शनिवार, २४ जून, २०१७

#माय_बाप_जिंकले!🎊🎊😘
श्रेय घेणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं।

#विस्तृत_माहिती.......💗👇👇

#अभूतपूर्व कर्ज माफी झाली म्हणायला हरकत नाही।
राज्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणजे 34000 कोटींचे कर्ज माफ करणारे सरकार नक्कीच कौतुकास पात्र आहे। कर्जाच्या ओझ्याखाली माय बापाची मान दबली गेली अन आयुष्याचं जु ओढता ओढता मातीला मिळालेल्या 90 % शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार। काँग्रेसनं 8000 कोटींचे कर्ज माफ केले होते तेही केवळ जिल्हा मध्यवर्ती बँका अन वित्तीय संस्थांची मुनीमगिरी करून घरं भरण्यासाठी. देशातील इतर सर्व राज्यापैकी महाराष्ट्रातील कर्ज माफी सर्वात मोठी कर्ज माफी आहे। राजकारणाला हापापलेल्या बावळ्यांनी मुख्यमंत्र्यांवर किती हीन पातळीवर टीका केली मात्र आज त्यांनी खऱ्या अर्थाने अभ्यास पूर्ण करून विरोधकांना गृहपाठ करण्यास पाठवले म्हणायला हरकत नाही।

💗 आज मंजूर झालेल्या कर्जमाफीचा आढावा-💗
      छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून ही ऐतिहासिक कर्जमाफी केलीय। १.५० लाख रुपयांचे कर्ज सरसकट माफ करणे हेच खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी महत्वाचं पाऊल ठरणार आहे। तत्काळ महाराष्ट्रातील अगदी शेवटच्या शेतकऱ्यांचा आढावा घेऊन व अभ्यास करून आज 89 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची ही सरकारने केलेली उत्तुंग कामगिरी आहे। त्यामध्ये मध्यम मुदतीचे कर्जसुद्धा माफ होणार आहे। यामध्ये 40 लाख शेतकऱ्यांना 1.5 रु च्या OTS योजनेचा लाभ मिळणार आहे। नियमित कर्ज भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी 25 हजार अनुदान देणार म्हणजे अच्छे दिन वगैरे म्हणावे लागतील।
      शेतकरी माय बापाच्या आडून मेवा खाण्यासाठी सरसावणाऱ्यांना मात्र चार हात लांब ठेवण्याची योजना आखल्यामुळे "मुळांना थेट पाणी मिळणार" वगैरे म्हणूया।😜😀 त्यामध्ये आयकर भरणारे, आमदार,  खासदार, जि.प. व महानगर पालिका सदस्य, सरकारी कर्मचारी, व्हॅट लागू असलेले व्यापारी यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही।

    घामाचा दाम मिळण्यासाठी आता हमीभाव देण्याच्या दृष्टीने तत्काळ पाऊल उचलावं म्हणजे पडणाऱ्या पाऊसासोबत येणाऱ्या पिकाला अन बापासोबत मातीला दिल गार्डन गार्डन वगैरे वाटायला हवंय। 😍😍💗

© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱8379977650
सोलापूर

गुरुवार, १५ जून, २०१७

मग काय बोलू...😢

साधारण दुपार 2 ची वेळ असेल। मी मेसमध्ये जेवण करत होतो। उच्ची पुरा बांधा, इन शर्ट, बेल्ट अन रुबाबदार पेहराव। मात्र बोलण्याची धाटणी बऱ्यापैकी ग्रामीण कम शहरी । कोल्हापूर परिसरातल्या ग्रामीण भागातले मात्र शहरात अधिकारी होते असं समजलं।

दोन शिवाराचं रांगडं अधिकारी वाटावेत असे मात्र शेतकरी होते। शहरात असल्याने लवकर लक्षात येणं तसं कठीण होतं। मात्र जे काही माझ्या कानावर आलं ते विचित्र वगैरेच्या पलीकडं होतं....

पहिला:- कर्जमाफी करून सरकारनं मला ** लावला.

दुसरा:- का? अहो ग्रामीण भागात आहे तशी परिस्थिती, हं, कोल्हापूर वगैरे ठिकाय। पण मराठवाडा, विदर्भ ..? .(प्रश्नार्थक नजरेनं संवाद थांबवला)

पहिला:- भाई, लोकांचा विचार करूनच झालं हे। माझंपण "चार लाख पंचेचाळीस हजार" कर्ज होतं.!

दुसरा :- हं, होईल ना माफ मग...

पहिला :- कसलं माफ । मार्च एंडला बँकेकडून फोनवर फोन यायले, म्हणून शिल्लक होते त्याचं सर्व कर्ज भरलं। अन आता सरकारला सुचलं.. मीच ** घातली नसती तर बरं झालं असतं. 😡

दुसरा :- .......

पहिला :- आता पुढच्या आठवड्यात गावाकडं गेलो की बँकेत जाऊन बघतो आता... काय होतंय.

हरामखोर साले, करायचं तर पहिल्यांदाच करायचं न आता मला काय मिळणार आहेत का परत पैसे..?

                _____________________


शुश्शश्श....😢😢😢
आता काय बोलू?

ते ना माझ्या ओळखीचे होते ना गाववाले।
बाप झिजतो न मातीत,
उगाळत राहतो पानापानात,
प्रामाणिकतेची लागण करत तण उपटून टाकत असतो।
वावरभर सैरभैर फिरून झालं की कोणत्या ठिकाणी
कुण्या जातीचं पीक येतं हेसुद्धा भविष्य खरं ठरवतो।
पावसापाण्याची आबाद करण्यासाठी
म्हसोबा, मरीआई, लक्ष्मीआई अन वड्यातल्या ताईबाईला
अनवाणी हेलपाटे घालून उबवत राहतो शेत। तुमच्या माझ्यासाठी पीक।

ऑफिसात बसून शेती करणाऱ्या शतकरी कम साहेबा, कर्ज आनंदासाठी नाही केलं माफ, कुणाचा होतकरू बाप
कुण्या नाला बल्डिंगिवर ताटकळत उभ्या असलेल्या बोरी, बाभळीच्या फांदीला गळ्यात घेऊ नये म्हणून केलंय...!

एकदा पिकलं तर सोन्यावणी शिवार दिसलं न तर पांग फेडलं सरकारनं म्हणंल।

शहर सिटीच्या जातिवंत साहेबांनो, तुम्ही एसीच्या हवेलीतील शेतकरी आहात न। पण धग अजून तुमच्या चंदेरी खुर्चीला नाही पोहचली। एकदा पोहचेल न तेव्हा बघा।😢😢😢

© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱 8379977650
सोलापूर

मंगळवार, १३ जून, २०१७

अभिनंदनीय असं काही...

एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी संपाने समस्त वातावरण चलबिचल झालं असलं तरीही शेतकरी, कष्टकरी अन अंत्योदय घटकाला सन्मान आणि समृद्धता प्राप्त करून देण्यासाठी सत्तेवर आलो आहोत अशी गर्जना करणाऱ्या भारतीय जनता पार्टी आता अडीच - तीन वर्षांचा उंबरठा ओलांडू पाहत आहे.

"शासन-प्रशासन-समाज" ही त्रिसूत्री जर समांतर चालली तर महाराष्ट्राला पुनरवैभव प्राप्त करून देऊ हे भाजपाने पाहिलेलं स्वप्न निश्चितपणे बऱ्याच प्रमाणात आज सार्थ ठरवताना दिसत आहे। मागेल त्याला शेततळे योजना गेल्या अडीच-तीन वर्षांपूर्वी असल्याची किंवा कुण्या सामान्याला त्याचा लाभ मिळाल्याचे माझ्या ऐकण्यात वा पाहण्यात नाही। आज मात्र तमाम शेतकऱ्यांना गरज असेल तर लाभ देणारच असल्याचे सांगितले जातेय आणि होतंय।

महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना सावरण्यासाठी किती वेळ लागेल हे सरकारही नक्कीच सांगू शकणार नाहीत एवढं भोग आजही त्या बँकांच्या माथी आहेत। गावागावातील विविध विकास सोसायट्यांना उजेडात आणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांची झाडाझडती घेतली। आता ज्याच्या नावावर सातबारा त्यांना मतदानाचा अधिकारसुद्धा दिला गेला। तुमच्या माझ्या अवती भोवती नक्कीच चांगलं काहीतरी घडतंय।

शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य, रोजगार आदी अनेक विभागात नक्कीच "न भूतो..." असं कार्य सुरुय...।

व्यवस्था परिवर्तन करत असताना नक्कीच वेळ लागतो हे माहितेय आणि ते परिवर्तन घाईत होऊ नये याचीही काळजी घेतली जावी हेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे।

गेली दहा-बारा दिवस शेतकरी माय बापाच्या शोषणाविरुध्द राज्यभरात एल्गार झाला त्यामध्ये नाही म्हणायला राजकारण सुद्धा झाले। मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कर्जमुक्तीच्या लढ्याला सरकारने तत्काळ संवेदनशीलता दाखवून हिताचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला। आता पावसाचा हंगाम सुरू झालाय। गावशिवारात आता पेरणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल मात्र सरकारने हाती मिळालेल्या अडीच-तीन वर्षात या माझ्या महाराष्ट्राला किंवा सर्वात पुढे वगैरे म्हणणाऱ्या त्यांच्या महाराष्ट्राला काय दिलं आणि आम्ही काय घेतलं हेसुद्धा अत्यंत महत्वाचं आहे।

पहिल्या पावसात राज्यातल्या अनेक ठिकाणी शिवारा शिवारात भरून वाहणारे ओढे अन आनंदानं धो धो बरसणारे गप्पांचे घोळके नक्कीच पाहायला मिळताहेत। शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आणायचे असतील तर व्यवस्थेच्या विरोधात मात्र गलबला न करता काही करण्याचं पहिलं पाऊल टाकता यायला हवं। गावशिवार आनंदाने वाहत असताना सोईस्करपणे सरकारला विसरून चालणार नाही। जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची उत्कट भावना तुमच्या माझ्यात निर्माण झाली पाहिजे। साठ वर्षात ज्या शिवारात देवाच्या कृपेने पडणारे पाणीही वाहू शकत नव्हते त्याच शिवारात तेच पाणी बांधाबांधांमध्ये जिरवले जातेय आणि ओढा रुंदीकरण, खोलीकरण करून गावाला अत्यंत सुबक असा चेहरा देण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे।यालाच खऱ्या अर्थाने जलयुक्त शिवार असं म्हणायचं।

केवळ अंध विरोध करण्यानं भलं कुणाचंच होत नाही डोळ्यांना दिसणाऱ्या आणि मनापासून कार्य करणाऱ्या व्यवस्थेला कधी कधी या हृदयीची त्या हृदयी मनापासून धन्यवाद द्यायला हवा।

@ सोबत अनगर ता. मोहोळ येथील ओढा रुंदीकरण व खोलीकरणामुळे पहिल्या पावसात वाहणारा ओढा। जलयुक्त शिवार यालाच म्हणतात। हे पुनरवैभव नव्हे तर काय म्हणाल.....

अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने श्री. देशमुख यांनी घेतलेले चित्र...

✍ विकास विठोबा वाघमारे
📱 8379977650
सोलापूर




शनिवार, १० जून, २०१७

तू भरून आल्यावर...😍😍

#भरून_आल्यावर_तू😍😍😘
खंडेराव परक्या गावात असतात। अंतर्मनाला गावच्या मातीची अन पावसापाण्याची ओढ लागलेली असते।मनात प्रचंड तगमग ....
मग बंधूना दूरध्वनी संभाषण करून ख्याली खुशाली व पडताळणी अन मग पाऊसपाण्याच्या पाणीदार गप्पा झाल्यावर थेट छायाचित्रांचा हट्ट करून हे भरून आलेलं अख्खं आभाळ दूरच्या शहरात हाती मिळतं।

भरून आल्यावर तू
काळजा तृप्ती मिळते।
घेता मिठीत भूमीला
बघ माती गंधाळते।

© Vikas Waghamare
 📱8379977650
सोलापूर



बुधवार, ७ जून, २०१७

तू गेलीस तेव्हा...

केसातला चाफा
किणकिण कंगणचाळा
परसातल्या मोगरपाकळ्या
काळजातली तार
आठवणींचं मोरपीस..

हे एकाकी हाती राहीलं....

तू गेलीस तेव्हा...
दरदरून मोत्या मोत्याच्या
हिशोबानं खळखळ
झुळझुळ अन रेशीम थेंबानं
माझं अंगण भरून वाहिलं...

तू गेलीस आणि मग
तुझ्या माझ्या आणि....
यातनांनी बाजार मांडला...
बेमालूमपणे हरेक याद
उसळून आली
मोरपीस अन गिफ्टेड
सग्गळं सग्गळं
जाब विचारू लागले
एका मोत्यांच्या चांदणीनं
पहिल्या वहिल्या
पावसाला अंगावर पांघरत
"एकटं" जाणं..
अन तू एकाकी पाहणं
शोभतं का..?💞💗💞

© विकास विठोबा वाघमारे
📱 8379977650

मंगळवार, ६ जून, २०१७

संप संपला आता राजकारण सुरू...

भावांनो, गेल्या 1 जूनपासून आपण सर्वजण बापाच्या यातना सरकारकडे मांडण्यासाठी एल्गार करत होतो। शेतकऱ्यांच्या घरापर्यंत अच्छे दिन आले पाहिजेत यासाठी समस्त बांधव एक होऊन लढलो।
खरंतर शेतकरी संप हा केवळ मोदींच्या किंवा फडणवीस, भाजपाच्या सत्तेमुळे आला नाही हे वारंवार सांगितलं मात्र गेल्या 60 वर्षात दरोडेखोरांनी तुमच्या माझ्या बापाला लुटलं हे वास्तवसुद्धा आपल्या समोर मांडलं।

महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोनं उगवण्याची ताकद आणि मनामध्ये इच्छाशक्ती आहे त्याला सरकारने खऱ्या अर्थाने कर्जमुक्ती, हमीभाव द्यावव व आदी मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आक्रोशाला संवेदनशीलता दाखवून शेतकरी माय बापाच्या या मागण्या संवेदनशील सरकारने मान्य केल्या।

भावांनो, 60 वर्षात आजपर्यंत केवळ स्वार्थाचे राजकारण करणाऱ्या भ्रष्टवादी दरोडेखोरांना आता मोठी चपराक बसली आहे। महाराष्ट्राचा शेतकरी कुण्या पक्षाच्या, कुण्या झेंड्याचा आणि कुण्या नेत्याच्या पाठीमागे या संपात सहभागी झाला नव्हता। शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात आपला पाठिंबा या संपासाठी केवळ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाला दिला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागण्याच्या अंमलबजावणीसाठी काही अवधी मागितला आणि असलेल्या मागण्या येत्या 4 महिन्यात पूर्ण करण्याचे वचन दिले।

भावांनो, हमीभाव नक्की देणार हेसुद्धा सांगितलं। आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी सरकारचा हितचिंतक असूनसुद्धा बापाने सहन केलेल्या 60 वर्षाच्या शोषणाविरुद्ध या एल्गारामध्ये सामील झालो होतो। केवळ एकाच गोष्टींमुळे की, माय बाप सरकार बापाला आजपर्यंत सहन कराव्या लागलेल्या अडगळीतून आता मुक्त करा।

1 ते 4 जूनपर्यंत महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शेतकरी लढला । त्यातही काही प्रमाणात राजकीय कुरघोड्या करण्याचा प्रयत्न झाला। मात्र या नंतरच्या काळात या संपातून शेतकरी बाजूला झाला। आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आपल्या माय बापाच्या नावानं राजकारण करण्यासाठी आणि राजकीय दुकान डागडुजीसाठी तथाकथित नेत्यांनी शेतकऱ्यांच्या आडून राजकारणाला सुरुवात केली।
भावांनो, आपला शेतकरी संप गेल्या 4 तारखेलाच संपलाय। सरकारने आता किसान क्रांती आणण्यासाठी पाऊल टाकलं आहे। संत सावता माळी आठवडी बाजारांची संख्या महाराष्ट्रात वाढवून थेट शेतकऱ्यांना फायदा होईल, मागेल त्याला शेततळी योजना असेल, हमीभाव निश्चित केल्यानंतर त्याची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी सरकार सक्षम आहे ।

नुकताच संपाला पुढची दिशा देण्याच्या नावाखाली सुकाणू समिती स्थापन केली त्यात कोण तर राजकीय नेत्यांनी चलती। भावांनो जर राजकारण विरहित संप आपण पुकारला होता तर आता या नेत्यांनी त्यात सहभागी होऊन आणि पाठिंबा देऊन याची राजकीय धुळवड खेळण्याची संधी साधली आहे।

व्यवस्था परिवर्तन करत असताना सरकारलाही वेळ दिली पाहिजे आणि आंदोलन सुरू झाल्यानंतर संपले पाहिजे। येणाऱ्या काळात सरकारकडून अपेक्षा करूया की दिलेल्या शब्दानुसार तुमच्या माझ्या बापाची कृषी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही।भावांनो आता सर्वांनी आपापल्या गावामध्ये व्यवहार सुरळीत करा। पावसाचे दिवस सुरू झाले आहेत मन लावून शेती करा। सोन्यासारखी दौलत शेतीमध्ये येईल। बंधूंनो, संपाच्या नावाखाली इथून पुढे राजकीय बळी जाऊ नये ही अपेक्षा।


( मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे या लेखानंतर माझा संपामधील सहभाग संपला आहे।)

© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
सोलापूर


सोमवार, ५ जून, २०१७

#नमन_श्री_गुरुजी
साल 2012- 13 चं होतं। अभाविपच्या कार्यालयात मी नुकताच निवासाला आलो। नाथ प्लाझा हे निवासी कार्यालयाचे नाव. आतमध्ये भिंतीला एका बाजूला सिद्धरामेश्वरांचा भला मोठा बॅनर होता आणि दुसऱ्या बाजूला श्री. गुरुजी यज्ञाकुंडात हवन करत असलेलं एक पेंटिंग चिटकवलेलं।
त्या दरम्यान गुरुजी किंवा संघ परिवार जास्त सखोल माहीत नव्हता। मात्र हळूहळू सर्व समजत गेलं।

त्या भिंतीवर असलेलं गुरुजींचं पेंटिंग हे एक वेगळं रसायन वाटायचं। अनेकदा एकटक त्या पेंटींगला पाहून डोळे दिपून जायचे। हिंदुत्व आणि समरसता हे सगळं दरम्यानच्या काळात जमेल तेवढं अभ्यासायला मिळालं।
गुरुजींच्या प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टी जेष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितल्या। मात्र त्या पेंटिंगला पाहून आणि काही गोष्टी समजून घेऊन जी ऊर्जा मिळाली आणि मिळतीय ती पुढच्या संघर्षाला प्रेरणा देणारी ठरतीय।

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक श्री. गुरुजींचा आज स्मृतिदिन। शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा आणि त्याग करणाऱ्या गुरुजींना माझा प्रमाण।

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

रविवार, ४ जून, २०१७

नोटांची भाजी नसते होत....

बा तुझा घाम आता
पार आटून गेलाय।
करण्यास बंड तुला
फार उशीर झालाय।

जगण्याची धडपड सुरू
जिंदगीचा झालाय वांदा।
मिरची, गवार वावरी गेली
भावासाठी आतुर कांदा।

बांधापासून सरकारपर्यंत
जागोजागी होतीय झीज।
पैशाचं नसतं होत धान्य
कळेल तेव्हा तुझं चीज।

चार दोन दिवसात त्यांची
बघ कशी झोप उडाली।
गल्लीपासून महालार्यंत
आबळ जेव्हा झाली।

रुपयांची भाकर नाही
नोटांची भाजी नसते होत।
कळेल तेव्हा पडेल पाया
अदानी, अंबानी अन सदा खोत।

© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱837997650
सोलापूर

शेतकरीपुत्र असाल तर नक्की पुढे पाठवा।


शनिवार, ३ जून, २०१७

परिस्थिती संपाची

भावांनो तुमच्या माझ्या बापाच्या सन्मानासाठी लढत असताना सरकारला अजून जाग येत नाही। दहा हजार वेळा सांगतो की, हे पाप राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दरोडेखोरांनीच केलंय। चार दोन वर्षांपूर्वीचा झालेला सत्ताबदल हा तत्कालीन सरकार विरोधी प्रचंड आक्रोश असल्यानेच झाला हेही खरंय।

बापाच्या मालाला बाजारात कवडीची किंमत न देणाऱ्यांना पायउतार व्हावं लागलं। अब्जावधींची माया जमवणाऱ्यांना हाकलून देण्याचं धैर्य घर घर मोदी म्हणत याच शेतकरी बंधूंनी केलं। सरकारला कशाची घाई झाली की एका रात्रीमध्ये त्यांना हे निपडून काढण्याची धडपड करावी लागली।

हापापलेल्या तथाकथित पुढाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांची गोची करण्याचा प्रयत्न का करावासा वाटला?

मावळच्या आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तेव्हा ज्या यातना सदाभाऊ काळजातून येत होत्या त्या आता एक शेतकरी मारला तरी सत्तेत असून होत नाही, याचं नवल वाटतंय। ज्यांनी शेतकऱ्याला मारलं त्याच्या तोंडाला रगत लागलं। आणि ज्याच्या तोंडाला रगत लागलं त्याची जीभ आम्ही ओढून बाहेर काढू म्हणून महाराष्ट्रात थयथयाट करणारा नेता आज एका सत्तेसाठी गिळला गेलाय।

आर आर आबा बारामतीच्या फडावर मावशी म्हणून शोभताव म्हणणाऱ्या सदभाऊंना आपल्याला कधी कुण्या फडाची मावशी व्हावं लागलं याची कल्पनाही नसेल।

शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडून तीव्रता कमी करण्यासाठी ज्या पद्धतीनं आखणी झाली त्या सर्व प्रवाहात शेतकरी नेते म्हणवणारे फितूर झाल्याचे जगजाहीर दिसते आहे।

महाराष्ट्राला कृषिमंत्री आहे का? असा सवाल जनता विचारत असताना मात्र या सर्व घटनेनंतरही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना अंधारात ठेवलं जातंय आणि सदाभाऊंचं कार्ड चालवून एल्गार बोथट करण्याचा डाव आहे।

संप महाराष्ट्राचा सुरू असताना अचानक बोटावर मोजण्या इतक्या दलालांशी चर्चा करण्याचे केलेले प्रयत्न आजच्या शेतकऱ्यांच्या धगधगीला कारणीभूत ठरताहेत।

शहराला आता खरी झळ बसायला सुरुवात झाली आहे। बाजारात भाजीपाला, फळे व दुध मंदीची लाट जाणवतीय। काळ्या मातीची अन बापाची होरपळ सरकारला कळेपर्यंत महाराष्ट्राला भारी किंमत मोजावी लागू नये म्हणजे मिळवलं।
© विकास वाघमारे
किसानपुत्र
📱837997650
सोलापूर

संप चिघळला जातोय सरकार

सकाळी पाचला उठून बातम्यांवर नजर टाकली तर दरोडेखोरांवर शिरसंधान करणारे माझे सरकार एका रात्रीत शेतकऱ्यांना बांधून ठेऊ पाहत होतं।

अरे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही भेटून बोलू शकत नाही त्यांना न्याय देणार का हा सवाल आ वासून उभाय। दलालांना सोबत घेण्यास नकार दिल्यावर झोप उडते आणि मग कोण जयाजी सूर्यवंशी नावाचा तथाकथित नेता तुमच्या कामी येतो। हे दुर्दैव आहे माझ्या बांधवांचं। गडबड घाईत मिटणारा हा संप नाही। हा एल्गार पिढ्यानपिढ्या सोसलेल्या यातनांचा आहे।
या आंदोलनाला नेता नाही चळवळीचा प्रत्येक शेतकरी बाप आज आमच्यासाठी नेता आहे। एका रात्रीत जे काही झालं न त्याने सरकार जनतेचा विश्वास उडतोय।

जेवढं खाली दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढि या एल्गाराची आग धगधगेल....

भावांनो, संप सुरूच आहे। आपल्याला फसवणाऱ्या शेतकरी नेत्यांना आता न जुमानता लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवा। स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी क्रांती आपल्याला घडवायची आहे।
© विकास वाघमारे
किसानपुत्र
📱8379977650


#शेतकरी_संप #किसानपुत्र_आंदोलन

शुक्रवार, २ जून, २०१७

सरकारला किसानपुत्राचे खरमरीत पत्र..

अय सरकार तुम्हाला हात जोडून सांगतो। बापानं संप पुकारला आहे। तो गेल्या 60 वर्षाची गुलमगिरी आणि शोषण थांबवून सन्मान मिळविण्यासाठी।

कोणी जेष्ठ समाजसेवक आणून आम्हाला नेता जन्माला घालायचा नाहीये। आम्हाला आमच्या घामाची किंमत चुकती करण्यासाठी तुम्हाला लक्षात आणून द्यावं लागतं आहे।

मी मोदी द्वेषी, फडणवीस द्वेषी किंवा भाजपा द्वेषी नाही सरकार मात्र मी शेतकरीप्रेमी नक्की आहे। बापाला येडझवा म्हणणाऱ्या खोगिरांच्या विरोधात एल्गार करण्यासाठी चळवळ करतोय। या बांधाच्या त्या बांधाला रातभर विजेच्या एका झलकीसाठी पळणाऱ्या बापाला मला न्याय मिळवून घ्यायचाय।
काँग्रेस राष्ट्रवादीचे षडयंत्र हे माल उधळपट्टी करण्यात असेल। रस्त्यावर बळीराजाला आणण्यात असेल मात्र संप तर जनसामान्यांनी एकत्र येऊन बांधलेली वज्रमुठ आहे हे लक्षात घ्या।

काही दिवसांपूर्वी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली तूर हातात घेऊन भिकाऱ्यासारखा बाप तुमच्या दारात उभा होता आणि तेव्हाच साल्याची पैदास झाली न तिथंच पाणी मुरलं। आणि त्याचवेळी ती मूठ घट्ट आवळली गेलीय।

एकदा शेतकरी बंधूंच्या काळजाला कान लावून बघा सरकार धरणीचा आक्रोश काळजात ऐकू येईल। पोरींच्या लग्नासाठी रानात उगवलेल्या सोन्याच्या जीवावर काढलेलं कर्ज त्याला कासऱ्याची आठवण करून देतं। लाखो कोटींची पॅकेज जर "मेक इन इंडियासाठी देत असाल तर काही कोटींची कृपा मेक इन अनाजसाठीसुद्धा करा। तेव्हा खऱ्या अर्थाने कृषिप्रधान देशात कृषिक्रांतीची मशाल तेवेल.

सरकार शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन हा एल्गार दडपण्याचं पाप नका करू। तरीही या यज्ञात आता एका बांधवांचा खून झालेलाच आहे। फुकट मागणाऱ्यातले आम्ही नाही सरकार, घामाची किंमत आणि जगण्याची हिंमत द्या एवढीच माफक अपेक्षा घेऊन रस्त्यावर आलोय।

जर थेट बोलायचं असेल तर या, बांधवांच्या गळ्यात गळा घालून बोला, शेतकऱ्यांच्या बांधावर या । कुण्या दलालाला किंवा मध्यस्थाला घेऊन भावनांचा बाजार नका मांडू। व्यवस्था परिवर्तन हे ध्येय घेऊन आलो आहोत।

आजपर्यंत शेतकरी नेता म्हणून मिरवत तत्कालीन शासनाशी हिजडवाद करणाऱ्या सदभाऊंना पाहून डोळ्यावर विश्वास बसेनासा झालाय। सदाभाऊनं किती लवकर कात टाकली😢😢!

हात जोडून सांगतो एकवेळ भरभरून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करा आणि सकारात्मक ठोस निर्णय घ्या ।

या संपातसुद्धा राजकारणासाठी दडपडणाऱ्या भ्रष्टवादी दरोडेखोरांनो हा भोळा बाप पुन्हा फसणार नाही। आम्ही सामान्यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या मार्गाने लढू मात्र तो आवाज सरकार तुमच्यापर्यंत पोहचत नसेल तर आवाज पोहचवण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची ताकद काळ्या आईनं दिलीय। हे अश्रू भरलं पत्र स्वीकारा सरकार, अजून काय लिहू.... ? 😢😢😢😢

*बंधूंनो, नक्की हे पत्र प्रत्येक किसानपुत्राने पुढे पाठवले पाहिजे ही विनंती*🙏🏻

✍ विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱8379977650
सोलापूर


गुरुवार, १ जून, २०१७

हे वास्तव शेतकरी संपाचं...!

गेली साठ वर्षे तुमचा आमचा बाप रोज थोडं थोडं मारतोय। आता संपाचं हत्यार उपसलं तेव्हा राजकीय दुकान डागडुजी करण्यासाठी हरामखोर तथाकथित नेते रस्त्यावर शेतकऱ्यांचा कळवळा घेऊ पाहताहेत.

भावांनो, हा एल्गार केवळ मोदींच्या आणि फडणवीस किंवा भाजपाच्या विरोधात नाहीय.

गेली साठ वर्षे ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने माझ्या शेतकरी बांधवांना मातीमोल केलं त्याचं पाप आहे.गावागावातील विविध विकास सोसायट्या आघाडीच्या हातात होत्या। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गावपातळीपासून राज्यपातळी पर्यंत सर्व व्यवस्था ज्यांच्या हातात होती त्यांनी बळीराजाचे शोषण केलं।

पंचायत समित्यात शेततळी योजना आली की ती आपल्या कार्यकर्त्यांना नाहीतर मग आपल्याच घशात घालायची। नवीन बी बियाणं, युरिया आला की आपल्याच मालकीचा करायचा। गावातील विकास सोसायट्यावर सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व मिळवलं आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं।

तू कुणाचा कार्यकर्ता आहे हे बघून सोसायटीचे कर्ज आणि लाभ देण्याची लाजिरवाणी पद्धत आघाडीने रुजवली. समस्थ कारखानदारी आणि साखरसाम्राट हाताशी धरून जागोजाग शेतकऱ्यांना दुर्लक्षित केलं।

आज शेतकरी संपावर गेला हा रोष त्याच सरकारचा आहे ज्यांनी 60 वर्षे सत्ता उपभोगली पण शेतकऱ्यांना एकही सुखाचा घास घेऊ दिला नाही।
आता शेतकरी कर्जमाफी मागतोय त्यावर अनेकजण म्हणतात शरद पवारांनी कर्जमाफी दिली। सोबत बंधूंनो हेही सांगा किती जिल्हा मध्यवर्ती बँका त्यानंतर सावरल्या?  किती शेतकऱ्यांचे कर्ज फिटले? किती शेतकरी समृद्ध झाले? किती जणांना आत्महत्येपासून मुक्ती मिळाली? समोर घोषणा एक करायची आणि मागच्या दारांनी घरं भरून घ्यायची हे 60 वर्षात केलं गेलं।

आजपर्यंत टोमॅटोला भाव नाही म्हणून रानात सडून गेली। कांद्याला भाव नाही म्हणून कांद्याची माती झाली। मिरच्यांची उभी शेती मातीमोल झाली। भेंडी, गवार जनावरांना घालावी लागली। यावेळी बापानं शब्दही उच्चारला नाही म्हणून सरकारही गप्प आणि शोषण सुरूच होतं। आत्ता भाजीपाला, फळे, दूध वाटोळं होतंय म्हणणाऱ्यांनो शेतात 60 वर्षे बाप असा झिजला, मार्केटमध्ये असाच माल टाकून आला, रातरात डोळा लागला नाही। आत्ता तोच माल रस्त्यावर टाकला कारण सरकारला जाग यावी म्हणून।

रात्री झोपताना दरवाजा व्यवस्थित बंद करून पैशाची रास लावणाऱ्यांनो एकदा कशाचाही विचार न करता पैशे काळ्या मातीत पुरण्याचं धाडस करा। हाताशी आलेलं पीक पोटच्या वयात आलेल्या पोरींसारखं सांभाळावं लागतं आणि त्यानंतरही हमीभाव मिळत नाही। एकदा विचार करून बघा।

भारतीय जनता पार्टीला गोत्यात आणण्यासाठी हे कारस्थान आहे अशी नवीन टिमकी सुरू झाली। माझ्या मते भाजपा सरकारने जे 3 वर्षात केले ते 60 वर्षात काँग्रेसने नक्कीच केले नाही मात्र विरोधी पक्षात असताना भाजपा ज्या तोऱ्यात बोलत होती त्या पद्धतीने काम दिसत नाही। शेतकऱ्यांना हवा असलेला मदतीचा हात मिळत नाही, सदाभाऊ त्यासाठी हिजडवाद करत होते त्यात आता ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत। आता काँग्रेस- राष्ट्रवादीचे सहकार आणि सर्वच बुरुज खिळखिळी झाले तेव्हा अच्छे दिन येण्याची वाट शेतकरी पाहताहेत। दिल्लीपासून गल्लीपर्यंत थेट योजना मिळाली पाहिजे हा एक ध्यास आहे।

आज रस्त्यावर न येता शेतकरी अहिंसा मार्गाने संप करताहेत मात्र त्यांच्या आडून राजकीय पोळी भाजली जातीय का हाही सवाल समोर आहे। जर असं काही घडत असेल तर हे भयानक आहे।

बांधवांनो, जनतेने उभारलेला आणि प्रचंड जनमत पाठीशी असणारा हा लढा आहे दरोडेखोरांना याचा फायदा घेऊ देऊ नका। नाही तर मग पुन्हा "सौ चुहे खा कर बिल्ली चली हज" अशी स्थिती व्हायची। आणि जनमत ढळणार नाही अशा पद्धतीने आपला लढा सुरू ठेवा. सरकार नक्कीच आपल्याला योग्य तो न्याय देईल अशी अपेक्षा आहे।

✍ *विकास विठोबा वाघमारे*
      किसानपुत्र
📱8379977650
सोलापूर


शेतकरी संप

शेतकरी संपामध्ये बंधूंनो मी सहभागी झालो. बांधवांनो कोणत्याही हिंसेच्या मार्गाचा अवलंब करू नका ही विनंती करतोय।
केवळ सत्ताधारी सरकारच्या रोषापायी पुढे आलेला हा संप नक्कीच नाहीय। गेल्या साठ वर्षांमध्ये बळीराजाला बळी जाण्यासाठी आणि देशोधडीला लावणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध फुंकलेलं हे रणशिंग आहे.

मी 12 - 13 वर्षाचा होतो तेव्हा करड्याची भाजी घेऊन बाजारात बापासोबत गेलो। तेव्हा दिवसभर उन्हात बसून एक पोतं भाजी विकली आणि हातात 80 रुपये आले। मालाला भाव चांगला लागला की वाईट मला तेव्हा काहीच कळलं नाही। त्यांनतर सातत्याने अनेकवेळा बाजारात जाणं झालं ही विदारक वास्तव मला जाणवत होतं। मात्र जेव्हा या सर्व व्यवस्थेच्या विरोधात होणारी चर्चा ऐकली तेव्हा पडताळणी केली की बळीराजाला कंगाल करणारी ही लोकशाही मार्गाने निवडून आलेली फळी आहे.

मध्यंतरी तेव्हाचे चळवळीतले नेते व आजचे कृषिराज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोतांची भाषणं ऐकली। तेव्हा आतून पेटून उठलो मात्र तोवर सरकार बदल झाला. आशेचा किरण समोर दिसला. हा संप भाजपाच्या विरोधात किती टक्के आहे मला माहिती नाही मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने जगण्यासाठी निर्णय घ्या हा विचार घेऊन व्यवस्थेच्या विरोधात केलेला एल्गार नक्कीच आहे.

सदाभाऊ कृषीराज्यमंत्री झाल्यानंतरही अनेकदा आंदोलने झाली तेव्हा खा। राजू शेट्टींनी शेतकऱ्यांचा कांदा व डाळ मंत्रालयासमोर टाकली. मात्र मला विरोधाभास कळत नाही की ज्यासाठी तुम्ही आयुष्यभर लढत आलात आणि जे मुद्दे घेऊन लढत आलात तेच खाते आपल्या हातात असून निर्णय घेऊ शकत नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून आंदोलने केली आणि अजून करताय मग हातात असलेल्या पदाचा काय उपयोग? माझ्या शेतकऱ्यांना वेड्यात काढून सत्तेवर बसणाऱ्या सदभाऊंना आगामी काळात याचा हिशोब द्यावा लागेल।

जे जगलं आणि भोगलं ते मांडण्याची लाज मला वाटत नाही. आजपर्यंत 2 रुपये किलो दराने टोमॅटो विकली आणि निव्वळ काही रुपयांमध्ये पोती विकली म्हणजे अक्षरशः लुटलं तेव्हा बापानं रानात टाकून दिलेले कांदे, टोमॅटो आणि जनावराला घातलेली भेंडी, गवार आज रस्त्यावर टाकली हाच फरक आहे.

भाजपा सरकार शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा देईल मात्र कधी कधी आईसुद्धा बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नसते। बाळ रडताना त्याला मारून गप्प बसवण्याचं वा दुर्लक्ष करण्याचं पाप कृपाकरून करू नका।

बाप मेल्यानंतरच दुःख आणि समोर दिसणारा जिंदगीचा डोंगर आपल्याला कळणार नाही त्यासाठी अनाथ किसानपुत्राला भेटावं लागेल। स्वातंत्र्यानंतर हा सर्वात मोठा लढा ठरावा आणि एकदा बापाच्या पिकाला हमीभाव द्या आणि मागण्या मान्य करा।

कर्जमाफी केल्याने प्रश्न नक्कीच सुटणार नाही मात्र दिलासा मिळेल। शेतात घामाच्या धारांनी पिकवलेला माल सरकार एकदा शेतकऱ्याच्या मनासारखा खरेदी करा। शेतकऱ्यांचं राज्य येऊ द्या एवढीच माफक अपेक्षा हा संप करतो आहे.

या संपाचे राजकारण नक्की होणार नाही। शेतकऱ्यांच्या आडून विरोधकांना राजकारणाचे डोहाळे लागले तर बुडत्याचा पाय खोलात पडेल. हा उद्रेक तुमच्या नाकर्तेपणामुळे घडलाय ।

बांधवांनो संप सुरूच राहुद्या मात्र त्याला हिंसक वळण नको।
फळे, भाजीपाला, दूध रस्त्यावर टाकण्यापेक्षा आपल्या शेतकरी बांधवांना देवाण घेवाण करा।
एका मराठी सिनेमातील एक संवाद आठवला, "सरकार मरण्याचे लाख रुपये देण्यापेक्षा जगण्याचे 10- 15 हजार देत चला।"😢😢😢😢😢😢

© Vikas Waghamare
    किसानपुत्र
📱 8379977650
सोलापूर