गुरुवार, १ जून, २०१७

शेतकरी संप

शेतकरी संपामध्ये बंधूंनो मी सहभागी झालो. बांधवांनो कोणत्याही हिंसेच्या मार्गाचा अवलंब करू नका ही विनंती करतोय।
केवळ सत्ताधारी सरकारच्या रोषापायी पुढे आलेला हा संप नक्कीच नाहीय। गेल्या साठ वर्षांमध्ये बळीराजाला बळी जाण्यासाठी आणि देशोधडीला लावणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध फुंकलेलं हे रणशिंग आहे.

मी 12 - 13 वर्षाचा होतो तेव्हा करड्याची भाजी घेऊन बाजारात बापासोबत गेलो। तेव्हा दिवसभर उन्हात बसून एक पोतं भाजी विकली आणि हातात 80 रुपये आले। मालाला भाव चांगला लागला की वाईट मला तेव्हा काहीच कळलं नाही। त्यांनतर सातत्याने अनेकवेळा बाजारात जाणं झालं ही विदारक वास्तव मला जाणवत होतं। मात्र जेव्हा या सर्व व्यवस्थेच्या विरोधात होणारी चर्चा ऐकली तेव्हा पडताळणी केली की बळीराजाला कंगाल करणारी ही लोकशाही मार्गाने निवडून आलेली फळी आहे.

मध्यंतरी तेव्हाचे चळवळीतले नेते व आजचे कृषिराज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोतांची भाषणं ऐकली। तेव्हा आतून पेटून उठलो मात्र तोवर सरकार बदल झाला. आशेचा किरण समोर दिसला. हा संप भाजपाच्या विरोधात किती टक्के आहे मला माहिती नाही मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने जगण्यासाठी निर्णय घ्या हा विचार घेऊन व्यवस्थेच्या विरोधात केलेला एल्गार नक्कीच आहे.

सदाभाऊ कृषीराज्यमंत्री झाल्यानंतरही अनेकदा आंदोलने झाली तेव्हा खा। राजू शेट्टींनी शेतकऱ्यांचा कांदा व डाळ मंत्रालयासमोर टाकली. मात्र मला विरोधाभास कळत नाही की ज्यासाठी तुम्ही आयुष्यभर लढत आलात आणि जे मुद्दे घेऊन लढत आलात तेच खाते आपल्या हातात असून निर्णय घेऊ शकत नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून आंदोलने केली आणि अजून करताय मग हातात असलेल्या पदाचा काय उपयोग? माझ्या शेतकऱ्यांना वेड्यात काढून सत्तेवर बसणाऱ्या सदभाऊंना आगामी काळात याचा हिशोब द्यावा लागेल।

जे जगलं आणि भोगलं ते मांडण्याची लाज मला वाटत नाही. आजपर्यंत 2 रुपये किलो दराने टोमॅटो विकली आणि निव्वळ काही रुपयांमध्ये पोती विकली म्हणजे अक्षरशः लुटलं तेव्हा बापानं रानात टाकून दिलेले कांदे, टोमॅटो आणि जनावराला घातलेली भेंडी, गवार आज रस्त्यावर टाकली हाच फरक आहे.

भाजपा सरकार शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा देईल मात्र कधी कधी आईसुद्धा बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नसते। बाळ रडताना त्याला मारून गप्प बसवण्याचं वा दुर्लक्ष करण्याचं पाप कृपाकरून करू नका।

बाप मेल्यानंतरच दुःख आणि समोर दिसणारा जिंदगीचा डोंगर आपल्याला कळणार नाही त्यासाठी अनाथ किसानपुत्राला भेटावं लागेल। स्वातंत्र्यानंतर हा सर्वात मोठा लढा ठरावा आणि एकदा बापाच्या पिकाला हमीभाव द्या आणि मागण्या मान्य करा।

कर्जमाफी केल्याने प्रश्न नक्कीच सुटणार नाही मात्र दिलासा मिळेल। शेतात घामाच्या धारांनी पिकवलेला माल सरकार एकदा शेतकऱ्याच्या मनासारखा खरेदी करा। शेतकऱ्यांचं राज्य येऊ द्या एवढीच माफक अपेक्षा हा संप करतो आहे.

या संपाचे राजकारण नक्की होणार नाही। शेतकऱ्यांच्या आडून विरोधकांना राजकारणाचे डोहाळे लागले तर बुडत्याचा पाय खोलात पडेल. हा उद्रेक तुमच्या नाकर्तेपणामुळे घडलाय ।

बांधवांनो संप सुरूच राहुद्या मात्र त्याला हिंसक वळण नको।
फळे, भाजीपाला, दूध रस्त्यावर टाकण्यापेक्षा आपल्या शेतकरी बांधवांना देवाण घेवाण करा।
एका मराठी सिनेमातील एक संवाद आठवला, "सरकार मरण्याचे लाख रुपये देण्यापेक्षा जगण्याचे 10- 15 हजार देत चला।"😢😢😢😢😢😢

© Vikas Waghamare
    किसानपुत्र
📱 8379977650
सोलापूर

४ टिप्पण्या:

  1. लेख छान आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच 60 वर्षाच पाप येउद्या यात !!

    उत्तर द्याहटवा
  2. शेतकरी बंधुंनो सावधान....!!!
    आजपासून सुरु झालेले हे किसान क्रांति आंदोलन संपूर्णपणे राजकीय आहे....हे आपणही निश्चितपणे ओळखलं असणार.
    कारण,राजकारण्यांना 2019 दिसत आहे......

    १.कोणतेही सरकार असो अशक्यप्राय वाटणाऱ्या आकर्षक मागण्या
    २.आमच्याच राष्ट्राचे अतोनात नुकसान करणारी आंदोलन करण्याची पद्धत
    ३.दुर्दैवाने प्रसंगी हिंसक वळण लागल्यास किंवा अटक झाल्यास पुन्हा त्याचे राजकारण केले जाईल
    ४.फुले - आम्बेडकरांच्या पुढारलेल्या महाराष्ट्रात जातीचे केले जाणारे राजकारण,त्यासाठी अशा आन्दोलनांचा वापर
    ५.विरोधी पक्षातील प्रभावी राजकीय नेते आवश्यक ती आर्थिक मदतही,शेतकऱ्यांना थेट न देता,या आन्दोलनाला करतील....

    अशा प्रकारच्या निरीक्षणांतून शेतकरी बंधूंनी आपल्या रास्त मागण्यांसाठी राजकारण्यांना स्वतःचा वापर करु देऊ नये...
    स्वतंत्र पणे शेतकरी म्हणून संघटीत व्हावे व सरकारवर परिणामकारक दबाव आणावा....
    या संघटीत शक्तीच्या माध्यमातून मराठा क्रांति मोर्चा प्रमाणे प्रभावी मूक मोर्चे प्रचंड संख्येत काढावेत त्यातून केवळ सरकारचेच नाही तर सर्व समाजाचे लक्ष वेधून घेता येईल....

    उत्तर द्याहटवा