मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

आठवणींची कोरी कविता.......

तू शब्दशब्दात बरसावं
लिहाव्या दहा - पाच ओळी
मधून एखादा फोन यावा
काळीज भेदून जाणारा....
कविता वगैरे कशाला
उगीच पुन्हा काळीज तुटायचं
पण तू शब्दात आहेस म्हणून
लिहायचा विचार करावा
पण फोन स्वस्थ बसूच देत नाही
झालेला संवाद पुन्हा पुन्हा
तरळत राहतो, बोलत राहतो
एकांताला माझ्याच मनात
एकही शब्द फुटत नाही
मी भांडावं म्हणतो तर
कुणाशी बोलावं हाही प्रश्न
मग पुन्हा पेन वगैरे खिशाला दान देतो
कागद डसबिनला बहाल करतो
काय लिहू आणि कशाला ?
आठवण कशी लिहू ?
संपत जात नाही धागा
मग उगीच उकलत बसतो
रात्र वगैरे मला हल्ली जाणवत नाही
फोन बिन येतात काळजीचे.....
असं लिहायचं ठरवून बसतो
एखादी कोरी कविता
करून झोपी जातो
पण प्रश्न राहतोच की
आठवणींची कोरी कविता
नसेल न कुणी वाचत.....?

© Vikas Waghamare
📱 8379977650
सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा