडद्यांना पार करत पुढे गेला. माणुसकीच्या माणसांनी या राज्याला श्रीमंत केले. कालच महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या विमानाचा अपघात झाला आणि अनेक तथाकथित विरोधक समोर येऊन आनंदून गेले.

राजकीय चष्म्यातून जगाकडे कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी पहायचं याची एक पद्धत स्वतःच आखायला हवी. जनतेने सर्वानुमते निवडून देऊन महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली. सरकार कुणाचं आहे आणि काय करतंय याकडे दुर्लक्ष करू मात्र एका माणसाचा अपघात झाला आणि तो एक बाप, एक भाऊ, एक पती आणि एक पालक आहे हे तुम्हा - आम्हाला लक्षात घ्यायला हवं.

कोणतंही सरकार 100% विकास किंवा जनतेच्या अपेक्षेला उतरेल का माहीत नाही. सरकारचे समर्थन म्हणून नाही मात्र माणुसकीच्या महाराष्ट्रात नेमकं कोणतं पातक घडलं की एका मुख्यमंत्र्यांच्या अपघातानंतर वाईट साईट बोलत आनंद निर्माण होतोय.

कुणी मरावं इतकं वाईट खरंच नसतं कुणी! मरणाच्या दारातून परतणाऱ्या माणसाला सावरायला बळ देणारी माणसं एकीकडे आणि त्यावर मीठ चोळणारी जमात एकीकडे असताना आम्हाला प्रगती, विकास, समृद्धता आणि अच्छे दिन पहायचे आहेत हे विशेष।

मी किसानपुत्र आहे मात्र माझ्या बापाच्या कर्जमाफीची मी कुणी मरावं म्हणून देव पाण्यात ठेवणार नाही. कारण माझा बाप मरू नये म्हणून कर्जमाफी मागतोय, मध्यंतरी एका भगिणीने केलेले भाषण ऐकले की " मुलीच्या लग्नापर्यंत बाप टिकावा यासाठी कर्जमाफी द्या"।

शिक्षण घेऊन पिढी शहाणी सुरती व्हावी अशी आशा असताना हे गलिच्छ विचार घेऊन जगणाऱ्या माणसांनो कावळ्याच्या शापाला बाधा झालीय आता समृद्धतेची कास धरून शहाणे व्हा।

मरणाला आणि कारनाला दुष्मणसुद्धा जातो ही माझ्या गावातली पद्धत आहे। मग माणुसकीच्या पखाली वाहणाऱ्या आणि जगाला माणुसकीचा संदेश देणाऱ्या या माणुसकीच्या मुलखाला झालंय तरी काय?

न लागो दृष्ट दुर्जनांची
न लाभो असभ्य नीती।
राष्ट्र विकासाच्या वाटेवरी
अखंड मिळो सत्कार्या गती।

© Vikas Waghamare
📱 8379977650
Solapur



४ टिप्पण्या: