शनिवार, ३ जून, २०१७

परिस्थिती संपाची

भावांनो तुमच्या माझ्या बापाच्या सन्मानासाठी लढत असताना सरकारला अजून जाग येत नाही। दहा हजार वेळा सांगतो की, हे पाप राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दरोडेखोरांनीच केलंय। चार दोन वर्षांपूर्वीचा झालेला सत्ताबदल हा तत्कालीन सरकार विरोधी प्रचंड आक्रोश असल्यानेच झाला हेही खरंय।

बापाच्या मालाला बाजारात कवडीची किंमत न देणाऱ्यांना पायउतार व्हावं लागलं। अब्जावधींची माया जमवणाऱ्यांना हाकलून देण्याचं धैर्य घर घर मोदी म्हणत याच शेतकरी बंधूंनी केलं। सरकारला कशाची घाई झाली की एका रात्रीमध्ये त्यांना हे निपडून काढण्याची धडपड करावी लागली।

हापापलेल्या तथाकथित पुढाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांची गोची करण्याचा प्रयत्न का करावासा वाटला?

मावळच्या आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तेव्हा ज्या यातना सदाभाऊ काळजातून येत होत्या त्या आता एक शेतकरी मारला तरी सत्तेत असून होत नाही, याचं नवल वाटतंय। ज्यांनी शेतकऱ्याला मारलं त्याच्या तोंडाला रगत लागलं। आणि ज्याच्या तोंडाला रगत लागलं त्याची जीभ आम्ही ओढून बाहेर काढू म्हणून महाराष्ट्रात थयथयाट करणारा नेता आज एका सत्तेसाठी गिळला गेलाय।

आर आर आबा बारामतीच्या फडावर मावशी म्हणून शोभताव म्हणणाऱ्या सदभाऊंना आपल्याला कधी कुण्या फडाची मावशी व्हावं लागलं याची कल्पनाही नसेल।

शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडून तीव्रता कमी करण्यासाठी ज्या पद्धतीनं आखणी झाली त्या सर्व प्रवाहात शेतकरी नेते म्हणवणारे फितूर झाल्याचे जगजाहीर दिसते आहे।

महाराष्ट्राला कृषिमंत्री आहे का? असा सवाल जनता विचारत असताना मात्र या सर्व घटनेनंतरही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना अंधारात ठेवलं जातंय आणि सदाभाऊंचं कार्ड चालवून एल्गार बोथट करण्याचा डाव आहे।

संप महाराष्ट्राचा सुरू असताना अचानक बोटावर मोजण्या इतक्या दलालांशी चर्चा करण्याचे केलेले प्रयत्न आजच्या शेतकऱ्यांच्या धगधगीला कारणीभूत ठरताहेत।

शहराला आता खरी झळ बसायला सुरुवात झाली आहे। बाजारात भाजीपाला, फळे व दुध मंदीची लाट जाणवतीय। काळ्या मातीची अन बापाची होरपळ सरकारला कळेपर्यंत महाराष्ट्राला भारी किंमत मोजावी लागू नये म्हणजे मिळवलं।
© विकास वाघमारे
किसानपुत्र
📱837997650
सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा