"हार्दिक पटेल" गुजरातच्या विधानसभा रणधुमाळीत अत्यंत तगडेपणानं लढताना पाहायला मिळतोय. खरंतर शहरात काय विकास झाला आणि खेड्यात काय झाला यावर विशेष प्रश्न अन जहाल टीका करताना हार्दिक पहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टी गेली 22 वर्ष सत्तेत असल्याचं दिसून येतं आणि त्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुद्द पूर्वी कारभार सांभाळला आहे. मात्र हार्दीकचा या जोशपूर्ण सभा, रोड शो, टीका आणि त्याला मिळणारा जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद हे सगळं विलक्षण आहे. नवखा 23-24 वर्षाचा हुल्लड पोरगा इतकं सगळं तळमळीनं मांडतोय, बोलतोय हे गुजरातला आणि पर्यायाने बहुतांश जनतेला आपलंसं वाटत असावं. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेतृत्व करत असलेला हार्दिक आता राजकारणात चांगलाच रुळलाय. थेट ग्रामीण भागात जाऊन शेती, पाणी, पीक, आरोग्य, रोजगार, युवक अशा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषयांवर सरकारवर हल्लाबोल करतोय. मोदी आणि समस्त टीम गुजरातच्या निवडणुकीत उतरली असली तरीही हार्दिक त्या मॉडेल समजणाऱ्या गुजरातचा युवा किंगमेकर ठरतो का अशी भीतीही आहे. दोन सहकारी थेट काँग्रेसमध्ये गेले. अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी. मात्र हार्दिक पटेल मात्र भाजपाला हरवण्यासाठी एकटाच लढतो आहे. काँग्रेसला मुका पाठिंबा मात्र दिला आहे. प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकणार म्हणजे टाकणार, मोदींना हरवून दाखवणार, दम लावून हरवणार, बदला घेणार अशा वाक्यांमधून सरकारबद्दलची चीड असलेली जखम भळभळताना दिसतेय. मुख्यमंत्री असलेल्या जिल्ह्यातसुद्धा जाऊन थेट लाखोंची सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर तोफ डागलीय. कालच सुरतला जाहीर सभा घेतली आणि प्रचंड गर्दीचा आगडोंब काय असतो हे पाहिलं.
खेळण्या बागडण्याच्या वयात प्रस्थापित गलथान व्यवस्थेला तगडं आव्हान देणारा हार्दिक मला पूर्वीपासूनच आवडतोय. आंदोलन कोणतंही असो, त्याची पद्धत कोणतीही असो आणि ते कुणीही चालवलेले असो जर सामान्यांच्या जिंदगीचे असेल तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं. उद्या निवडणुका संपतील. भाजपा बहुमताने येईल का हार्दिककडे कौल जाईल हे येणारा काळ ठरवेल मात्र गुजरातमध्ये हार्दिक लढवत असलेली खिंड जबराट आहे. राहुल गांधींच्या आयुष्यात अशी चळवळ केली नसेल तेवढी धावपळ आणि धगधग हार्दिक करतोय. हार्दिक राहुल गांधीपेक्षा उजवा ठरलाय. भाजपाच्या सर्वच नेत्यांना विकासाच्या मुद्द्यावर तो नडु पाहतोय आणि तेही अगदी बेधडकपणे हे विशेष वाटतंय. हार्दिक भाई अलग रसायन हैं, ये पसंद करना पडेगा।। सर्वांना शुभेच्छा!!!
© विकास विठोबा वाघमारे
📲 8379977650
वाघोली, ता - मोहोळ, जि. - सोलापूर
(सुरत रोड शो)











































