शनिवार, १५ एप्रिल, २०१७

*हे वास्तव आहे या समाजव्यवस्थेचे...😢*

          मराठवाड्याचा पाचवीला पुजलेला दुष्काळ. गेली अनेक वर्षे थोडीशी शेतजमीन घेऊन राबणारे बापाचे हात आणि तोंडावर येऊन ठेपलेला विवाह या सर्व अडचणीतून मार्ग काढण्यासाठी व्यंकट वायाळ यांना कोणीही कर्ज देण्यास तयार नव्हते. हे सर्व उघड्या डोळ्याने पाहणाऱ्या शीतल वायाळ या भगिनीने नुकतीच आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून खरं दुःख या समाजाला दाखविण्याचे धाडस शीतलने केले आहे. समस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी होत असतानाच बँका कर्ज देत नाहीत हे किती क्रूर आहे.
        दोन बहिणीचा विवाह कर्ज काढून व्यंकट वायाळ यांनी लावून दिला मात्र शीतलचा विवाह लावण्यासाठी कोणत्याही बँक व सावकाराने मदत केली नाही. गेली दोन वर्षांपासून शीतलचा विवाह थांबला होता. एकीकडे थोरा मोठ्यांच्या विवाहाला राजेशाही थाटात गुलाल बुक्क्यांप्रमाणे होणारी पैशाची उधळण आणि एकीकडे अशा हजारो, लाखो शीतल विवाहासारख्या मंगलमय महाद्वारात केवळ बापाच्या व घरच्या आर्थिक होरपळीमूळे पडून आहेत. हे या समाजाचे जळजळीत व भयाण वास्तव आहे. समाजसेवा म्हणून अनेकांनी व्यापार केला. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला मात्र अशा गरज असलेल्या कुटुंबियांना मात्र मदतीचा नाही तर सन्मानाचासुद्धा आधार मिळाला नाही.
         गेल्या चार - दोन महिन्यात मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. अर्थात ते बरोबरच आहेत मात्र आज शीतलने केलेली आत्महत्या त्याच समाजाच्या अन समस्त काळीज असलेल्या माणसांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. बंधूंनो, आपण आरक्षणाच्या हक्कासाठी झगडत आहात, आता समाजातील वाईट चालीरीती बंद करण्याच्या दृष्टीनेसुद्धा पाऊल उचलावं लागेल. सकल मराठा समाज आणि सकल धर्मिय हुंडा बंदी करण्यासाठी व समाजातील पिचलेल्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर येणार का हा खरा सवाल आहे. ही मुलगी कुणबी मराठा होती मात्र ती एक किसानकन्या होती हे सरकारने तत्काळ लक्षात घ्यायला हवं. शेतकरी आत्महत्या सरकारला नव्या राहिल्या नाहीत मात्र आता या पाल्यांनी केलेल्या अशा किती आत्महत्या सरकार बघणार हे न सुटणारे कोडे आहे. गेल्या वर्षीही अशीच आत्महत्या मोहिनी भिसे या तरुणीने केली होती.
        लातूरच्याच एका भगिनीला कॅशलेस व्यवहाराला चालना दिल्याबद्दल १ कोटींचे बक्षीस पंतप्रधानांच्या हस्ते  मिळते अन त्याच जिल्ह्यातील या भगिनीला आर्थिक समतोलामुळे आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे या समाजव्यवस्थेचं !
         शितलने आपल्या शेवटच्या चिठ्ठीत काळजाला पीळ पाडणारे प्रश्न विचारून जीवनयात्रा संपवली. मारत समजत असणाऱ्या चालीरीती बंद करण्याचे कळकळीचे आवाहनसुद्धा तिने केले. हि आत्महत्या केवळ एका समाजाची नाही, एका भगिनीची नाही तर समस्त माणसांची आहे. शीतलच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं मात्र ते नुकसान भरून निघावं यासाठी सर्वच समाजाने आपल्या समाजातील वाईट चालीरीती बंद करण्यासाठी पाऊल उचलायला हवं.
      अनेक मुलींनीं अशा आत्महत्या केल्या. समाजात आर्थिक दरी नक्कीच रुंदावली जातीय हे नाही म्हटल तरी मान्य करावं लागेल. शेवटी एवढंच एका भगिनींच्या या आवाहनाला साथ देत समाजातील वाईट प्रथा बंद करा, हीच खऱ्या अर्थाने शीतलला श्रद्धांजली ठरेल! एवढंच, बस्स।

विकास विठोबा वाघमारे
📲 8379977650
सोलापूर
शितलने लिहिलेले पत्र-



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा