रविवार, ५ मार्च, २०१७

अम्मांची मोहिनी

   तामिळनाडूच्या #मुख्यमंत्री जे. जयललिताजी यांच्या जाण्यानं तमिळी राजकारणात आणि अम्मा समर्थकात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. एखाद्याच्या जाण्यानं दुखः होणं स्वाभाविक आहे आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात व्यक्त होणं विचाराशिलच. तब्बल 118 कोटिंची संपत्ती बाळगून असलेल्या अम्मा तब्बल ७५ दिवस दवाखान्याच्या एका खोलीत दैवाशी एकाकी झुंज देत राहिल्या. राजकारणाचा कसलाही गंध नसताना चंदेरी दुनियेत आपला करिष्मा, गारुड तमाम रसिकांच्या मनात एक प्रेमाची तयार केलेली मोहिनी या सर्वांचा त्याग करत राजकारणात घेतलेली धाडसी उडी ही मोठी चर्चेची बाब आहे. एका मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या की “खरंतर मला वकील व्हायचं होतं मात्र कमी वयात आर्थिक विवंचना पूर्ण व्हावी यासाठी अभिनेत्री व्हावं लागलं.”
       अल्पावधीत चंदेरी दुनिया आपलीशी करत अनेक आघाडीच्या, दिग्गज अभिनेत्यासोबत अभिनय केला. मात्र राजकारणाची ओढ असल्याने आणि नेतृत्वगुण असल्याने राजकारणात सक्रीय झाल्या. तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या कदाचित एकच महिला असतील. गरिबांना सेवा मोफत देण्यासाठी त्यांनी अनेक योजना आणल्या. अम्मा इडली, अम्मा दवाखाना, अम्मा मीठ, अम्मा सिमेंट अशा अनेक क्षेत्रात त्यांनी गरिबांच्या खिशाला परवडेल अशा योजना धाडसाने राबवल्या. मागील वर्षी बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अम्मांना अटक झाली तेव्हासुद्धा चाहत्यांमध्ये असाच हलकल्लोळ माजला होता.
       अण्णा द्रमुक या पक्षाच्या सर्वेसर्वा म्हणून जबाबदारी सांभाळत त्यांनी स्वतःच एक अढळस्थान निर्माण केलं. अटलबिहारी वाचपेयी यांच्या सरकारला काही नियम मान्य करून पाठींबा दिला होता मात्र त्यांनी ते नियम मोडल्याबद्दल केंद्र सरकारचा पाठींबा काढून घेऊन सरकार पाडले. एवढा धाडसी आणि बलाढ्य निर्णय घेणारी अम्मा आता या जगात राहिली नाही. मात्र अम्मांनी करून दिलेली समाजकारणाची आणि राजकारणाची पायवाट नक्कीच तथाकथित नेत्यांना विचार करायला लावणारी अशीच आहे. अम्मांच्या जाण्याने तमिळी उघड्यावर पडणार नाहीत मात्र अण्णा द्रमुक या पक्षाला नक्कीच त्याची वानवा जाणवेल. पक्षाचे नेतृत्व यासाठी संघर्ष होण्याची भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली. किती खरे किती खोटे माहित नाही. मात्र तमिळी जनतेला अम्मांसारखी प्रेम देणारी दुसरी अम्मा आता होणे नाही, हे निश्चित.

               ✍🏻 विकास विठोबा वाघमारे
                    📲 8379977650
                    सोलापूर

--------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा