दिन आंधळे नव्हे, डोळस असणे हिताचे !
आजकाल लोकशाहीच्या भारत देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्या जीवावर खोटं ज्ञान वाटण्याची संकल्पना जोर धरतीय. 60 वर्षाची सत्ता उलथून लावत भारतीय जनता पार्टीला बहुमताने कौल देणाऱ्या लोकशाहीच्या याच देशात त्याच्यावर राजरोसपणे संशय घेणाऱ्यांची आणि घेण्याची वृत्ती कुठेतरी वाढत चाललीय असं वाटत आहे. स्वतःच्या तोकड्या ज्ञानाचा "जय"जयकार करत डोळसपणे दिन आंधळे होणे किती शहाणपणाचं असतं कोण जाणे? या देशात जनतेने दिलेला कौल हा अभिव्यक्तीला घातक आहे, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाला घातक आहे असा डांगोरा काही तथाकथित एकतर्फी राजकीय विश्लेषक करीत आहेत.
लोकशाही शासनपद्धती मान्य आहे असे म्हणायचे आणि त्याच लोकशाहीने दिलेला कौल पडद्याआडून नाकारायचा हा शुद्ध दिनआंधळे आणि मूर्खपणाचे ठरते. सामाजिक न्यायाच्या आडून विरोधात अपप्रचार करून, भाबड्या विचारांवर विश्लेषक म्हणून मिरवत असताना स्वतःकडून लोकशाहीला न्याय दिला जातोय का हे पाहणे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. विचार व्यक्त करण्यावर अजिबात रोष नाही, काय विचार करावा यावर रोष नाही, कुणापुढे मांडावा यावर रोष नाही तर तो ज्या पद्धतीने आज समोर आणला जातो आहे त्यावर समाजातील सज्जन शक्तीने चिंतन करण्याची आवश्यकता आहे. देशात माओवादी, कम्युनिष्ठ (जे भारताला समर्थन देत नाहीत), देशद्रोही विचारधारा हे सर्व गेली 60 वर्षे फोफावत गेले त्यावेळी सामाजिक सलोखा, धर्मनिरपेक्षता, प्रजा सत्ताक लोकशाही, समता वगैरे वगैरे गोष्टी अबाधित होत्या आणि आत्ता त्याचा गळा घोटला जातोय असा सूर धरणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. हे वामपंथी अथवा तथाकथित स्वतःला बुद्धीजीवी समजणारे लोकशाही खिळखिळी करू पाहणाऱ्यामुळेच धर्मनिरपेक्षतेच्या मुल्यांना धोका आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले शब्द आज खरे होताना दिसत आहेत. समाजवादी वामपंथी विचार भारताला तारू शकत नाहीत हे पुन्हा एकदा या दिन आंधळेपणाच्या थोतांडाकडून दिसून येते. आतापर्यंत आपल्याला रात आंधळेपणा माहित होता पण दिवसा सर्वा समोर जाऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून मतदान करणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे कशी लोकशाही जोपासताहेत ? समाज नक्कीच बदलतोय परंतु वाम मार्गावर चालायचे सोडून विकासाच्या मार्गावर चालतोय हे डोळ्यांना दिवसा सुद्धा दिसत नसेल तर याला “दिन आंधळे” पणाच म्हणावे लागेल अशा डोळ्यांचा जय कधीच होणार नाही.
लोकशाहीचा आधार घेत ही दगाबाज, दांभिक वृत्ती जोपासली जातेय, वाढवली जातेय. प्रादेशिक नेत्यांनी आपापल्या राज्याची प्रतिमा स्वच्छ आणि विकासाचा ध्यास धरल्यास जनता नाकारणार नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या समोर तत्सम प्रादेशिक पक्षांची झालेली वाताहत ही तत्सम पक्षाला विचारशील आहे. लोकशाहीने पक्षाला नाकारलं तर तो प्रादेशिक असो अथवा राष्ट्रीय त्यामध्ये किंतु परंतू येत नाही. मात्र समाजामध्ये आज भारतीय जनता पार्टीला मिळत असलेला जनाधार भयभीत करण्याचा उद्देशाने अनेक महाभाग गुपित कार्य करीत आहेत. समाजात वाईट विचार पसरवत विरोधात रान पेटवायची स्वप्नं आज पाहत आहेत. संवाद, परिसंवाद करीत आपली मुळं रोवण्याची जास्तच हालचाल सुरु आहे मात्र जनता अशा विदारक चित्र निर्माण करणाऱ्यांना थारा देणार नाही.
आज निवडणूकीत यश मिळाले नाही म्हणून आक्षेप घेऊन त्यावर तोकड्या शब्दात बदनामी करणे हे ठार हरण्याची प्रवृत्ती म्हणावी लागेल. जातीच्या आधारे राजकारण संपल्याने समाजातील एक फळी भयभीत झाली आहे. उत्तर प्रदेशच्या निकालावरून जातीय तेढ निर्माण होईल असा बिनबुढाचा भाबडा (अंध)विश्वास व्यक्त करीत आहेत.
हे सर्व डोळसपणे पाहिले तर समाजात वाढणारी बौद्धिक प्रगल्भता पचनी पडत नसल्याने व काँग्रेसी, वामपंथी, लोकशाहीला घातक विचारधारेचा होत असलेला ऱ्हास यातून उत्पन्न झालेला हा तिरस्कार आहे.
"भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं" सत्याच्या मार्गाने चालत रहा यश नक्कीच मिळेल हे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गो व्याच्या यशातून दिसून येते आहे. हा बदलत्या जनसामान्यमाणसांचा, लोकशाहिचा विजय आहे हे जसे झोपीत असणाऱ्याला हे दिसू शकते परंतु झोपीचे सोंग करणाऱ्याला कसे दिसेल ? तसेच रातआंधळेपणाची शस्त्रक्रिया होऊ शकते परंतु दिन आंधळे पणाच्या आजारांवर काही ईलाज, उत्तर नाही. त्यामुळे आशा लोकांच्या, संसर्गजन्य दिनआंधळेपणाच्या रुग्णापासून सावधान. जे लिहतात जे बोलतात त्यावर विश्वास ठेवण्या पेक्षा जे समाजात आपणास दिसते त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, हेच खरे सत्य आहे. जनता हे करेल कारण जनता शुभ्र डोळस आहे दिन आंधळी नाही, हे खरे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा