मंगळवार, ६ जून, २०१७

संप संपला आता राजकारण सुरू...

भावांनो, गेल्या 1 जूनपासून आपण सर्वजण बापाच्या यातना सरकारकडे मांडण्यासाठी एल्गार करत होतो। शेतकऱ्यांच्या घरापर्यंत अच्छे दिन आले पाहिजेत यासाठी समस्त बांधव एक होऊन लढलो।
खरंतर शेतकरी संप हा केवळ मोदींच्या किंवा फडणवीस, भाजपाच्या सत्तेमुळे आला नाही हे वारंवार सांगितलं मात्र गेल्या 60 वर्षात दरोडेखोरांनी तुमच्या माझ्या बापाला लुटलं हे वास्तवसुद्धा आपल्या समोर मांडलं।

महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोनं उगवण्याची ताकद आणि मनामध्ये इच्छाशक्ती आहे त्याला सरकारने खऱ्या अर्थाने कर्जमुक्ती, हमीभाव द्यावव व आदी मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आक्रोशाला संवेदनशीलता दाखवून शेतकरी माय बापाच्या या मागण्या संवेदनशील सरकारने मान्य केल्या।

भावांनो, 60 वर्षात आजपर्यंत केवळ स्वार्थाचे राजकारण करणाऱ्या भ्रष्टवादी दरोडेखोरांना आता मोठी चपराक बसली आहे। महाराष्ट्राचा शेतकरी कुण्या पक्षाच्या, कुण्या झेंड्याचा आणि कुण्या नेत्याच्या पाठीमागे या संपात सहभागी झाला नव्हता। शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात आपला पाठिंबा या संपासाठी केवळ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाला दिला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागण्याच्या अंमलबजावणीसाठी काही अवधी मागितला आणि असलेल्या मागण्या येत्या 4 महिन्यात पूर्ण करण्याचे वचन दिले।

भावांनो, हमीभाव नक्की देणार हेसुद्धा सांगितलं। आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी सरकारचा हितचिंतक असूनसुद्धा बापाने सहन केलेल्या 60 वर्षाच्या शोषणाविरुद्ध या एल्गारामध्ये सामील झालो होतो। केवळ एकाच गोष्टींमुळे की, माय बाप सरकार बापाला आजपर्यंत सहन कराव्या लागलेल्या अडगळीतून आता मुक्त करा।

1 ते 4 जूनपर्यंत महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शेतकरी लढला । त्यातही काही प्रमाणात राजकीय कुरघोड्या करण्याचा प्रयत्न झाला। मात्र या नंतरच्या काळात या संपातून शेतकरी बाजूला झाला। आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आपल्या माय बापाच्या नावानं राजकारण करण्यासाठी आणि राजकीय दुकान डागडुजीसाठी तथाकथित नेत्यांनी शेतकऱ्यांच्या आडून राजकारणाला सुरुवात केली।
भावांनो, आपला शेतकरी संप गेल्या 4 तारखेलाच संपलाय। सरकारने आता किसान क्रांती आणण्यासाठी पाऊल टाकलं आहे। संत सावता माळी आठवडी बाजारांची संख्या महाराष्ट्रात वाढवून थेट शेतकऱ्यांना फायदा होईल, मागेल त्याला शेततळी योजना असेल, हमीभाव निश्चित केल्यानंतर त्याची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी सरकार सक्षम आहे ।

नुकताच संपाला पुढची दिशा देण्याच्या नावाखाली सुकाणू समिती स्थापन केली त्यात कोण तर राजकीय नेत्यांनी चलती। भावांनो जर राजकारण विरहित संप आपण पुकारला होता तर आता या नेत्यांनी त्यात सहभागी होऊन आणि पाठिंबा देऊन याची राजकीय धुळवड खेळण्याची संधी साधली आहे।

व्यवस्था परिवर्तन करत असताना सरकारलाही वेळ दिली पाहिजे आणि आंदोलन सुरू झाल्यानंतर संपले पाहिजे। येणाऱ्या काळात सरकारकडून अपेक्षा करूया की दिलेल्या शब्दानुसार तुमच्या माझ्या बापाची कृषी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही।भावांनो आता सर्वांनी आपापल्या गावामध्ये व्यवहार सुरळीत करा। पावसाचे दिवस सुरू झाले आहेत मन लावून शेती करा। सोन्यासारखी दौलत शेतीमध्ये येईल। बंधूंनो, संपाच्या नावाखाली इथून पुढे राजकीय बळी जाऊ नये ही अपेक्षा।


( मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे या लेखानंतर माझा संपामधील सहभाग संपला आहे।)

© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
सोलापूर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा