रविवार, ५ मार्च, २०१७

काळा पैसा गोरा होणार नाहीच

       रात्र साधारण दररोजसारखीच... आजूबाजूचा मोहल्ला, गल्ली आणि सर्वच परिसर तसा नेमेची असतो तसा अगदी आनंदी, उत्साही, धीरगंभीर आणि तेजोमय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधित एक विचारशील भाषण सर्वच वाहिन्यांवर सुरु होते. अचानक एक निर्णय पंतप्रधानांच्या तोंडून निघाला आणि संपूर्ण देशात एकच गोंधळ सुरु झाला. सोशल मिडीयाने आपली टिमकी जोरात वाजवली तर गरीबाच्या चेहऱ्यावर तेज आले. श्रीमंताच्या म्हणजेच गडगंज पैसा ज्यांनी मिळवला (अर्थात लुबाडून) त्यांना मात्र हि रात्र वैऱ्याची आली असंच म्हणावे लागेल. या सर्व रणधुमाळीमध्ये सामन्याला न्याय मिळेल हे त्रिकाल सत्य आहे मात्र श्रीमंताच्या घरावर काटे उभे राहिले हे आज संपूर्ण जग पाहत आहे.
      आपण आपलं कमवायचं मात्र एक परिसीमा ठरवून घ्यायला हवी. पाहिजे तेवढं कष्टानं कमवा मात्र ते भरल्यानंतर उर्वरित समाजाला दान द्या हि भावना आमच्या समाजामध्ये अनेक पिढ्या सांगत आल्या आणि तसं झालंही. मात्र अलीकडे २१ व्या शतकाकडे आम्ही झेप घेत असताना जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाला (?) श्रीमंतीचे वेड लागले. मी, माझं ही भावना समाजात अधिक तग धरू लागली. हे आता या निर्णयाने थोडेबहुत थांबण्याच्या मार्गावर येईल हे नक्की.
      समाजातील राजकारण आणि राजकारणातील घराणेशाही यांनी लोकशाहीला जेरीला आणलं हे पुन्हा पुन्हा सांगावं लागू नये. सत्ता आणि पैसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू हे चित्र समाजात नाईलाजाने तयार होत होतं. आज ५००, १००० रुपयांच्या नोटा रद्द करून सरकारने गरिबांना दिलासा दिला यासाठी कि आर्थिक प्रगती साधत असताना त्यांना समाजातील वाईट प्रवृत्तीला तोंड द्यावे लागत होते. या निर्णयामुळे आता काळ्या पैशाला पाय फुटू लागले.
           परवा परवा लक्ष्मी असणाऱ्या या रद्द झालेल्या नोटा आता कचराकुंडी, नदी, नाले याठिकाणी पडलेल्या समोर येत आहे. पैसा हा मागून मिळत नाही किंवा झाडाला लागत नाही हे खरं असलं तरी हा टाकून दिलेला पैसा मात्र काळा आहे हे मान्य करावंच लागेल. काहींनी काळा पैसा गोरा करण्याची अनेक पद्धतीने कलाकारी करून पाहिली. मात्र मोदींनी काळ्या पैशाच्या जोरावर लोकशाहीवर वरचढ ठरणाऱ्या अनेक महाभागांचे पंख छाटले. हा काळा पैसा आणि त्यांचे मालक आता कुठे सरकारच्या रडारवर आले आहेत. पैशावर गरिबांच्या गचांडीला धरून ताल करणाऱ्या अनेक महाभागांना कर्माचे फळ मिळेल का हे आगामी काळच ठरवेल. मात्र समाजातील काळा पैसा गोरा होईल आणि आपल्याला अभय मिळेल हि आशा गैरप्रकारातून मिळवलेल्या धनदांडग्यांनी ठेऊच नये. कारण हा निर्णय मागे घेण्यासाठी नाही तर समाजातील अंत्योदय घटकाला आर्थिक समृद्ध करत देशाला जगाच्या नकाशावर सन्मानाने उभा करण्यासाठी घेतला गेला आहे. काळे पैसेवाले निश्चितपणे भोग भोगायला तयार राहतील कारण हा काळा पैसा आता गोरा होणार नाही हे नक्की...!
                   
                 ✍🏻 विकास विठोबा वाघमारे
                    📲 8379977650
                  सोलापूर

(सदर लेख दै. तरुण भारत, सोलापूर आवृत्ती या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे)
-------------------------------------------------------
#bjp #namo #PMINDIA #NARENDRAMODI #CURRENCYBAN

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा