भोळ्या भाबड्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांना आषाढी, कार्तिकीजवळ येताच वेड लागतं पंढरीच्या विठ्ठलाचं. पाऊस असो अथवा नसो ऊन, वारा कशाचीही चिंता न करता तो मुकाट पंढरीची वाट धरतो हे केवळ आंतरिक इच्छा, भेटण्याची ओढ असल्यानेच. तशीच ओढ, आंतरिक इच्छा निर्माण होते, साहित्याच्या लाघवी सोहळ्याची म्हणजेच *“प्रतिभा संगम”* अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाची.
सळसळत्या तरुणाईच्या लेखणीला हक्काच व्यासपीठ मिळावं. समाजात वावरत असताना प्रेम, यातना, संवेदना आणि चाणाक्षपणा यातून जन्म घेतो एखादा परिच्छेद आणि मग उमलत जातात एक - एक पदर त्या समाजाच्या डोळसपणे पाहिलेल्या प्रतिमेचे. कधी गोड – गुलाबी लिहिलेलं असतं तर कधी देशप्रेमाच्या बाता असतात. कधी प्रेयसीचं यथार्थ वर्णन तर कधी भावनेचा अतुंग अविष्कार हे कसंही आणि कधीही उमटतं चीटोऱ्या – चीटोऱ्यांवर पण या रुणझुणत्या नवं उगवू पाहत असलेल्या लेखकाला त्याशिवाय व्यक्त व्हायला या जगात संधीच मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांच्या या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हि साहित्य वारी निर्माण केली.
माहाराष्ट्रातून भरघोस यश मिळणारं हे विद्यार्थ्यांचं एकमेव साहित्य संमेलन. इथे ना जेष्ठ ना कनिष्ठ, ना उच्च ना निच हि तर साहित्याची वारी पंढरीच्या माऊली या शब्दांसारखी भरून पावते. नव्या पण सिद्धहस्त लेखकाला उचलून घेणारं हे संमेलन अवघ्या महाराष्ट्रात विरळच.
१९९६ साली संत ज्ञानेश्वारांच्या सप्त जन्मशताब्दी वर्षापासून अंमळनेर जि. जळगाव याठिकाणी “प्रतिभा संगम” सुरु झालं आणि बघता बघता २० वर्षे पार केली. त्या काळात मुंबई, जळगाव, रत्नागिरी, डोंबिवली, गोवा, पुणे, संभाजीनगर, नांदेड, ठाणे, परभणी, सोलापूर अशा विविध जिल्ह्यामध्ये उत्साहात पार पडले. मंगेश पाडगांवकर, द. मा. मिरासदार, राम शेवाळकर, मधु मंगेश कर्णिक, नामदेव ढसाळ, दत्ता भगत, राहुल सोलापूरकर, रेखा बैजल, बाबा भांड,लक्ष्मीनारायण बोल्ली अशा महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिकांचा आशीर्वाद आणि स्नेह लाभल्याने हा सोहळा अधिक व्यापक होत गेला आणि हजारो साहित्यिक उभे करता आले याचं हे यशच म्हणावं लागेल. यंदा नाशिकमध्ये पंचवटीच्या पावनभूमीत व गोदावरीतीरी हे संमेलन येत्या २३,२४,२५ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे. यासाठी महाराष्ट्रात चौफेर असलेल्या सृजनशील विद्यार्थी साहित्यिकांना याचे वेध लागले आहेत. “विस्तारणारी क्षितिजं आणि उंचावणाऱ्या आशा” असणाऱ्या तमाम उदयोन्मुख साहित्यिकांना हे “प्रतिभा संगम” राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन गाठीशी बांधायला आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी देईल हे निश्चित. आता प्रतीक्षा आहे या साहित्याच्या सोहळ्यात चिंब होण्यासाठी २३ सप्टेंबरची...!
- *विकास वाघमारे (वाघोलीकर)*
सोलापूर
(मो.नं. ८३७९९७७६५०)
🔶संमेलन संचलन समिती सदस्य🔶
(संमेलनात सहभाग घेण्यासाठी या नंबरवर कॉल/ व्हाट्सअप करा)
💐एका उदयोन्मुख साहित्यिकाला माहिती होण्यासाठी हा लेख पुढे पाठवा💐
#प्रतिभा_संगम #pratibha_sangam #साहित्य_संमेलन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा